सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २८ ः ‘नेपाळमध्ये अचानक आलेल्या विनाशकारी पुरामुळे विविध ठिकाणांवर भारतीय पर्यटक अडकले असून तब्बल ३२० भारतीय पर्यटकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही,’ असे आज परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले. भारतीय वंशाचे सुमारे शंभर नागरिक अद्याप बेपत्ताच आहेत. कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या या व्यक्तींकडे भारतीय नागरिकत्व नसून, त्या अन्य देशांच्या नागरिक आहेत.
परराष्ट्र मंत्रालयातर्फे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नेपाळमधील भारतीयांच्या स्थितीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले, की पूरग्रस्त भागातून काल काठमांडू येथे पोहोचलेल्या २१ भारतीय नागरिकांचे आज दिल्लीमध्ये आगमन झाले. काठमांडूमध्ये भारतीय राजदूतांनी या २१ जणांची भेट घेऊन विचारपूस केली होती. हे सर्वजण तमिळनाडूतील असून ‘इंडिगो’च्या विमानाने दिल्लीमध्ये पोहोचले. त्यांच्याबरोबरच ‘त्रिशुली-१’ जलविद्युत प्रकल्पात काम करणाऱ्या ६३ भारतीय नागरिकांचीही गुरुवारी सुटका करण्यात आली होती.
नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत
भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी परराष्ट्र मंत्रालयाचा नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत आहे. काठमांडू आणि बीजिंग येथील भारतीय दूतावासांमधील नियंत्रण कक्ष सातत्याने काम करत आहेत. बेपत्ता किंवा संपर्काबाहेर असलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
चारशे भारतीय कुटुंबीयांच्या संपर्कात
- चीनच्या बाजूला अडकलेल्या ९६ भारतीय नागरिकांनी सुरक्षितपणे स्थलमार्गाने नेपाळमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे जयस्वाल यांनी नमूद केले. ते म्हणाले, की चीनच्या बाजूला सध्या सुमारे ४०० भारतीय नागरिक सुरक्षित असून ते आपल्या कुटुंबीयांच्या संपर्कामध्ये आहेत. चीनच्या बाजूला दूरध्वनी सेवा सुरू असल्याने त्यांना कुटुंबीयांशी संपर्क साधता येत आहे. भारतीय दूतावासाने या नागरिकांपैकी अनेकांशी, त्यांच्या पथकप्रमुखांशी आणि प्रवासी एजंटशी संपर्क साधला आहे.
- नेपाळमध्ये संपर्क होऊ न शकलेल्या किंवा बेपत्ता असलेल्या भारतीयांची संख्या सध्या ३२० असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. मात्र, ही आकडेवारी अंतिम नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, की परिस्थिती सातत्याने बदलत असल्यामुळे आकडेवारीमध्ये बदल होत आहे. अनेक याद्यांमधील माहितीची पडताळणी आणि ताळमेळ साधावा लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या आणि भारतीय वंशाच्या मात्र अन्य देशांचे नागरिक असलेल्या सुमारे शंभर व्यक्तींशी अद्याप संपर्क झालेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
नेपाळला मदत रवाना
पूर आणि भूस्खलनामुळे उद्ध्वस्त झालेल्या नेपाळला भारताने मोठ्या प्रमाणावर मदत पाठविली आहे. २६ ऑगस्टच्या संध्याकाळी पहिले विमान नेपाळला रवाना झाले होते. त्यातून १० टन मदतसामुग्री पाठविण्यात आली. यात तात्पुरते निवारे, ब्लँकेट, स्वच्छता संच, सौर दिवे आणि औषधांचा समावेश होता. त्यानंतर २७ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता दुसरे विमान नेपाळला रवाना करण्यात आले. या विमानातून तब्बल ३७.५ टन मदतसामुग्री पाठविण्यात आली. आज सायंकाळी तिसरे विमानही मदत साहित्य घेऊन नेपाळला रवाना झाले.
बोगद्यातील बचावासाठी पथक
पूरग्रस्त भागातील बचावकार्यात नेपाळला सहकार्य करण्यासाठी भारताने बोगदा बचाव पथक पाठविण्याची तयारी केली आहे. नेपाळच्या विनंतीनुसार हे पथक पाठविण्यात येणार आहे. त्यापूर्वी आरईसीआय पथक नेपाळमध्ये पाठवून घटनास्थळावरील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानुसार बचावकार्यासाठी कोणती उपकरणे आवश्यक आहेत, याचे मूल्यांकन केले जाईल.
वैद्यकीय पथकही रवाना होणार
- भारताकडून वैद्यकीय पथकही नेपाळला पाठविण्यात येणार आहे. याशिवाय पूरग्रस्त भागातील संपर्क व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी भारताने ‘बेली ब्रिज’ उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. या पुलांसोबत आवश्यक तांत्रिक पथकेही पाठविण्यात येणार आहेत.
- पूरग्रस्त भागात संपर्क व्यवस्था तातडीने पूर्ववत करणे, बचावकार्याला गती देणे आणि मदतकार्य प्रभावीपणे राबविण्यासाठी भारत नेपाळला शक्य ते सर्व सहकार्य करीत असल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.