राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कारासाठी
आजपासून ऑनलाइन अर्ज सुरू
‘राष्ट्रीय दूधदिनी’ २६ नोव्हेंबर रोजी होणार पुरस्कारांचे वितरण
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : देशातील दुग्ध व्यवसाय आणि देशी गोवंशाच्या संवर्धनाला चालना देण्यासाठी दिल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार २०२६’साठी सोमवारपासून (ता. १०) ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पात्र शेतकरी, दुग्ध उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक संघटना आणि कृत्रिम रेतन तंत्रज्ञांनी १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रीय दूधदिनी २६ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली. देशातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी देशी गोवंश व म्हशींच्या प्रजातींचे जतन आणि वैज्ञानिक पद्धतीने विकास करण्यावर भर दिला जात आहे. राष्ट्रीय गोकुळ मिशनअंतर्गत २०२१ पासून दरवर्षी राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार दिले जात आहेत.
---
पुरस्काराचे स्वरूप व श्रेणी
- उत्कृष्ट दुग्ध उत्पादक शेतकरी (गाय व म्हैस)
- उत्कृष्ट दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था, दुग्ध उत्पादक कंपनी किंवा शेतकरी उत्पादक संघटना
- उत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ
प्रत्येक श्रेणीत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पुरस्कार दिले जातील. तसेच ईशान्येकडील आणि हिमालयीन राज्यांसाठी विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
पारितोषिकाचे स्वरूप
- प्रथम क्रमांक : पाच लाख रुपये, मानपत्र व स्मृतिचिन्ह
- द्वितीय क्रमांक : तीन लाख रुपये, मानपत्र व स्मृतिचिन्ह
- तृतीय क्रमांक : दोन लाख रुपये, मानपत्र व स्मृतिचिन्ह
- विशेष पुरस्कार : (हिमालयीन राज्ये) दोन लाख रुपये, मानपत्र व स्मृतिचिन्ह
‘उत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ’ या श्रेणीतील विजेत्यांना मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. या श्रेणीसाठी रोख पारितोषिक दिले जाणार नाही.
----
...अशी आहे अर्ज प्रक्रिया
- अर्ज सुरू : १० ऑगस्ट २०२६
- अर्जाची अंतिम मुदत : १० सप्टेंबर २०२६
- पुरस्कार वितरण : २६ नोव्हेंबर २०२६
पात्र उमेदवार व संस्थांनी आपले अर्ज राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल https://awards.gov.in वर ऑनलाइन सादर करायचे आहेत. अधिक माहितीसाठी https://dahd.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
कोट ----
देशी गोवंशाचे संगोपन व संवर्धन ही ग्रामीण अर्थव्यवस्थेची खरी ताकद आहे. महाराष्ट्रातील दुग्ध उत्पादक शेतकरी, दुग्ध सहकारी संस्था आणि कृत्रिम रेतन तंत्रज्ञांनी देशी गोवंशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जावी, यासाठी पात्र शेतकरी, दुग्ध संस्था आणि कृत्रिम रेतन तंत्रज्ञांनी पुरस्कारासाठी मुदतीत ऑनलाइन अर्ज करावेत.
- डॉ. किरण पाटील, आयुक्त, पशुसंवर्धन विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.