खुटबाव, ता. १७ : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कमी कालावधीतील पीक म्हणून दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे. विशेष म्हणजे यावर्षी शेतकऱ्यांनी लवकरच कांदा लागवड सुरू केली आहे. आगामी तीन-चार महिने शेतीला पाणी मिळेल अशी परिस्थिती आहे. त्यानंतर दुष्काळाची दाहकता वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी उसाऐवजी रब्बी पिकाला प्राधान्य दिले आहे.
दौंड तालुक्यात आजअखेर ९९८ हेक्टर कांदा लागवड झाली आहे. तालुक्यामध्ये पारगाव, नानगाव, खुटबाव, देलवडी, कानगाव, राहु, पिंपळगाव, गार, नानवीज, वरवंड, केडगाव ही गावे कांदा पिकवणारी गावे म्हणून ओळखली जातात. पारगाव, नानगाव व कानगाव येथील मोठ्या शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीसाठी वखारी आहेत. निघालेला कांदा थेट बाजारपेठेत न घालता तालुक्यातील शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने लाखो रुपये खर्चून वखारी बांधल्या आहेत. यावर्षी कांद्याचे रोप व कांद्याच्या बियाण्याचे भाव गगनाला भिडले आहेत. कांद्याच्या रोपांसाठी १६ हजार रुपये प्रतिएकर तर कांद्याच्या बियाण्यासाठी दोन हजार रुपये प्रति किलो शेतकऱ्यांनी खर्च केला आहे. मजुरांनी लागवडीसाठी प्रति एकर १३ हजार रुपये घेतले आहेत, तरीसुद्धा चार पैसे मिळतील या आशेने तालुक्यातील अनेक शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. विशेष म्हणजे कांदा लागवडीसाठी मजूर मिळण्यासाठी शेतकऱ्यांना धावाधाव करावी लागत आहे.
गेल्या ३० वर्षांपासून आमचे कुटुंब कांदा उत्पादन घेत आहे. गेल्या दहा वर्षांपासून कांद्याला चांगले दिवस आले आहेत. गेल्या वर्षी मी पाच एकर कांदा व एक एकर गोट कांदा लावला होता. चालू वर्षी सहा एकर कांदा लावला असून चांगले उत्पादन मिळण्याची आशा आहे.
- संतोष बोत्रे, शेतकरी, पारगाव
दौंड तालुक्यातील शेतकरी कांद्याबरोबरच गहू, ज्वारी, मका ही रब्बी हंगामातील पिके घेत आहेत. गेल्या वर्षी कांद्याला सरासरी ४० ते ५० रुपये प्रति किलो बाजार भाव मिळाला आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये यावर्षी कांदा लागवड वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल-मेमध्ये उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी रब्बी पीक म्हणून वरील पिकांना प्राधान्य दिले आहे.
- अजिंक्य दुधाने, दौंड तालुका कृषी अधिकारी
04079
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.