पुणे, ता. १६ : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी पहिला पुणे दौरा केला. या वेळी ग्रामदैवत मानाचा पहिला कसबा गणपतीसह अन्य मंडळांना भेटी दिल्या. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हेदेखील उपस्थित होते.
नवीन यांचे बुधवारी (ता. १६) दुपारी पुणे विमानतळावर आगमन झाले. त्यांनी सर्वप्रथम कसबा गणपतीचे दर्शन घेत पूजा केली. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाला भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी देशातील जनतेच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या सदाशिव पेठेतील साने गुरुजी तरुण मित्रमंडळाला आणि कोथरूड येथील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या श्री साई मित्रमंडळातील गणरायाचे दर्शन घेतले. तसेच, महापौर मंजूषा नागपुरे यांच्या विनंतीवरून नितीन नवीन, मुख्यमंत्री फडणवीस हे ऐनवेळी महापौर बंगल्यातील गणपतीच्या दर्शन घेण्यासाठी आले होते. या वेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, महापौर नागपुरे, आमदार हेमंत रासने, शहराध्यक्ष घाटे यांच्यासह नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
‘देशाच्या प्रगतीवर विरोधक बोलत नाहीत’
महापौर बंगला येथे नितीन नवीन यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘‘देशाच्या प्रगतीवर विरोधक बोलत नाहीत. उलट देशाचा विकास पाहून त्यांना त्रास होतो. भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) परिषद झाली. त्याचाही विरोधकांना त्रास होतो. देशात सात लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. संरक्षण क्षेत्रात प्रगती होत आहे. आयुष्मान भारत आणि पंतप्रधान आवास योजनेचा कोट्यवधी नागरिकांना लाभ मिळाला. पण आरोप-प्रत्यारोपांऐवजी देश आणि समाजाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे, पण त्यावर विरोधकांची बोलण्याची तयारी नाही,’’ अशी टीका नवीन यांनी केली.
गणेशोत्सवामुळे महाराष्ट्रात येण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरांची माहिती घेता आली. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात गणरायाची पूजा केली जाते. महाराष्ट्रातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी पुण्यात आलो.
- नितीन नवीन, राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप
PNE26W50477
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.