कांदादराने ओलांडला
सरासरी २००० रुपयांचा टप्पा
दीड वर्षानंतर सुधारणा; शेतकऱ्यांना दरवाढीचा काहीसा दिलासा
मुकुंद पिंगळे ः ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सद्यःस्थितीत कांदा दर वाढीचे चित्र आहे. गेल्या दीड वर्षात मिळालेल्या दरातून उत्पादन खर्चही वसूल झाला नाही. मात्र आता कांद्याच्या सरासरी दराने प्रति क्विंटल २००० रुपयांचा टप्पा ओलांडल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या कमाल दर प्रति क्विंटल २४०० ते ३००० रुपयांदरम्यान मिळत आहेत.
गेल्या आर्थिक वर्षात (२०२५-२६) कांद्याला सरासरी केवळ ११०० ते १२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करता आला नव्हता. मात्र जूनमध्ये बाजारपेठेत हळूहळू सुधारणा होत आहे. दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कांद्याने सरासरी २००० रुपये प्रति क्विंटलचा टप्पा पार केला आहे. तरीही ही दरवाढ उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्यासाठी अद्याप पुरेशी नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.
चाळीस अंशांवर गेलेले तापमान, वादळी पाऊस तसेच गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींचा मोठा फटका बसल्याने लागवडीपासून काढणीपर्यंत कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. परिणामी, बहुतांश भागांत कांद्याची उत्पादकता ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घटली. प्रतवारीवरही विपरीत परिणाम झाला. त्यातच वाढलेला मजुरी खर्च आणि निविष्ठांच्या दरवाढीमुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली. मात्र दरवाढ होत नव्हती. आता दरवाढीचा कल आहे.
पश्चिम आशियातील युद्धस्थिती निवळणे, पूर्व आशियायी देशांमध्ये वाढलेली निर्यात तसेच उत्तर-पूर्व राज्यांतील वाढती मागणी यामुळे कांद्याच्या दरात सुधारणा होत आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत इतर प्रमुख कांदा उत्पादक राज्यांत कांद्याची उपलब्धता कमी असल्याने महाराष्ट्रातून, विशेषतः नाशिक विभागातून, व्यापारी व निर्यातदारांकडून मोठ्या प्रमाणावर कांद्याची मागणी होत आहे. त्यामुळे दराला काहीसा आधार मिळत आहे.
बुलेट पॉईंट
दर सुधारण्यामागील काही कारणे :
- खरिपातील नवीन लाल कांदा बाजारात येण्यासाठी अजून साडेचार ते पाच महिन्यांचा अवधी आहे.
- मध्य प्रदेशसह इतर राज्यांतील कमी उत्पादन आणि देशांतर्गत वाढती मागणी.
- उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाना, आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यांत नाशिकच्या कांद्याला चांगली मागणी.
- इंडोनेशिया, मलेशिया, श्रीलंका आणि सिंगापूर या पूर्व आशियायी देशांमध्ये निर्यात काहीशी वाढल्याने बाजाराला आधार.
प्रतिक्रिया
चाळींमध्ये कांदा सडण्याचे प्रमाण वाढत असले तरी घाईघाईने विक्री न करता टप्प्याटप्प्याने व नियोजनबद्ध विक्री करत आहोत. त्यामुळे चांगल्या दराचा फायदा मिळू शकतो. कांदा बाजारातील आवक नियंत्रणात ठेवण्याची गरज असून शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने विक्रीचे नियोजन केल्यास ते फायदेशीर ठरेल.
- मधुकर मोरे, कांदा उत्पादक शेतकरी, मोरेनगर, ता. सटाणा
महाराष्ट्राच्या तुलनेत इतर राज्यांमध्ये कांद्याची उपलब्धता कमी असल्याचा थेट फायदा नाशिकच्या कांद्याला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धस्थिती कमी झाल्याने बाजारात काहीसे सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, त्याचे अनुकूल परिणाम कांद्याच्या दरातील चढ-उतारांवर दिसून येत आहेत.
- मनोज जैन, कांदा व्यापारी व निर्यातदार, लासलगाव (नाशिक)
जिल्ह्यातील बाजारांतील दरस्थिती (तारीख व सरासरी दर रुपयांत)
बाजार समिती...२४ जून...२५ जून...२६ जून
लासलगाव...२१००...२१५१...२१००
पिंपळगाव बसवंत...२३००...२२२५...२२००
मनमाड...२०००...२१००...२१००...२१००
चांदवड...१९९०...२१००...लिलाव बंद
सटाणा...२०१०...२१५०...लिलाव बंद
येवला...२१००...२०००...लिलाव बंद
मुंगसे (मालेगाव)...२०५०...२२७५...लिलाव बंद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.