सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. ३० ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ‘एबी’ अर्ज वाटप सुरू असताना आज नाराज झालेल्या एका इच्छुक व त्याच्या समर्थकाने कार्यालयाची तोडफोड करून आपला संताप व्यक्त केला. कार्यालयातील टीव्ही, तसेच टेबलावरील काचा फोडण्यात आल्या. पैसे घेऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तिकिटे विकल्याचा आरोप तोडफोड करणाऱ्यांचा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढण्याचे कालच जाहीर केले होते. जवळपास ४० जणांना ‘एबी’ अर्ज वाटप करण्यात आले होते. आज महाविकास आघाडी आणि भाजप महायुती तुटल्यानंतर अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’च्या कार्यालयात इच्छुकांची गर्दी वाढली. भाजपने तिकीट कापलेल्या इच्छुकांनाही पक्षाने ‘एबी’ अर्ज दिले. त्यामुळे आधी आश्वासन देऊन डावललेले कार्यकर्ते नाराज झाले. त्यापैकी एकाने कार्यालयात जाऊन आरडाओरड केली आणि टीव्ही फोडला. यावेळी पक्षाचे शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांच्यासह काही पदाधिकारी कार्यालयात उपस्थित होते.