जवान हत्येप्रकरणी
चार पोलिस निलंबित
भुवनेश्वर ः महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आरोपानंतर जीआरपी जवानाच्या जमावाकडून झालेल्या हत्येप्रकरणी ओडिशा पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. या प्रकरणात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत चार पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले, तर दोन होमगार्डना सेवेतून कमी करण्यात आले. मृत जवान सौम्यरंजन स्वैन याच्या कुटुंबीयांनी पोलिसांसमोरच मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण माझी यांच्या निर्देशानंतर गुन्हे शाखेने तपास हाती घेतला.
--------
पुजाऱ्यांच्या वेतनासाठी
न्यायालयात याचिका
नवी दिल्ली : राज्यांच्या नियंत्रणाखालील मंदिरांतील पुजारी, सेवेकरी आणि कर्मचाऱ्यांना किमान वेतन व इतर सुविधा देण्यासाठी न्यायालयीन आयोग किंवा तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. वकील अश्विनी उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. काशी विश्वनाथ मंदिरासह अनेक ठिकाणी पुजाऱ्यांना किमान वेतनही मिळत नसल्याचे नमूद करत त्यांच्या उपजीविकेच्या हक्काचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
------------
कार्यकर्त्याच्या हत्येचा
तृणमूलचा आरोप
कोलकाता ः पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसच्या पंचायत सदस्याचा मृतदेह आढळल्याने हिंसाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. साहादेब बाग असे मृताचे नाव असून, तो गोगहाट-१ ब्लॉकमधील नोकुंदा ग्रामपंचायतीचा सदस्य होता, असा दावा तृणमूलने केला आहे. पोलिसांनी वैयक्तिक वैर, व्यावसायिक स्पर्धा आणि राजकीय कारणांसह सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. तृणमूलने आतापर्यंत पक्षाच्या सहा कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचा आरोप केला असून, भाजपने हे आरोप फेटाळले आहेत.
-----------
‘ईडी’ कारवाईविरुद्ध
‘आप’चे आंदोलन
पंजाब : पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईविरोधात आम आदमी पक्षाने रविवारी राज्यभर आंदोलन केले. भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून ‘आप’ नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप पक्षाने केला. आंदोलकांनी भाजपविरोधात घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन केले. ईडीने शनिवारी १०० कोटी रुपयांच्या कथित जीएसटी गैरव्यवहाराशी संबंधित मनी लॉन्डरिंग प्रकरणात अरोरा यांना अटक केली होती.
----
मुफ्तींचे आरोप
अब्दुल्लांनी फेटाळले
श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्यावर खोटे आणि निराधार आरोप केल्याचा आरोप केला. राज्यसभा निवडणुकीत भाजपला मदत केल्याच्या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी पीडीपी असे आरोप करत असल्याचे त्यांनी म्हटले. शासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी लाच मागितल्याचे मुफ्ती यांचे आरोपही त्यांनी फेटाळले. सरकारमध्ये मागील दाराने नियुक्त्या झाल्याचा आरोपही अब्दुल्ला यांनी नाकारला.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.