पिंपरी, ता. २७ ः नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याला येत्या ३१ ऑक्टोबर रोजी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र, नाशिक फाटा ते राजगुरुनगरदरम्यान सातत्याने होणारी वाहतूक कोंडी, अवजड वाहनांची रहदारी आणि अपुऱ्या वाहतूक नियोजनामुळे कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास खडतर होण्याची शक्यता आहे.
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातून नाशिककडे जाणाऱ्या भाविकांसाठी पुणे-नाशिक महामार्ग हा महत्त्वाचा मार्ग आहे. पुणे आणि नाशिक या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. सकाळी आणि सायंकाळी या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. आंबेठाण चौक ते नाशिक फाटा हे सुमारे २१ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी एक ते दीड तास लागतो. वाहतूक कोंडी तीव्र झाल्यास याच अंतरासाठी दोन ते तीन तासांपेक्षा अधिक वेळ खर्च करावा लागतो. बेशिस्त वाहनचालक, वाहतुकीचे अपुरे नियोजन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही समस्या अधिक गंभीर होत आहे. अशा परिस्थितीत कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिककडे जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांची संख्या वाढल्यास वाहतुकीवरील ताण आणखी वाढण्याची शक्यता आहे.
औद्योगिक वाहतुकीचा ताण
पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे, चाकण आणि रांजणगाव औद्योगिक क्षेत्रांमुळे या महामार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. याशिवाय चाकणमार्गे मुंबई, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहनेही याच मार्गाचा वापर करतात. पुणे आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतीमाल घेऊन जाणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे महामार्गावर दिवसभर वाहतुकीचा ताण असतो.
वाहतूक नियोजनाची गरज
३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून नाशिककडे जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता, पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे. नियमित औद्योगिक वाहतूक आणि भाविकांच्या वाहनांची संभाव्य गर्दी यांचा एकाच वेळी ताण आल्यास प्रवासाचा कालावधी वाढू शकतो. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवणे, वाहतुकीचे प्रभावी नियोजन करणे, अवजड वाहनांच्या वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन करणे आणि आवश्यकतेनुसार पर्यायी मार्गांबाबत नागरिकांना माहिती देणे गरजेचे आहे. अन्यथा, कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिककडे निघालेल्या भाविकांना महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.
पुणे-नाशिक महामार्गावरील चौकांचे रुंदीकरण करण्यात येत आहेत. साईड पट्टा भरण्याचे काम सुरू आहे. अनावश्यक दुभाजक बंद करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.
- दिलीप शिंदे, तांत्रिक सल्लागार प्रमुख, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
वाहतूक सुरळीत सुरू राहावी यासाठी पुणे-नाशिक महामार्गावर जादा पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येतील. नादुरुस्त वाहने बाजूला करण्यासाठी क्रेन उपलब्ध करणार आहोत. दोन्ही बाजूला पार्किंग होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल.
- विक्रांत देशमुख, उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड