सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १० : बहुराष्ट्रीय आयटी कंपनी टीसीएसमधील महिला कर्मचाऱ्याचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या निदा खान हिला सोमवारी (ता. ११) नाशिक रोड सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. गेल्या तीन दिवसात निदा खान हिची दररोज पाच ते सहा तास कसून चौकशी करण्यात आली असून, तिचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. मोबाइलमधील डाटा विश्लेषण सुरू असून त्यातून विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) हाती महत्त्वाचे पुरावे लागण्याची शक्यता आहे.
टीसीएस कंपनीतील पीडित महिलांचे लैंगिक शोषण करीत त्यांचे धर्मांतराचा डाव रचून कटकारस्थान केल्याप्रकरणी निदा खान हिला गुरुवारी (ता. ७) रात्री छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. गेल्या दीड महिन्यांपासून निदा खान पसार होती. या दरम्यान तिचा अटकपूर्व जामीन अर्जही नाशिकरोड सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यामुळे तिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु सुनावणीपूर्वीच तिला एसआयटी व संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून निदा खानला अटक केली. गेल्या तीन दिवसांपासून निदा खान हिची सुमारे पाच ते सहा तास कसून चौकशी करण्यात आली. निदाचे आई-वडील, दोन भावांचीही समोरासमोर चौकशी करण्यात आली आहे. निदाच्या कोठडीची मुदत संपत असल्याने सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असून कोठडीत वाढ होण्याचीच शक्यता आहे.
धर्मांतराचा कट
निदा खान हिच्यासह या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले संशयित दानिश शेख, आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी यांनी संगनमताने कटकारस्थान रचून पीडितांच्या धर्मांतराचा डाव रचला. त्यात त्यांना बहुतांशी यशही आले. पीडितांच्या धर्मांतरासाठी निदा खानची भूमिका महत्त्वाची असून संशयितांनी कोणाच्या इशाऱ्याने कट रचला, धर्मांतरासाठी कशा प्रकारे जाळे विणले जात होते, याचा शोध आता एसआयटी घेत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.