बिहारमध्ये जनमताशी विश्वासघात
नितीश यांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसची भाजपवर टीका
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ५ ः बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे राज्यसभेत जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘‘हा भाजपकडून राज्यात केला जात असलेला सत्ताबदल असून बिहारमधील जनमताचा जो कौल मिळाला होता, त्याच्याशी हा विश्वासघात आहे,’’ असा आरोप काँग्रेसने केला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीवेळी आम्ही जी गोष्ट वारंवार सांगत होती, ती आता खरी ठरली आहे. कट रचून बिहारमध्ये सत्ताबदल करत खुर्चीवर कब्जा करण्यात आला आहे, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी समाज माध्यमातून केला आहे.
‘‘मी राज्यसभेत जाणार असलो तरी बिहार सरकारला पूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन करेन,’’ असे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. यावर टीका करताना काँग्रेसने म्हटले आहे की, एका जोडगोळीकडून कट रचत राज्यात सत्ताबदल करण्यात आला आहे. दरम्यान, ‘‘भाजपने याआधीच महत्त्वाच्या पदांवर दलाल लोकांना बसवले होते. आता तेच दलाल मुख्यमंत्रिपद भाजपला विकत आहेत,’’ अशी टीका राष्ट्रीय जनता दलाच्या प्रवक्त्या कंचना यादव यांनी केली आहे. ‘‘जीतनराम मांझी, चिराग पासवान, लालूप्रसाद यादव, उपेंद्र कुशवाह आदी नेत्यांनी बिहार हे भाजपसाठी चरायचे कुरण बनवू देऊ नये. एकमताने निशांत कुमार (नितीश यांचे पुत्र) यांना समर्थन देऊन मुख्यमंत्री बनवावे आणि भाजपचे दरवाजे कायमचे बंद करावेत,’’ अशी प्रतिक्रिया पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी दिली आहे.
दोन दशकांनंतर संसदेत
मागील २१ वर्षांपासून नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत. २०२५ मध्ये त्यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. सर्वाधिक काळ बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिल्याचा मान नितीश कुमार यांच्याकडे आहे. राज्यसभा निवडणुकीतील त्यांचा विजय औपचारिक मानला जात आहे. अशा स्थितीत तब्बल दोन दशकानंतर ते संसदेत दिसतील.