सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : शहरात ठिकठिकाणी सुरू असलेली खोदकामे, सुरक्षेचा पुरता बोजवारा आणि जीवघेणे खड्डे यामुळे रस्ता अपघातात प्रशासनाच्या निष्काळजीपणाने अवघ्या ४८ तासांत दोन कर्त्या पुरुषांचे बळी घेतले आहेत.
शनिवारी (ता. १२) रात्री कृषीनगर जॉगिंग ट्रॅकजवळ पाण्याच्या पाइपलाइनसाठी रस्त्यावर टाकलेल्या काळ्या पाइपवर दुचाकी आदळून सिद्धार्थ दत्तात्रेय गोरे (वय ३३) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मित्र मनोज सूर्यवंशी गंभीर जखमी झाला. कामाच्या ठिकाणी रिफ्लेक्टर, सूचना फलक किंवा पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने अंधारात हा अपघात घडला. याप्रकरणी जबाबदार ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईक व मित्रांनी गंगापूर पोलिस ठाण्यात जोरदार निदर्शने केली. दुसरीकडे, शुक्रवारी (ता. ११) पाथर्डी फाटा ते वडनेर दुमाला रस्त्यावरील जीवघेणा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात सुनील केशव पगारे (वय ३८) यांचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. ते हॉटेलमध्ये काम करत होते. त्यांच्या पश्चात आजारी आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार असून, घरातील कर्ता पुरुष गेल्याने हे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आले आहे.
---चौकट
सुरक्षेच्या उपाययोजनांना हरताळ
शहरात सध्या विविध भागांत रस्ते खोदणे, पाणीपुरवठा पाइपलाइन तसेच ड्रेनेज लाइनची कामे सुरू आहेत. मात्र, कामाच्या ठिकाणी बॅरिकेड, रिफ्लेक्टर, सूचना फलक, प्रकाश व्यवस्था आदी सुरक्षेच्या उपाययोजना पुरेशा प्रमाणात केल्या जात नसल्याने वाहनचालकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.