दृष्टिक्षेपात
कोकण
ओंकार हत्ती पुन्हा
सावंतवाडीमध्ये
बांदा (जि. सिंधुदुर्ग) : दोडामार्ग तालुक्यातून ओंकार हत्ती पुन्हा सावंतवाडी तालुक्यातील नेतर्डे गावात दाखल झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्याचे वास्तव्य नेतर्डे परिसरातील काजू बागायती व शेतीच्या परिसरात आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये भीती अन् चिंतेचे वातावरण आहे. काही महिन्यांपूर्वी ओंकार हत्ती दोडामार्ग तालुक्यात आपल्या मुख्य कळपात परतला होता; मात्र, दोन दिवसांपूर्वी अचानक त्याने कळप सोडून पुन्हा सावंतवाडी तालुक्याची वाट धरली.
--------------
मुंबई परिसर
पवार यांना पुरस्कार
मुंबई : ‘महावितरण’चे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या विद्युत क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स’ (भारत) संस्थेच्या ‘एमिनंट इंजिनियर’ या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते अमरावती येथे ‘आयईआय’च्या ४१व्या राष्ट्रीय विद्युत अभियंता अधिवेशनात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘कचरा प्रकल्प राबवा’
मुंबई : ‘दादर येथील मीनाताई ठाकरे फुल बाजार आणि क्रांतिसिंह नाना पाटील भाजी मंडई येथे रोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट स्थानिक पातळीवरच लावा. त्यासाठी अभिनव प्रकल्प राबवावेत,’ असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी दिले आहेत. यामुळे ताण कमी होऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
धरणे आंदोलन
तारापूर (जि. पालघर) : आधार नोंदणी, दुरुस्ती तसेच मोबाईल क्रमांक लिंक करण्यासाठी नागरिकांना येणाऱ्या अडचणींकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेतर्फे शनिवारी डहाणू पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांच्या तुलनेत आधार केंद्रांची संख्या अपुरी असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
हत्येप्रकरणी दोघांना अटक
ठाणे : भिवंडी-ठाणे बाह्यवळण रस्त्यावर ट्रकचालक पवनकुमार महातोची लूटमार करून त्याची हत्या करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. रमीज अब्दुल रशीद अन्सारी (वय २३) आणि मोहम्मद अल्कैश परवेझ आलम मोमीन (वय २५, दोन्ही रा. भिवंडी) अशी आरोपींची नावे आहेत. तीन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर ही कारवाई करण्यात आली.
दोघांविरुद्ध गुन्हा
ठाणे: मुंब्रा येथील एका विकसकाची चार कोटी ९५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पातील सदनिका नाममात्र दलालीत विकून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली. नदीम शेख आणि अख्तर हुसेन बेग अशी आरोपींची नावे आहेत.
तरुणीची फसवणूक
ठाणे : वधू-वर सूचक संकेतस्थळावरून ओळख झालेल्या एका व्यक्तीने ठाण्यातील २८ वर्षीय तरुणीची सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अजय अमोल पाटील (वय २९, रा. मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने या तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन करून ही फसवणूक केली.
मराठवाडा
कुटुंबाला लुटले
नळदुर्ग (जि. धाराशिव): शिर्डी येथून दर्शन करून कलबुर्गीकडे जात असलेल्या कुटुंबाला अडवून चौघांनी रॉड, पाइप व चाकूचा धाक दाखवत लुटले. ही घटना तुळजापूर-नळदुर्ग मार्गावरील गंधोरा पाटीजवळ घडली. काजल संदीप पवार (वय ३०, रा. उमरगा, ता. उमरगा, जि. धाराशिव यांनी नळदुर्ग पोलिसांत फिर्याद दिली.
उत्तर महाराष्ट्र
तरुणाची आत्महत्या
नाशिक : मैत्रिणीला दिलेले एक लाख रुपये परत मागणे वरूण भाऊसाहेब भामरे (वय २६) या तरुणाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना गंगापूर रोड भागातील ध्रुवनगर येथे घडली. पैसे परत द्यावे लागू नयेत म्हणून संबंधित तरुणी आणि तिच्या साथीदारांनी धमकी देत बेदम मारहाण केली. या त्रासाला कंटाळून मानसिक नैराश्यात वरूणने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.