पुणे, लोणीकाळभोर, ता. ९ ः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केल्याची घटना लोणी काळभोर परिसरातील म्हातोबाची आळंदी गावात शनिवारी घडली. लवांडे यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, तसेच त्यांना धक्काबुक्की देखील करण्यात आली.
या प्रकरणी संग्राम भंडारे, अक्षय कांचन (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांच्यासह १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लवांडे (वय ५४, रा. अष्टापूर, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लवांडे हे एका दशक्रिया विधीसाठी लोणी काळभोर परिसरातील म्हातोबाची आळंदी गावात आले होते. दशक्रिया विधी झाल्यानंतर ते सकाळी दहाच्या सुमारास निघाले. म्हातोबाची आळंदी गावातील स्मशानभूमीजवळ लवांडे कारमध्ये बसत असताना आरोपींनी त्यांना अडवले. आरोपी दाेन वेगवेगळ्या कारमधून आले होते. त्यापैकी दोघांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत कारमधून बाहेर खेचले. लवांडे यांचा कारचालक संतोष गडदे यांना शिवीगाळ केली.
‘आम्ही तुला जिवंत सोडणार नाही. दोन पिस्तुले आमच्याकडे आहेत. गोळीबार करून तुला संपवून टाकू. आमच्या गुरूच्या अपमानाचा बदला घेणार आहोत’, अशी धमकी आरोपींनी दिल्याचे लवांडे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त डाॅ. सागर कवडे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस
निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले यांनी घटनास्थळी भेट दिली.
‘‘या प्रकरणात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी निष्पन्न झाले असून, त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
-राजेंद्र पन्हाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणी काळभोर
--
पोलिस ठाण्यासमोर आंदाेलन ः
आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी करत विकास लवांडे आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी दुपारनंतर लोणी काळभोर पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले. जोपर्यंत आरोपींना अटक करण्यात येत नाही. ताेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्यात येणार असल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती. आंदोलनामुळे लोणी काळभाेर पोलिस ठाण्याच्या परिसरातील बंदोबस्त वाढवला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.