फायनल
-------------------------------------
तातडीने
००००००००००००००००००००००००००००००००
दिवाळी - स्टार्ट अप-न्यूट्रिसम
---------------------
चविष्ट आणि पौष्टिक पर्याय देणारा ‘न्यूट्रिसम’
…………..
चव हवी, पौष्टिकता हवी, पदार्थ परिचित असावा, त्याची उपलब्धता हवी आणि किंमतही परवडेल अशी हवी. असे सगळे गुण असलेल्या पदार्थांची बाजारातील उणीव नेमकी हेरून, ती भरून काढण्यासाठी ज्ञानम न्यूट्रिगो प्रायव्हेट लिमिटेड ही स्टार्टअप कंपनी सुरू करण्यात आली. वेगळ्या विचारातून सुरू झालेल्या त्यांच्या या कंपनीचा प्रवास रंजक आहे.
----------------------------
चांगले अन्न, चांगली चव आणि अधिक चांगल्या पोषणाचा विचार या परस्परविरोधी गोष्टी ठरू नयेत. हा समतोल साधताना योग्य घटकांचा वापर आणि परवडणारी किंमत यांसारखी आव्हाने अजूनही आहेत. प्रत्येक उत्पादन आणि प्रत्येक ग्राहकाच्या अनुभवातून शिकत देशभरातील रोजच्या ग्राहकांसाठी उपयुक्त ब्रँड उभा करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. ‘दररोज अधिक चांगले पर्याय,’ या आपल्या ध्येयासाठी ‘न्यूट्रिसम’ कार्यरत आहे. इचलकरंजीसारख्या छोट्या शहरात वाढलेल्या संस्थापकांनी सुरू केलेल्या या कंपनीचा न्यूट्रिसम हा ब्रँड रस्क, कुकीज यांसारख्या आपल्या परिचित खाद्यपदार्थांचे अनेक चविष्ट आणि पौष्टिक पर्याय उपलब्ध करतो.
शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात. कारण त्याने शेतीतून पिकविलेल्या अन्नधान्यातूनच साऱ्या जगाचे पोषण होते; मात्र गेल्या काही दशकांच्या कालावधीत विकासाची नवनवी शिखरे गाठण्याच्या धावपळीत जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, कामाचे स्वरूप, दिनचर्या या सगळ्यामध्येच बदल होत गेले. भौतिक प्रगती नक्कीच साध्य झाली असली, तरी आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याने जीवनशैलीशी निगडित विकारांनी आज आपले हात-पाय चांगलेच पसरले आहेत. त्याला ग्रामीण भाग आणि लहान शहरेही अपवाद राहिलेली नाहीत. ‘मधुमेहाची राजधानी’ असा नकोसा वाटणारा किताबही भारताला मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर, नजीकच्या भूतकाळात आरोग्याविषयीची जागरूकता पुन्हा हळूहळू वाढू लागली आहे. व्यायामाबरोबरच खाण्यापिण्याबद्दलची जागरूकता वाढली आहे. आपण विकत घेत असलेल्या किंवा खात असलेल्या पदार्थात साखर किती आहे, तंतुमय पदार्थ किती आहेत, प्रथिने किती आहेत, कोणते घटक वापरले आहेत, याकडेही ग्राहक लक्ष देऊ लागले आहेत; पण जागरूकता वाढली तरी आहारात लगेच बदल करता येतोच असे नाही. विशेषतः ग्रामीण भाग आणि लहान शहरांमधील ग्राहकांसमोर आणखीही एक अडचण असते, ती म्हणजे बदल करायची इच्छा असली, तरी सहज उपलब्ध असलेले आणि परवडणारे पर्याय मर्यादित असतात. शिवाय वर्षानुवर्षे खाल्ल्या जाणाऱ्या परिचित पदार्थांऐवजी एकदमच वेगळे काहीतरी खाण्याची मानसिकता असतेच असे नाही.
‘स्टार्टअप’ला सुरुवात ः
चव हवी, पौष्टिकता हवी, पदार्थ परिचित असावा, त्याची उपलब्धता हवी आणि किंमतही परवडेल अशी हवी. असे सगळे गुण असलेल्या पदार्थांची बाजारातील उणीव नेमकी हेरून, ती भरून काढण्यासाठी ज्ञानम न्यूट्रिगो प्रायव्हेट लिमिटेड ही स्टार्टअप कंपनी सुरू करण्यात आली. वेगळ्या विचारातून सुरू झालेल्या त्यांच्या या कंपनीचा प्रवास रंजक आहे. छोट्या शहरातील बालपण आणि पुढे विविध उद्योगांमध्ये आलेला व्यापक व्यावसायिक अनुभव या दोन्ही गोष्टींची सांगड घालून संस्थापकांनी ‘न्यूट्रिसम’ हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. छोट्या शहरात कुटुंब, समाज आणि स्थानिक व्यवसाय यांच्यात अधिक जवळीक असल्याने ग्राहक नेमके कशाला महत्त्व देतो, हे सहज समजते. वस्तू दर्जेदार असली पाहिजे, खर्च केलेल्या पैशांचे योग्य मूल्य मिळाले पाहिजे आणि उत्पादन रोजच्या जीवनात सहज सामावणारे असले पाहिजे, अशा अपेक्षा तिथे अधिक स्पष्ट जाणवतात. दुसरीकडे, तिन्ही संस्थापकांना त्यांच्या व्यावसायिक प्रवासातून भारतीय ग्राहकांचा बदलता स्वभाव आणि एफएमसीजी क्षेत्रातील बदलही जवळून पाहता आले. ‘न्यूट्रिसम’मध्ये या दोन अनुभवांची सांगड घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
पंकज दरगड हे कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. त्यांना विक्री आणि विपणन क्षेत्रातील वीस वर्षांहून अधिक अनुभव असून, जॉन्सन अँड जॉन्सन, एपिगामिया, टू यम्म, पार्क अव्हेन्यू यांसारख्या ब्रँड्ससोबत त्यांनी काम केले आहे. विक्री विभागाच्या नेतृत्वाच्या भूमिकेत व्यवसाय आणि वितरणाचे जाळे मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांनी पुण्यातील सिम्बायोसिसमधून एमबीए केले आहे.
मुकेश सावलानी हे सहसंस्थापक आणि मुख्य परिचालन अधिकारी (सीओओ). त्यांनाही वीस वर्षांहून अधिक व्यावसायिक अनुभव आहे. वेलस्पन इंडियामध्ये अमेरिका आणि युरोपमधील मोठ्या व्यवसायांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. वॉलमार्ट, टार्गेट यांसारख्या मोठ्या रिटेल साखळ्यांमध्ये व्यवसाय हाताळण्याचा अनुभव त्यांना आहे. वेलस्पन फ्लोअरिंगचे सीईओ म्हणून व्यवसायाची सुरुवातीपासून उभारणी करण्यातही त्यांची भूमिका होती. त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एक्झिक्युटिव्ह एमबीए केले आहे.
वंदना दरगड या सहसंस्थापक आणि मुख्य उत्पादन अधिकारी (सीपीओ) आहेत. पोषण आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीबद्दलच्या वैयक्तिक अभ्यासातून त्यांची या क्षेत्रातील वाटचाल सुरू झाली. के-११ स्कूल ऑफ फिटनेस सायन्सेसमधून पोषणाचे औपचारिक शिक्षणही घेतले. सुमारे दशकभरापूर्वी हायपोथायरॉइडिझमचे निदान झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या जीवनशैलीत बदल घडवून आणले. विवाहानंतर त्या इचलकरंजीत आल्या.
वैयक्तिक अनुभव ः
‘न्यूट्रिसम’च्या कल्पनेमागे केवळ बाजारातील संधी नव्हती; त्यामागे संस्थापकांचे वैयक्तिक कौटुंबिक अनुभवही होते. आई-वडिलांना मधुमेह झाल्यामुळे रोजच्या खाण्यापिण्यात काय असावे, यावर त्यांनी अधिक लक्ष दिले. एखाद्याला आरोग्याची अडचण आली, की नेहमीचे पदार्थ पूर्णपणे सोडणे त्याला शक्य होते असे नाही किंवा रुचेलच असे नाही. अशा परिस्थितीत संतुलित आणि पौष्टिक आहारासाठी विश्वासार्ह पर्याय शोधताना त्यांना अनेक अडचणी आल्या. साधा सकाळचा चहा आणि त्यासोबत रस्क खाण्यासारख्या छोट्या आनंदातही तडजोड करावी लागत असल्याचा अनुभव त्यांनी पाहिला होता. अशा रोजच्या सवयींमध्ये सहज बसणारे पर्याय उपलब्ध करून द्यावेत, या विचारातून ब्रँडने आकार घेतला. म्हणूनच परिचित पदार्थांना पूर्णपणे बाजूला सारण्याऐवजी त्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न सुरू झाला.
जागरूकता आहे; पण चवही हवीच
वर्षानुवर्षे एफएमसीजी क्षेत्रात काम करताना संस्थापकांना ग्राहकांच्या वर्तनातील बदल स्पष्ट जाणवत होता. ग्राहक आता पदार्थ विकत घेताना त्यातील साखर, फायबर्स, प्रथिने आणि एकूण पोषणमूल्याबद्दल अधिक जागरूक होत आहेत; मात्र फक्त पोषणाविषयीची जागरूकता असेल तर ग्राहक खरेदी करीलच असे नाही. चव, सहज उपलब्धता आणि किंमत या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. याच ठिकाणी ‘न्यूट्रिसम’ला संधी दिसली. रस्क आणि कुकीजसारख्या रोजच्या वापरातील परिचित पदार्थांमध्ये कोणते घटक असतील याचा आणि त्याच्या पौष्टिक वैशिष्ट्यांचा अधिक विचार करायचा; पण त्याच वेळी पदार्थ चविष्ट आणि ग्राहकाला सहज स्वीकारता येईल असा असला पाहिजे, यावर ‘न्यूट्रिसम’ने कटाक्षाने लक्ष दिले. ‘चव ही तडजोड करण्याची गोष्ट नाही,’ ही कंपनीची स्पष्ट भूमिका आहे. एखादा ग्राहक पदार्थ पहिल्यांदा विकत घेताना पौष्टिक वैशिष्ट्याचा विचार करील; पण तो पदार्थ पुन्हा विकत घ्यायचा की नाही, याविषयीचा त्याचा निर्णय त्याला पदार्थ आवडला की नाही यावर ठरतो. अतिरिक्त साखर नसलेले, अधिक तंतुमय किंवा प्रथिनांचा विचार करून तयार केलेले पदार्थ बनविताना हे काम अधिक अवघड होते. घटक बदलले, की पदार्थाची चव बदलू शकते, स्वरूपात बदल होऊ शकतो आणि तो खाल्ल्यावर मिळणारी अनुभूतीही वेगळी असू शकते. त्यामुळे उत्पादन विकसित करणे म्हणजे केवळ पॅकेटवर पौष्टिकतेचा दावा करणे नव्हे. म्हणूनच योग्य घटकांचे संयोजन, स्वाद, स्वरूप आणि खाण्याचा एकूण अनुभव यावरही भर देण्याचे कंपनीने ठरवले. ‘चविष्ट पदार्थ की पौष्टिकतेच्या दृष्टीने अधिक योग्य पर्याय?’ अशी निवड ग्राहकाला करावी लागू नये, अशी कंपनीची भूमिका आहे.
गुणवत्तेवर भर ः
एखाद्या पदार्थासाठी पोषणाच्या दृष्टीने चांगले घटक एकत्र करणे कागदावर उत्तम वाटू शकते; पण प्रत्यक्ष खाद्यपदार्थ तयार झाल्यानंतर त्याची चव चांगली असली पाहिजे, त्याचे टेक्श्चर चांगले असले पाहिजे, ठरावीक काळ तो व्यवस्थित टिकला पाहिजे, त्याची निर्मिती व्यावसायिकदृष्ट्या परवडली पाहिजे आणि ग्राहकांना खरेदी करण्यासही परवडली पाहिजे. पौष्टिकतेसाठी वापरले जाणारे काही घटक उत्पादनाचा खर्चही वाढवू शकतात. त्यामुळे पौष्टिकता, चव आणि परवडणारी किंमत यांचा समतोल साधण्याचे आव्हान आपल्यासमोर असल्याचे ‘न्यूट्रिसम’ला वाटते. हा प्रश्न पूर्णपणे सुटला आहे, असा कंपनीचा दावा नाही; पण अधिक चांगल्या प्रकारच्या घटकांचा वापर, उत्पादनातील कार्यक्षमता, कच्च्या मालाच्या खरेदीतील सुधारणा, पॅकेजिंग, वितरण आणि वाढती व्याप्ती यांच्या मदतीने उत्पादनाचा अनुभव आणि त्याचे अर्थकारण हळूहळू सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे कंपनीने सांगितले. पोषणाचा विचार करून तयार केलेले पदार्थ उच्च किमतीमुळे केवळ मर्यादित ग्राहकवर्गापुरते राहिले, तर त्यांचा व्यापक परिणाम होणार नाही. ते सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, ही भूमिका घेऊन कंपनी कार्यरत आहे.
ग्राहकांचा अभ्यास ः
ग्राहकांच्या वर्तनाबद्दल कंपनीने काही निरीक्षणे नोंदविली आहेत. खाद्यपदार्थ आणि पोषणाविषयीची जागरूकता केवळ मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळूरसारख्या महानगरांपुरती मर्यादित राहिलेली नाही. छोटी शहरे आणि गावांमध्येही ती वाढत आहे; मात्र या ग्राहकांचा दृष्टिकोन अतिशय व्यावहारिक असून, त्यांच्या लेखी चव, किंमत, सोय आणि विश्वास यांना तितकेच महत्त्व आहे. महानगराबाहेरील ग्राहकाला पूर्णपणे नवीन प्रकारचे अन्न हवे आहे असे नाही. त्याला आधीपासून परिचित असलेला पदार्थ हवा असतो; पण त्यात समजण्यास सोपा आणि स्वीकारता येईल असा अधिक चांगला पर्याय मिळाला, तर तो त्याचा विचार करू शकतो. संस्थापकांची पार्श्वभूमी छोट्या शहराची असल्याने त्यांना ही मानसिकता माहिती आहे. एफएमसीजी क्षेत्राच्या वाढीचा पुढचा मोठा टप्पा या ग्राहकाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात आहे, असे कंपनीला वाटते.
छोट्या शहरांकडे विशेष लक्ष
‘न्यूट्रिसम’च्या भविष्यातील विस्ताराच्या नियोजनात छोट्या शहरांना महत्त्वाचे स्थान आहे. भारताची ग्राहक बाजारपेठ केवळ महानगरांपुरती मर्यादित नाही. रस्क आणि कुकीजसारखी उत्पादने देशभर परिचित आहेत. त्यामुळे विविध बाजारपेठांसाठी योग्य उत्पादन आणि योग्य वितरणव्यवस्था तयार करणे हे खरे आव्हान असल्याचे कंपनीला वाटते. आधुनिक पद्धतीने किरकोळ विक्री, डिजिटल माध्यमे, जलद वितरण सेवा, किरकोळ विक्रीची पारंपरिक दुकाने आणि स्थानिक वितरण जाळे यांच्या संयोगातून हळूहळू विस्तार करण्याची कंपनीची भूमिका आहे. महानगरांपलीकडचा भारत किती महत्त्वाचा आहे, याची जाणीव त्यांना आहे.
‘न्यूट्रिसम’ हा एफएमसीजी प्रकारचा खाद्यपदार्थ ब्रँड असल्यामुळे त्याचा शेतीशी थेट संबंध आहे; मात्र सध्या कंपनी थेट शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक संस्थांकडून शेतीमाल खरेदी करत नाही. आवश्यक दर्जा आणि अन्नसुरक्षिततेच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या पुरवठादाराकडून कच्चा माल घेतला जातो. त्यामुळे कंपनीचे शेतीशी असलेले नाते सध्या थेट खरेदीचे नसून, व्यापक अर्थाने त्या ‘इकोसिस्टिम’मधील आहे. अर्थात, शेतीमाल हाच कोणत्याही खाद्यपदार्थ उद्योगाचा आधार असतो. अन्नप्रक्रिया उद्योग वाढला, तर विविध प्रकारच्या शेतीमालाची मागणी वाढते. भविष्यात शेतकरी, संघटित पुरवठा साखळ्या, अन्नप्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्याची संधी असल्याचे कंपनीला वाटते.
शेतकरी, ग्रामीण उद्योजकांसाठी संधी ः
बदलत्या खाद्यपदार्थ उद्योगात शेतकऱ्यांना असलेल्या संधी केवळ कच्चा माल विकण्यापुरत्या मर्यादित राहणार नाहीत, असे ‘न्यूट्रिसम’च्या संस्थापकांना वाटते. ग्राहकांच्या गरजा अधिक नेमक्या होत आहेत. वेगवेगळी पौष्टिक वैशिष्ट्ये असलेल्या पदार्थांची मागणी वाढत गेली, तर संपूर्ण मूल्यसाखळीत नव्या संधी निर्माण होऊ शकतात. मालाचे एकत्रीकरण, प्राथमिक प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक, वितरण, किरकोळ विक्री आणि खाद्यपदार्थ निर्मिती अशा विविध टप्प्यांमध्ये शेतकरी उत्पादक संस्था आणि ग्रामीण उद्योजक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. विशेषतः संघटित एफएमसीजी ब्रँड्सचा विस्तार लहान शहरांमध्ये वाढत असताना ग्रामीण युवक आणि महिला उद्योजकांकरिता वितरण आणि किरकोळ विक्रीच्या क्षेत्रातही संधी निर्माण होऊ शकतात. देशाच्या प्रगतीत अन्नप्रक्रिया उद्योगाची भूमिका महत्त्वाची असेल, असे कंपनीच्या संस्थापकांना वाटते. कारण शेतीमाल आणि ग्राहकाच्या बदलत्या गरजा यांना जोडण्याचे काम अन्नप्रक्रिया उद्योग करू शकतो. भारतात तयार होणाऱ्या कृषी उत्पादनांचा मोठा भाग घरोघरी अन्न म्हणून वापरला जातो; पण प्रक्रियेमुळे त्याच कच्च्या मालाचा वेगवेगळ्या स्वरूपात उपयोग करता येतो. अन्नप्रक्रिया म्हणजे केवळ कच्चा माल घेऊन त्याचे पॅकेटबंद उत्पादन करणे एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. त्यासाठी दर्जा, तंत्रज्ञान, घटक पदार्थांचे संयोजन, पॅकेजिंग, वितरण आणि ग्राहकाची समज या सर्व बाबी महत्त्वाच्या असतात. भारताकडे शेतीचा मोठा आधार आहे आणि मोठी बाजारपेठही उपलब्ध आहे. या दोन्हींमध्ये अधिक मजबूत दुवा उभा राहिल्यास अन्न उद्योगासाठी मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात, अशी खात्री ‘न्यूट्रिसम’ला वाटते.
कंपनीचे ध्येय ः ‘बेटर चॉइसेस एव्हरी डे’
‘बेटर चॉइसेस एव्हरी डे’ (दररोज अधिक चांगले पर्याय) ही ध्येय घेऊन कंपनी कार्यरत आहे. रोजच्या खाण्याकरिता उपयोगी ठरतील, असे अधिक विचारपूर्वक तयार केलेले पर्याय ग्राहकासमोर ठेवायचे. अतिरिक्त साखरेबद्दल अधिक जागरूकता, अधिक तंतुमय किंवा प्रथिने असलेले पर्याय निवडणे आणि आपण काय खातो याची जाणीव वाढवायची, अशा गोष्टींचा त्यात समावेश असू शकतो. एखादा खाद्यपदार्थ माणसाचे संपूर्ण आरोग्य ठरवत नाही; मात्र रोजच्या जीवनात सातत्याने छोट्या छोट्या गोष्टींची अधिक माहितीपूर्ण पद्धतीने निवड केल्यास त्याचा दीर्घकालीन प्रभाव पडू शकतो, हा या विचाराचा गाभा आहे. समग्रता, अस्सलपणा आणि प्रामाणिकपणा ही आपल्या ब्रँडची तीन मूलभूत मूल्ये असल्याचे कंपनी अभिमानाने सांगते. चांगले आरोग्य हे एखादे उद्दिष्ट नसून, निरंतर चालणारा प्रवास आहे. खाद्यपदार्थांची निवड अधिक चांगल्या प्रकारे करणे हा त्या प्रवासाचा भाग आहे, असे कंपनी म्हणते.
-------------
इन्फो ः
मोठ्या स्वप्नांच्या दिशेने...
इचलकरंजीतून आलेल्या संस्थापकांच्या प्रवासातून आणखी एक संदेश मिळतो. छोट्या शहराची पार्श्वभूमी असलेल्या उद्योजकालाही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीची महत्त्वाकांक्षा ठेवता येते. ते सांगतात, “व्यवसाय महानगरातूनच सुरू झाला पाहिजे असे नाही. लहान शहरातील सुरवात देखील तुमची ताकद ठरू शकते. ग्राहक ओळखा, योग्य टीम उभी करा, खर्चाबाबत शिस्त ठेवा आणि सतत शिकत व बदलत राहा.” आज छोट्या शहरांतील उद्योजकांनाही पूर्वीपेक्षा अधिक सहज पद्धतीने तंत्रज्ञान, ग्राहक, डिजिटल वितरणव्यवस्था आणि भांडवल या गोष्टी उपलब्ध होतात. त्यामुळे संधींची व्याप्ती वाढली आहे.
………
इन्फो ः
‘न्यूट्रिसम’ची विविध उत्पादने ः
https://nutrisum.in या ‘न्यूट्रिसम’च्या अधिकृत वेबसाइटवर सध्या रस्क, टोस्टी बाइट्स, ओट्स कुकीज आणि प्रोटिन कुकी मिनीज या चार प्रमुख प्रकारची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यात अनेक पर्याय असून, त्यातील काही पदार्थ अतिरिक्त साखर (added sugar), मैदा यांचा वापर अजिबात न करता तयार केलेले आहेत. तंतुमय पदार्थ आणि प्रथिनांचे प्रमाण अधिक असलेल्या काही पदार्थांचाही त्यात समावेश आहे.
--------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.