तीन फोटो आहेत (गणेश साळवी/राहुल पवार)
मातीशी नाळ जपणारे संघर्षमय नेतृत्व
..............................................
जनसेवेसाठी सदैव
तत्पर नीलेश जगदाळे
..............................................
कोरेगाव तालुक्यातील अंबवडे (संमत वाघोली) हे राजकीय व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील आणि जागृत गाव. याच मातीत वाढलेले, संघर्षाचे घाव झेलत सामान्यांच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभे राहणारे युवा नेतृत्व म्हणजे नीलेश जगदाळे.
- राजेंद्र वाघ
राजकारणाकडे केवळ सत्तेचे साधन म्हणून न पाहता, ‘समाजकारण आणि लोकांची सेवा’ हेच अंतिम ध्येय मानत नीलेश जगदाळे यांनी तालुक्याच्या पटलावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. २००९ पासून सुरू झालेला प्रवास, दुष्काळाच्या काळात पाण्यासाठी दिलेला लढा, पराभवाने खचून न जाता घेतलेली २८०० मतांची भरारी आणि अवघ्या आठ महिन्यांत गणातील १७ गावांमध्ये कोट्यवधींच्या विकासकामांची केलेली पायाभरणी... नीलेश जगदाळे यांचा हा प्रवास नव्या पिढीतील कार्यकर्त्यांसाठी दिशादर्शक ठरणारा आहे.
समाजकारणाचे बाळकडू
नीलेश जगदाळे यांचा राजकीय व सामाजिक प्रवास २००९-१०च्या सुमारास सुरू झाला. आमदार शशिकांत शिंदे यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय पाऊल टाकले. "राजकारणापेक्षा समाजकारण मोठे असते; पदापेक्षा सामान्य माणसाचे अश्रू पुसणे अधिक महत्त्वाचे असते," ही शिंदे साहेबांची शिकवण त्यांनी आयुष्यभरासाठी अंगीकारली.
कोणतीही भक्कम राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना, केवळ सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. गावात कुस्तीची मोठी परंपरा आहे. या परंपरेला उजाळा देत त्यांनी गावात भव्य कुस्ती आखाड्यांचे आयोजन केले. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना गावात आणून त्यांनी आपल्या संघटन कौशल्याची चुणूक दाखवून दिली.
वसना उपसा अन्
पाणी परिषदेचा लढा
२०१२ ते २०१४ चा काळ कोरेगाव आणि सातारा जिल्ह्यासाठी भीषण दुष्काळाचा होता. शेतातली पिके जळत होती आणि जनावरांच्या चाऱ्या-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. अशा अत्यंत बिकट काळात नीलेश जगदाळे खऱ्या अर्थाने संकटमोचक बनून पुढे आले. स्वतः पुढाकार घेऊन टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करणे असो वा जनावरांसाठी चारा वाटपाचे नियोजन असो; त्यांनी रात्रंदिवस एक केले.
याच दुष्काळात वसना उपसा सिंचन योजनेचा पहिला टप्पा तातडीने कार्यान्वित व्हावा, यासाठी त्यांनी शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोहिम हाती घेतली. २०१४ मध्ये या योजनेला गती मिळाली. अंबवडे चौकात ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रामराजे नाईक निंबाळकर, शिवेंद्रराजे भोसले, शशिकांत शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत झालेली ऐतिहासिक ‘पाणी परिषद’ यशस्वी करण्यात नीलेश जगदाळे यांचा उल्लेखनीय वाटा होता. इतकेच नव्हे, तर अरबवाडी धरणाखालून ओढ्यावाटे खाली वसना नदीपर्यंत पाणी आणून शेतकऱ्यांची उभी पिके जगवण्यासाठी त्यांनी पदरमोड करून विनामूल्य यंत्रणा राबवली. या दुष्काळी अनुभवाने त्यांच्यातील लोकप्रतिनिधीला अधिक प्रगल्भ बनवले.
पराभवातून फिनिक्स भरारी
राजकारणात यश आणि अपयश एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. काही वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत नीलेश जगदाळे यांचा अवघ्या ५८ ते ७८ मतांच्या अत्यंत निसटत्या फरकाने पराभव झाला होता. हा पराभव कोणत्याही कार्यकर्त्याचे खच्चीकरण करण्यासाठी पुरेसा होता; मात्र नीलेश यांनी हार मानली नाही. त्यांनी लोकांमध्ये जाणे सोडले नाही.
अखेर नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत गणात ओबीसी आरक्षण पडले. पक्षाला एका सक्षम, निष्ठावंत आणि सर्वसमावेशक चेहऱ्याची गरज होती. कार्यकर्त्यांच्या आणि नेते शशिकांत शिंदे यांच्या आग्रहाखातर त्यांनी उमेदवारी स्वीकारली. या निवडणुकीत पक्षीय सीमा गळून पडल्या. अंबवडे गणातील सर्वच गावांतील त्याचबरोबर देऊर, वाठार स्टेशन, तळीये, बिचुकले अशा सर्व भागांतील तरुण, ज्येष्ठ आणि मागासवर्गीय समाज त्यांच्या प्रचारासाठी स्वतःहून प्रचारासाठी उतरला.
विरोधकांच्या बालेकिल्ल्यातही मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि नीलेश जगदाळे यांनी तब्बल २,८०० इतक्या विक्रमी मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला. जुना पराभव धुवून काढत त्यांनी दाखवून दिले, की जमिनीवर काम करणाऱ्या माणसाला जनता कधीही अंतर देत नाही!’
आठ महिन्यांत विकासाचा धडाका
पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी विजयाचा जल्लोष बाजूला ठेवून कामाला सर्वोच्च प्राधान्य दिले. गेल्या केवळ सात ते आठ महिन्यांच्या अल्प कालावधीत त्यांनी आपल्या गणातील १७ गावांमध्ये सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक विकासकामे मंजूर करून आणली आहेत.
रस्त्यांसाठी आंदोलने : वाठार- कोरेगाव आणि लोणंद- सातारा या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यांसाठी आक्रमक आंदोलने केली आणि प्रशासनाला काम करण्यास भाग पाडले.
पाणीटंचाईवर मात : आगामी टंचाई लक्षात घेऊन विंधन विहिरी, मोटारी बसवणे आणि पाणीपुरवठा योजनांचा सातत्याने प्रशासकीय पाठपुरावा ते करत आहेत.
तळागाळाशी जोडलेली यंत्रणा : अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, कृषी सखी आणि ''उमेद'' अभियानातील महिला बचत गटांशी त्यांचा थेट दैनंदिन संपर्क असतो. प्राथमिक आरोग्य, शिक्षण आणि शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी ते सदैव तत्पर असतात.
जनसंपर्क अन् अजातशत्रू
नीलेश जगदाळे यांच्या कार्यशैलीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा अजातशत्रू स्वभाव. निवडणूक संपली की राजकीय मतभेद तिथेच संपवायचे, ही त्यांची कामाची पद्धत आहे. गणेशोत्सवात त्यांनी आपल्या गणातील एकाही विरोधकाचे किंवा स्वतःचे मंडळ न वगळता तब्बल ७६ गणेश मंडळांना प्रत्यक्ष भेटी देऊन लोकांशी संवाद साधला.
कोणाचे दवाखान्याचे काम असो, मेडिकल बिल कमी करणे असो, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश असोत वा शासकीय दाखले; नीलेश जगदाळे एका फोनवर उपलब्ध असतात. व्यवसाय सांभाळताना समाजकारणामुळे होणारे दुर्लक्ष आणि आर्थिक ताण त्यांची पत्नी अत्यंत खंबीरपणे सांभाळून घेते, हे ते कृतज्ञतेने नमूद करतात. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येऊन जनतेच्या सुख-दुःखात सावलीसारखे उभे राहणारे नीलेश जगदाळे हे कोरेगावच्या ग्रामीण पटलावरील आश्वासक, धडपडणारे आणि भविष्यवेधी नेतृत्व ठरले आहे.
......................................
निवडणूक ही केवळ पंधरा दिवसांची असते; पण समाजकारण आणि माणसांशी जोडलेली नाळ ही आयुष्यभराची असते. पदापेक्षा सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यांतील समाधान हेच माझ्या कामाचे खरे भांडवल आहे.
- नीलेश जगदाळे
..................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.