योजना केंद्रित व लोकानुनय टाळणारे भाषण
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १ ः सलग नववा आणि विक्रमी अर्थसंकल्प मांडणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पाचे भाषण योजनाकेंद्रित तसेच लोकानुनयी घोषणा टाळणारे होते. एक तास २५ मिनिटांच्या भाषणात सव्वाशेहून अधिक वेळा सत्ताधाऱ्यांनी बाके वाजवून त्यांच्या घोषणांचे केलेले स्वागत हे आजच्या अर्थसंकल्पी भाषणाचे वैशिष्ट्य ठरले. थोरांची वचने अथवा काव्यपंक्ती, शेरोशायरी या पारंपरिक गोष्टींनाही अर्थसंकल्पीय भाषणात फाटा देण्यात आला होता.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तमिळनाडूचे वैशिष्ट्य असलेली कांजीवरम साडी परिधान करून आपल्या कारकिर्दीतील सलग नववा अर्थसंकल्प मांडला. तत्पूर्वी, सकाळी दहाच्या सुमारास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन माहिती दिली. राष्ट्रपतींनी दही खायला देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब होऊन अर्थमंत्र्यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला.
आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, पुदुच्चेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नजीक असल्याने या राज्यांना उद्देशून अर्थसंकल्पात घोषणा होऊ शकतील या अपेक्षेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे खासदार होते. मात्र, अर्थसंकल्पी भाषणात अशा थेट घोषणा करणे अर्थमंत्र्यांनी टाळले असल्याने विरोधी बाकांवर निराशा दिसली. अर्थसंकल्पात केरळसाठी काय? हा केरळमधील काँग्रेसच्या खासदारांचा सवाल वगळता संपूर्ण भाषणभर विरोधी पक्षांचे खासदार शांतच राहिले. एवढेच नव्हे तर अर्थसंकल्पात नेमके काय मिळाले याबाबत सत्ताधारी आघाडी ‘एनडीए’च्या घटक पक्षांमध्येही गोंधळ दिसला.
अर्थात, अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सभागृहात सत्ताधारी बाकांवर अर्थसंकल्पावरून उत्साहाचे वातावरण होते. लोकसभेचे कामकाज सुरू होण्याआधी सभागृहात पंतप्रधान मोदींच्या आगमनाआधी अमित शहा, राजनाथसिंह, पीयूष गोयल, अश्विनी वैष्णव, शिवराजसिंह चौहान यांच्यासह सर्व मंत्री पोहोचले होते. प्रत्येक अर्थसंकल्पाच्या वेळी पहिल्या रांगेत असलेले परिवहन मंत्री नितीन गडकरी मात्र आज सभागृहात दिसले नाहीत. सभागृह सुरू होण्यापूर्वी भाजपचे काही सदस्य सेल्फी काढत होते. त्यात फतेहपूरचे खासदार राजकुमार चहर यांचाही समावेश होता.
विरोधी बाकांवरील बड्या चेहऱ्यांपैकी काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, द्रमुकच्या कनिमोळी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सुप्रिया सुळेंसह अन्य खासदारही आधीच दाखल झाले होते. राहुल गांधी मात्र अर्थमंत्र्यांच्या भाषणाला सुरुवात झाल्यानंतर सभागृहात पोहोचले.
लोकसभा सुरू होण्याच्या एक मिनिट आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात येताच भाजपच्या खासदारांनी भारत माता की जय, हर हर महादेव अशा घोषणा देत त्यांचे स्वागत केले. तर प्रत्युत्तरादाखल विरोधी बाकांवरून जय संविधानच्या घोषणा देण्यात आल्या. काही विरोधकांनी एप्स्टिन फाइल्स अशाही घोषणा दिल्या. मात्र त्यांचा आवाज क्षीण राहिला.
संत रविदास जयंती आणि माघ पौर्णिमेच्या मुहूर्तावर अर्थसंकल्प मांडला जात असल्याचा उल्लेख सुरुवातीलाच करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक तास २५ मिनिटे भाषण केले. या भाषणादरम्यान त्यांनी चार वेळा प्यायले.
मात्र आतापर्यंतच्या अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये महापुरुषांची वचने, काव्यपंक्ती, सुभाषिते, शेरोशायरीचा उल्लेख राहिला आहे. मात्र अर्थमंत्र्यांच्या आजच्या भाषणात यापैकी काहीही नव्हते. रेल्वेचे कॉरिडॉर, सेमीकंडक्टर संरक्षण क्षेत्रासाठीची तरतूद, दुर्मिळ खनिजांसाठीची योजना, त्याचप्रमाणे आरोग्य खात्याशी संबंधित योजनांचा उल्लेख होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व मंत्री आणि सत्ताधारी खासदारांनी बाके वाजवून स्वागत केले. प्रत्येक घोषणेगणिक बाके वाजविण्यात येत होती. तुलनेने विरोधी बाकांवर सन्नाटा दिसला.
कोणता शब्द कितीवेळा?
इनकम ९८
ड्यूटी ५१
रेट ४८
गुड्स ४७
सर्व्हिसेस ४१
डिडक्शन ३४
पेनल्टी ३१
एक्झम्शन ३१
मॅन्यूफॅक्चर २९
टेरिफ २४
फॉरेन २०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.