बाजार समितीतील
कांदा खरेदीचा फज्जा
केंद्राचे आदेशच नसल्याने राज्य सरकारच्या आदेशाचा फुटला फुगा
मुकुंद पिंगळे : ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक : कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा थेट बाजार समितीतून खरेदी करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले असले तरी प्रत्यक्षात मात्र नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी होतच नसल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाकडून बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदीचे अधिकृत आदेशच नसल्याचे ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’चे स्थानिक शाखा व्यवस्थापक सांगत आहेत. त्यामुळे पारदर्शकता आणण्यासाठी बाजार समितीमध्ये कांदा खरेदी घोषणेचा फज्जा उडाला आहे.
किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत २ लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र मंगळवारपर्यंत (ता. २३) केवळ ३ हजार टनांच्या आसपास कांदा खरेदी झाला आहे. अत्यंत संथ गतीने कांदा खरेदी सुरू असून शेतकऱ्यांसाठी ही चिंता वाढविणारी बाब आहे.
बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदीसाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठका, बाजार आवारात कांदा खरेदीच्या मुद्द्यावर बाजार शुल्क माफीचे आदेश आणि प्रशासनाच्या बैठका अशा सगळ्या हालचालींनंतरही प्रत्यक्षात बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी होत नसल्याचे समोर आले आहे.
कांदा खरेदी प्रक्रिया प्रत्यक्ष बाजार समितीमध्ये करण्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंत्री, आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत ६ जून रोजी बैठक घेतली. यानुसार बाजार समित्यांनी ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ संबंधित सहकारी संस्थांना खरेदीचे परवाने दिले. प्रशासनाने तयारी पूर्ण केली. पुढे बाजार समितीमध्ये काम सुरू झाल्याचे भासवले. मात्र एका आठवड्यातच ही सर्व प्रक्रिया कोलमडून पडली. आता ती ठप्प असून बाजार आवाराबाहेर खरेदी सुरू आहे.
चौकट ---
पण केंद्राकडून मंजुरीच नाही
बाजार समित्यांमध्येच कांदा खरेदी करा, अशा सूचना राज्य सरकारकडून केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाकडे पाठवण्यात आल्या; मात्र त्यावर गेल्या दोन आठवड्यांत कार्यवाही झाली नसल्याने हा गोंधळ वाढला आहे. यावर आता केंद्र-राज्य समन्वयाचा पूर्ण अभाव उघड झाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा देण्याऐवजी सरकारकडून केवळ राजकीय दिखावा केला जात असल्याची भावना शेतकऱ्यांत तीव्र झाली आहे. या बाबत पणन संचालक शरद जरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र होऊ शकला नाही.
प्रतिक्रिया ----
बैठकीत ठरल्यानंतरही आता दोन आठवड्यांनंतर बाजार समितीमध्ये कांदा खरेदी करणार नाही, हे नवीन नाटक सुरू झाले आहे. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असून, सर्व सावळागोंधळ दिसून येत आहे. केंद्र व राज्य सरकारने यात योग्य सूचना देऊन तातडीने बाजार समितीमध्येच खरेदी होऊन पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करावा.
- भास्कर भगरे, खासदार
बाजार समितीमध्येच कांदा खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार बाजार समितीने सहकार्य करण्याची भूमिका दाखवत परवाने दिलेले आहेत. त्यानुसार बाजार समितीमध्येच खरेदी होणे अपेक्षित आहे.
- संदीप जाधव, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक
केंद्र आणि राज्य शासनाने ठरविल्याप्रमाणे ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ने कांदा खरेदी ही बाजार समितीमध्ये केली पाहिजे. त्यातून स्पर्धा निर्माण होईल, शेतकऱ्यांना चांगला भाव, बाजारभाव मिळेल. अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करू.
- आमदार दिलीप बनकर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.