‘आंदोलन थांबणार नाही’
विरोधी नेत्यांच्या बैठकीनंतर निर्धार; ज्ञानेशकुमारांच्या राजीनाम्याचे लक्ष्य
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १३ : ‘‘विरोधकांचे आंदोलन थांबणार नसून ते सुरूच राहील. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचा राजीनामा हेच लक्ष्य आहे,’’ अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आंदोलनाची पुढील रुपरेषा मांडली. दरम्यान, सर्व घटक पक्षांनी या आंदोलनासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला संपूर्ण पाठिंबा दर्शविला.
ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काल (ता. १२) दिल्लीत मोर्चा काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. त्यानंतर विरोधी नेत्यांनी आज राहुल गांधी यांच्या ५ सुनहरी बाग रोड या निवासस्थानी चहापानाच्या निमित्ताने एकत्र येत पुढील रणनीतीची आखणी केली. दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या बैठकीमध्ये आतापर्यंत झालेल्या आंदोलनांच्या प्रतिसादाचा आढावा घेण्याबरोबरच पुढील रणनीतीवर विचारमंथन झाले. या बैठकीत विरोधी पक्षनेत्यांसोबतच नागरी संघटनांचे, विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. याप्रसंगी, काँग्रेसचे आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी विरोधकांच्या एकजुटीकडे लक्ष वेधताना देशात लोकशाहीची पुनर्स्थापना करण्यासाठीचे आंदोलन सुरू असल्याचे प्रतिपादन केले. ते म्हणाले, ‘‘सर्वजण येथे एकजुटीने उभे आहोत. समांतर स्वरूपाची वेगवेगळी आंदोलने सुरू नाहीत. तर, हे एकच आंदोलन आहे आणि भारतात लोकशाहीची पुनर्स्थापना करणे त्याचे एकच उद्दिष्ट आहे.’’
लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी जंतरमंतर हे एकमेव ठिकाण होते. मात्र, आता लोकशाही मार्गाने आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी जंतरमंतरचा वापर करता येणार नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या भूमिकेला आव्हान देणार असल्याचेही राहुल गांधींनी स्पष्ट केले. राज्यघटनेची पायमल्ली करून सहजासहजी सुटका करून घेता येईल, असे वाटत असेल तर ते होऊ दिले जाणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला.
तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी लोकशाही वाचविण्यासाठी सर्व विरोधक एकजूट असून त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रकारचे बलिदान देतील, अशी ग्वाही दिली. तर सरकारने मतचोरीबरोबरच संघर्षाची आंदोलनाचे स्थान असलेल्या जंतरमंतरचीही चोरी केली असल्याचा चिमटा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस एम. बी. बेबी यांनी काढला. ज्ञानेशकुमार यांची हकालपट्टी होत नाही आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत विरोधक थांबणार नाही, असे तृणमूल काँग्रेसच्या नेत्या सागरिका घोष यांनी ठामपणे सांगितले.
नागरी संघटनांचे प्रतिनिधी असलेले ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. प्रशांत भूषण यांनी सरकारवर कडाडून टिका केली. ते म्हणाले, ‘‘ही लढाई मोठी आहे. संपूर्ण यूपीए, नागरी संघटना एकत्र आले आहेत. आता यापुढे शेतकरी संघटना, कामगार संघटना, विद्यार्थी संघटनाही यात सहभागी होतील.’’ विद्यार्थी नेत्या नेहा बोरा यांनीही सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडले.
........
देशातील लोकशाही नष्ट करण्यात आली आहे. निवडणूक व्यवस्था उद्ध्वस्त करण्यात आली आहे. राज्यघटनेच्या चिंध्या करण्यात आल्या आहेत. देशात लोकशाही शासनव्यवस्था खऱ्या अर्थाने पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आम्ही एकत्रितपणे लढत आहोत.
- राहुल गांधी,
विरोधी पक्षनेते, लोकसभा
‘दिल्ली ते गल्ली आंदोलन चालणार’
दिल्ली ते गल्लीपर्यंत आंदोलन चालू राहील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दिला. तसेच, महाराष्ट्रात काँग्रेस आणि शिवसेना (यूबीटी) यांच्यासोबतची आघाडी मजबूत असल्याचे सांगताना प्रत्येक भारतीयाला त्याचा हक्क देईपर्यंत ही लढाई सुरू राहील, असेही त्या म्हणाल्या. शिवसेनेचे (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी ज्ञानेशकुमार हे माफिया असल्याची तोफ डागली. राऊत म्हणाले, ‘‘ज्ञानेशकुमार यांनी संपूर्ण व्यवस्थेचे गुन्हेगारीकरण केले आहे. त्यांच्याशी कसे लढायचे आम्हाला माहिती आहे. १२ वर्षांपर्यंत मोदी, शहा यांनी देशाला घाबरवून राज्य केले. आता त्यांची घाबरण्याची वेळ आली आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली दिल्लीतला हा संघर्ष सुरूच राहील.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.