नवगाव शिवारात अनेक
शेतकऱ्यांचा ऊस आगीत खाक
२४ शेतकऱ्यांचे ४५ एकर २७ गुंठ्यांवरील उसाचे नुकसान
ॲग्रोवन वृत्तसेवा
पाचोड, जि. छत्रपती संभाजीनगर : तोडणीला आलेल्या उसाच्या फडाला अचानक आग लागून २४ शेतकऱ्यांचा ४५ एकर २७ गुंठ्यांवरील ऊस जळून खाक झाला. या घटनेत दोन कोटी सहा लाख ४१ हजार ९५० रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती तलाठी एस. डी. निकम यांनी दिली. ही घटना मंगळवारी (ता. २७) दुपारी पैठण तालुक्यातील नवगाव शिवारात घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सध्या परिसरात ऊसतोडणीचा हंगाम सुरू आहे. मंगळवारी दुपारी नवगाव शिवारातील गट क्रमांक ४५८/२ मधील सालार गफूर यांच्या उसाला अचानक आग लागली. त्यानंतर आगीचा वेगाने फैलाव झाला.
या आगीत सहदेव राक्षे, प्रभाकर फुंदे, नकुल राक्षे, बाळू दगडखैरे, गणेश पिंगळे, संजय लजगरे, साहेबराव दगडखैरे, मुंशी गफूर शेख, प्रशांत झांबरे, ज्ञानदेव दगडखैरे, सुरेश घुले, पदमाबाई दगडखैरे, बबन दगडखैरे, मुक्ताबाई सरमारे, सुदाम दगडखैरे, विजुबाई दगडखैरे, राजू झांबरे, खंडू काशीद, सविताबाई राक्षे, जालिंदर फुंदे, छाया लसगरे, एकनाथ दगडखैरे, भीमराव दगडखैरे, शिवनाथ दगडखैरे, हिंमत दगडखैरे, अशोक आवारे आणि राजेंद्र पालवे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या उसाचे नुकसान झाले.
शेतात पाणीटंचाई असल्याने अनेक शेतकरी ऊसतोडणीच्या प्रतीक्षेत होते. आग लागल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्र रूप धारण केल्याने सुरुवातीचे प्रयत्न अपुरे पडले. काहींनी जागोजागी पाचट बाजूला केले, तर काहींनी जमिनीवर बांध घालून आग रोखण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरट करूनही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. तोडणीला आलेला उभा ऊस जळून त्याचे चिपाड झाले. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
या घटनेमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी युवा सेनेचे किशोर चौधरी, माजी उपसरपंच डॉ. शरीफ पठाण, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. गुलदाद पठाण, डॉ. सुरेश चौधरी आणि माजी सभापती महंमद हनिफ यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. तलाठी आणि पोलिस विभागाने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली.
दरम्यान, तलाठी निकम यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यांच्या प्राथमिक माहितीनुसार, २४ शेतकऱ्यांच्या ४५ एकर २७ गुंठ्यांवरील ऊस जळाला असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आणखी किती शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, हे प्रत्यक्ष पाहणीनंतर स्पष्ट होईल.
कोट ----
नवगाव येथे उसाला अचानक आग लागून २४ शेतकऱ्यांच्या ४५ एकर २७ गुंठ्यांवरील ऊस जळाला. त्या वेळी वीजपुरवठा बंद होता. त्यामुळे आग नेमकी कशामुळे लागली, हे स्पष्ट झालेले नाही. या घटनेत उसाचे दोन कोटी सहा लाख ४१ हजार ९५० रुपयांचे नुकसान झाले.
- एस. डी. निकम, तलाठी, नवगाव
छायाचित्र परिचय
नवगाव, ता. पैठण : शिवारात लागलेल्या आगीत जळून खाक झालेला ऊस. (छायाचित्र : हबीबखान पठाण)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.