पंढरपुरात स्वतंत्र आरटीओ
कार्यालयाचा मार्ग मोकळा
‘परिवहन’ला मुख्यमंत्र्यांचे कार्यवाहीचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. ६ : पंढरपुरात स्वतंत्र प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच पंढरपुरात स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरू होईल, अशी माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.
पंढरपूर हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असून, वर्षभरात चार प्रमुख यात्रा भरतात. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांतून लाखो भाविक येथे येतात. तीर्थक्षेत्र विकास आराखडा, अपर जिल्हाधिकारी व अपर पोलिस अधीक्षक कार्यालयांसह वाढता व्यापार, पर्यटन आणि राष्ट्रीय महामार्गांचे जाळे यामुळे पंढरपूरचा प्रशासकीय व आर्थिक विस्तार वेगाने होत आहे. पंढरपूरसह शेजारील तालुक्यांमध्ये वाहनांची संख्याही मोठी आहे. वाहन नोंदणी, परवाना, कर भरणा आदी कामांसाठी नागरिकांना सोलापूरला जावे लागते.
स्वतंत्र आरटीओ कार्यालयामुळे परिसरातील नागरिकांना परिवहन विभागाच्या सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होऊन वाहन नोंदणी व परवाना प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होणार आहे. त्यामुळे पंढरपुरात आरटीओ कार्यालयास ‘विशेष बाब’ म्हणून मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या मागणीची प्रत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच परिवहन विभागाच्या आयुक्तांना पाठविण्यात आली होती.
या मागणीला मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने पंढरपुरात स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी आमदार आवताडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने समाधान व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.