पाकिस्तानला ताटकळवत ठेवले
माजी सरसेनाध्यक्ष अनिल चौहान यांचा गौप्यस्फोट
नवी दिल्ली, ता. ५ (वृत्तसंस्था) : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय संरक्षण दलांच्या अचूक माऱ्यामुळे पाकिस्तानची दाणादाण उडाली. त्यामुळे त्यांनी अनपेक्षितपणे १० मे रोजी सकाळी शस्त्रसंधीसाठी संपर्क साधला; मात्र त्यावेळी निम्म्यापेक्षा जास्त लष्करी उद्दिष्टे पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे, पाकिस्तानला ताटकळवत ठेवले आणि दुपारनंतर त्यांच्या प्रस्तावाला प्रतिसाद दिला, असा गौप्यस्फोट माजी सरसेनाध्यक्ष (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी केला आहे.
चौहान यांनी एका कार्यक्रमात याविषयी प्रथमच ही माहिती दिली. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २५ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी भारताने सात मे २०२५ रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले आणि पाकिस्तानवर जोरदार हल्ल्यांना सुरुवात केली. यामध्ये ‘लष्करे तैयबा’ आणि ‘जैशे महंमद’चे नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानने ड्रोन आणि हवाई हल्ल्यांनी भारतीय लष्करी तळांना हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यातील बहुतांश हल्ले निष्फळ ठरले. त्याचबरोबर भारताने हल्ल्यांची व्याप्ती वाढविताना पाकिस्तानी लष्करी आस्थापनांनाही लक्ष्य केले. त्याविषयी चौहान म्हणाले, ‘‘पाकिस्तानी लष्कराच्या महासंचालकांनी (लष्करी कारवाई) १० मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता संपर्क करण्यात आला आणि तातडीने शस्त्रसंधी करण्याची विनंती करण्यात आली. हा संघर्ष सुरूच राहिला, तर आणखी वेगाने पराभव होईल, अशी भीती पाकिस्तानला वाटत होती. मात्र, आपली निम्मी लष्करी उद्दिष्टे पूर्ण झाली नव्हती, त्यामुळे कारवाई पुढेही सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आम्हाला हा विजय अधिक निर्णायक हवा होता.’’
पाकिस्तानच्या प्रस्तावाचे आश्चर्य
भारताकडून कारवाई होत असताना, नऊ मे रोजी पाकिस्तानात भारतविरोधी वातावरण होते. त्यामध्ये पुढील ४८ तासांमध्ये भारताला धडा शिकवू, अशी भाषा वापरण्यात आली होती. त्यामुळे पाकिस्तानकडून आलेला प्रस्ताव आमच्यासाठी आश्चर्यकारक होता, असे चौहान यांनी नमूद केले. नऊ मेची रात्र ते १० मेच्या दुपारपर्यंत भारताने पाकिस्तानी लष्कराच्या ११ आस्थापनांवर हल्ले केले. यामध्ये हवाई तळ, लढाऊ विमानांचे हँगर, रडार आणि अनेक लढाऊ विमानांचा समावेश होता. यातून पाकिस्तानचे कोणतेही लष्करी केंद्र भारताच्या पल्ल्याबाहेर नाही, हा स्पष्ट संदेश गेल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
वेगवान आणि खोलवर हल्ले करून भारताचे नुकसान करता येईल, असा पाकिस्तानचा समज होता. मात्र, महत्त्वाच्या हवाई तळांवरील धावपट्ट्या उद्ध्वस्त झाल्याने पाकिस्तानला काहीच करता आले नाही. १० मे रोजी सकाळी पाकिस्तानने संपर्क साधण्यामागचे कारण भारताची हवाई ताकद होती.
- अनिल चौहान, माजी सरसेनाध्यक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.