ओतूर, ता. २२ : ओतूर (ता. जुन्नर) येथे रविवारी श्री क्षेत्र काशी येथे जाऊन आलेल्या पायी पालखी सोहळ्याची भक्तिभावाने सांगता मिरवणूक काढण्यात आली. ओतूर येथून १७ डिसेंबर २०२५ मधून काशी येथे पायी पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले होते. आळेफाटा, संगमनेर, शिर्डी, मनमाड, धुळे, इंदौर, उज्जैन, देवास, भोपाळ, सागर, चित्रकुट, प्रयागराज असा प्रवास करीत शुक्रवारी (ता. १३) सोहळा काशी येथे पोहोचला.
काशी येथे पांडुरंग महाराज तळपे, संपत डोळझाके, दगडू ठेंगडे, धोंडिभाऊ मोरे यांची कीर्तन सेवा पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्वामी नारायण मंदिर गायघाट, मच्छोदरी पार्क वाराणसी येथे संपन्न झाली. रविवारी (ता. १५) महाशिवरात्री निमित्ताने सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांच्या पादुका पालखी सोहळ्याची काशी विश्वेश्वरला ग्रामप्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी सुमारे ११०० भाविक या सोहळ्यात सहभागी झाले होते. सोमवारी (ता. १६) काशी ते ओतूर असा परतीचा प्रवास सुरु झाला. रविवारी (ता. २२) ओतूर येथील पांढरी मारुती मंदिर येथे पानसरे परिवारातर्फे महापूजा होऊन पालखी सोहळा मिरवणुकीने सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज मंदिर येथे दाखल झाला. येथे मांडवी नदीमध्ये मुखवटा आणि पादुकांना स्नान घालण्यात आले. त्यानंतर मंदिरात पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली.
यावेळी पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांचा सत्कार नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य छाया तांबे, पंचायत समितीचे सदस्य प्रशांत डुंबरे, अक्षता पानसरे, सचिन घोलप, गीता डुंबरे, मोहित ढमाले, जालंदर पानसरे, पालखी सोहळा संस्थापक गंगाराम महाराज डुंबरे, अध्यक्ष गणपत डुंबरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बबन भोरे, शरद गाढवे, श्रीराम डुंबरे, लक्ष्मण घुले, प्रभाकर ठिकेकर, देविदास फापाळे, पांडुरंग ताजणे, विमल काशीद, किसन फापाळे, दत्तात्रेय वाघ, पंढरीनाथ पानसरे, जयंतराव डुंबरे, गोरख गाढवे, अंबादास झेंडे, उत्तम पानसरे आदी उपस्थित होते.