शिक्रापूर, ता. ३१ ः मुखई (ता. शिरूर) येथे नव्याने मतदार झालेल्या तब्बल २२८ ग्रामस्थांना त्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी ७० किलोमीटर दूर असलेल्या थेट घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे सोमवारी (ता. २) बोलाविण्यात आले आहे. आंबेगाव आमचा तालुका नाही, आमच्या गावापासून घोडेगाव जवळ नाही अन् थेट आदिवासी घोडेगावात जायला सांगताय, आम्हाला हे मान्य नाही. असे म्हणत मुखईकर ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकारी व निवडणूक आयोगालाच तसे पत्र मेल केले असून आम्हा शिरुरकरांवरील अन्याय दूर करून आमच्यासाठी गावातच शिबिर घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मुखई (ता. शिरूर) येथील २२८ जणांनी आपली नोंदणी मतदार म्हणून केलेली असून सदर सर्व मतदारांना त्यांच्या कागदपत्रे पडताळणीसाठी थेट घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे २ नोव्हेंबर रोजी बोलाविले असून तशा नोटिसा नुकत्याच गावातील सर्व नवमतदारांना दिल्या गेल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
याबाबत ग्रामस्थांकडून आक्षेप नोंदविले गेले असून आम्ही शिरूर तालुक्याचे रहिवासी आहोत, आम्हाला शिरूर सोयीस्कर आहे. शिवाय २२८ जणांना एकाच वेळी आमच्यापासून ७० किलोमीटर दूर असलेल्या घोडेगावात बोलावून सदर कागदपत्रे पडताळणी होणे शक्य नसताना आम्हाला त्रास देण्याच्या भूमिकेतून निवडणूक विभागाकडून आम्हाला नोटिसा देण्यात आल्याचे म्हणणे ग्रामस्थांनी मांडले. आमच्या एकाच गावातील अशा कागदपत्रे पडताळणी असलेल्या मतदारांची संख्या जास्त असल्याने सदर मतदार कागदपत्रे पडताळणी शिबिर मुखईतच घेण्याची विनंती ग्रामस्थांनी केली असून तसे न केल्यास आमचा थेट आक्षेप व हरकत असल्याची तक्रार थेट जिल्हाधिकारी व निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती सरपंच रमेश पलांडे, माजी सरपंच अतुल धुमाळ, संयोगिता पलांडे, सचिन पलांडे यांनी दिली.
कुणाही नवमतदारांना वा सामान्य नागरिकांना त्रास होवू नये अशीच आमची नेहमी भूमिका असते. पर्यायाने मुखई ग्रामस्थांच्या एवढ्या मोठ्या संख्येच्या मतदारांना बोलावून त्यांची कागदपत्रे पडताळणी शक्यतो सोयिस्कर ठिकाणी कशी शक्य होईल. याबाबत तहसिलदारांना योग्य ती सूचना करू. त्यानुसार ते उचित निर्णय घेतील.
-अर्चना तांबे, प्रांताधिकारी, आंबेगाव-जुन्नर
२२८ नवमतदारांना त्रास होणार नाही असाच प्रयत्न आम्ही करतो आहोत. याबाबत शक्यतो मुखईतच शिबिर घेता येईल का, याची चाचपणी आम्ही आमच्या यंत्रणेकडून करत आहोत.
-राहूल सारंग, तहसिलदार, आंबेगाव
मुखई ग्रामस्थांच्या तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. याबाबतीत प्रांताधिकारी अर्चना तांबे व तहसीलदार यांच्याशी आम्ही बोलून योग्य तो निर्णय घेवू. कुणालाही त्रास देण्याची आमची भूमिका नाही. आम्ही प्रक्रीया म्हणून या प्रकरणात योग्य ती भूमिका घेऊन मतदार नोंदणी कागदपत्रे पडताळणी करून घेवू.
-सचिन वाघ, नायब तहसिलदार, आंबेगाव