राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला
प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे
युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची नियुक्ती
ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागील काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या महिला आणि युवक प्रदेशाध्यक्षपदांच्या नियुक्त्या बुधवारी (ता. ५) जाहीर करण्यात आल्या. महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे, तर युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची नियुक्ती केली. मुंबईतील देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते दोन्ही पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
भोंदू बाबा खरात याच्या प्रकरणावरून तत्कालिन प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर महिला प्रदेशाध्यक्षपद रिक्त होते. तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत तत्कालीन युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची शेतकरी नेत्यांना मारहाण केल्याप्रकरणी हकालपट्टी केली होती. या दोन्ही पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या. तटकरे यांच्या मान्यतेने या नियुक्त्या करण्यात आल्या. नियुक्तीनंतर नागवडे आणि ठाकरे यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यालयात जाऊन दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेसमोर नियुक्तीपत्र ठेवून अभिवादन केले. या वेळी पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण, कार्यालयीन सचिव संजय तटकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
नागवडे यांनी महिला प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडणे, संघटनात्मक कामातील सक्रियता आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेला प्रभावी संपर्क या बाबींचा विचार करून त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते, तर सूरज चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर युवक प्रदेशाध्यक्षपदी अमरावतीचे ठाकरे यांना संधी देण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष म्हणून तसेच विविध संघटनात्मक पदांवर काम करत युवकांमध्ये पक्षाची बांधणी मजबूत करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली आहे. या नियुक्तीनंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. तसेच राज्यभर दौरे करून पक्षाची भूमिका जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.