सकाळ वृत्तसेवा
लासलगाव, (जि. नाशिक) ता. २ : कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून बफर स्टॉकची विक्री, ‘कांदा एक्स्प्रेस’द्वारे प्रमुख शहरांकडे वाहतूक आणि साठेबाजांवर कारवाई अशा उपाययोजना सुरू असतानाच लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दराने पुन्हा उसळी घेतली आहे. अवघ्या दोन लिलाव सत्रांत सरासरी दरात सुमारे ६०० रुपयांची वाढ होऊन तो ४,४०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला आहे. मंगळवारी (ता.२) कांद्याला कमाल ४,८६० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
लासलगाव बाजार समितीत मागील शनिवारी कांद्याचा सरासरी दर ३,७५१ रुपये प्रतिक्विंटल होता. सोमवारी तो चार हजार रुपयांवर पोहोचला, तर मंगळवारी आणखी वाढ होऊन सरासरी दर ४,४०० रुपये झाला. मंगळवारी किमान एक हजार ते कमाल ४,८६० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. दिवसभरात ६,३९६ क्विंटल कांद्याची आवक झाली. सोमवारी ही आवक ४,७३८ क्विंटल होती.
किरकोळ भाव ६० रुपये किलोवर
केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून बफर स्टॉकमधील कांदा ३५ रुपये किलो दराने विक्रीस उपलब्ध करून दिला आहे. विविध शहरांमध्ये मोबाइल व्हॅन आणि विक्री केंद्रांद्वारे कांदा उपलब्ध करून दिला जात आहे. मात्र, सरकारी कांदा ३५ रुपये किलो दराने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असताना लासलगावमध्ये घाऊक दर ४४ रुपये किलोवर पोहोचला असून किरकोळ बाजारात दर ६० ते ७० रुपये किलो आहेत. त्यामुळे सरकारी हस्तक्षेपाचा ग्राहकांवर आणि बाजारभावावर किती परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे.
कोट
कांद्याचा दर वाढताना दिसत असला तरी साठवणुकीतील वजन घट, सडलेला व मोड आलेला कांदा, प्रतवारीतील घट आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष परताव्याचे चित्र वेगळे आहे. ग्राहकांना दिलासा देतानाच सरकारने कांदा उत्पादकांचा उत्पादन खर्च आणि साठवणुकीतील नुकसान लक्षात घेऊन दीर्घकालीन कांदा धोरण आखावे.
- दिलीप ठोंबरे, कांदा उत्पादक शेतकरी, पिंपळद (ता. चांदवड)
दराची बुधवारची स्थिती (प्रतिक्विंटल)
सरासरी दर : ४,४०० रुपये
सोमवारचा दर : ४,००० रुपये
मागील शनिवारचा दर : ३,७५१ रुपये
कमाल दर : ४,८६० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.