पिंपरी, ता. ५ : शहरातील ११७ बालके कधीच शाळेत गेली नसल्याचे महापालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. तर, आणखी सात बालके एक महिना किंवा त्यापेक्षा अधिक काळ अनियमित उपस्थितीमुळे शालाबाह्य आढळली. या सर्व १२४ बालकांना शाळेत दाखल केल्याचे महापालिकेने म्हटले आहे. मात्र, प्रवेशानंतर ही मुले नियमित शिक्षण घेत आहेत का, याचा तपशील उपलब्ध झालेला नाही.
महापालिकेने १५ ते ३० जुलै २०२६ या कालावधीत शाळाबाह्य, अनियमित उपस्थिती असलेल्या आणि स्थलांतरित बालकांचे सर्वेक्षण केले. त्यासाठी ७१ हजार ६८० कुटुंबांना भेटी देण्यात आल्या. तीन ते अठरा वर्षे वयोगटातील चार लाख एक हजार ३०६ बालकांची नोंद करण्यात आली. त्यामध्ये ६१ मुले आणि ६३ मुली शालाबाह्य आढळल्या. कधीच शाळेत न गेलेल्या ११७ बालकांमध्ये ६० मुले आणि ५७ मुली आहेत. सर्वेक्षणातून मुले शोधली गेली असली, तरी ही बालके शिक्षणापासून दूर का राहिली, त्यांच्यापर्यंत यापूर्वी यंत्रणा पोहोचली होती का आणि त्यांच्या प्रवेशातील अडथळे कोणते होते. त्यांना शाळेबाहेर ठेवणाऱ्या कारणांवर काय उपाय करण्यात आले, याची उत्तरे प्रशासनाकडे नाहीत.
स्थलांतरित मुलांचा मागोवा कुठपर्यंत?
शहरात स्थलांतर होऊन आलेल्या २२७ बालकांना शाळेत दाखल केल्याची नोंद आहे. अन्यत्र स्थलांतर झालेल्या १२५ पैकी ११७ बालकांना शिक्षण हमीपत्र देण्यात आले आहे. मात्र, त्यांना नव्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रवेश मिळाला का, याची माहिती महापालिकेने दिलेल्या आकडेवारीत नाही. उर्वरित आठ बालकांच्या हमीपत्रांची स्थितीही स्पष्ट नाही. बांधकाम मजुरांच्या कुटुंबांतील बालके, वारंवार स्थलांतर करणारी कुटुंबे आणि आर्थिक अडचणींमुळे शिक्षण खंडित झालेली मुले यांची स्वतंत्र माहितीही उपलब्ध नाही.
शाळेच्या पटावर नाव आले म्हणजे मूल शिक्षणाच्या प्रवाहात टिकले, असे समजता येणार नाही. पालकांचे स्थलांतर, आर्थिक अडचणी आणि मुलांवरील घरगुती जबाबदाऱ्यांचा विचार करावा लागेल. प्रवेश दिलेली किती मुले नियमित येतात आणि किती पुन्हा शालाबाह्य होतात, याचा मागोवा घेतल्याशिवाय मोहिमेचे यश ठरवता येणार नाही.
- प्राजक्ता रुद्रवार, अध्यक्ष, सहगामी फाउंडेशन
सर्वेक्षणात आढळलेल्या १२४ बालकांना शाळेत दाखल करण्यात आले आहे. मात्र, प्रवेशाबरोबरच त्यांची नियमित उपस्थिती टिकवणेही महत्त्वाचे आहे. स्थलांतरित बालकांचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी संबंधित शाळांमधील समन्वय आणि मुख्याध्यापकांना सूचना दिलेल्या आहेत.
- संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, महापालिका
आकडे काय सांगतात?
तपशील - बालके
एकूण शाळाबाह्य - १२४
कधीच शाळेत न गेलेली - ११७
दीर्घकाळ अनियमित उपस्थिती असलेली - ७
शहरात स्थलांतर होऊन आलेली - २२७
शहरातून अन्यत्र स्थलांतर झालेली - १२५
शिक्षण हमीपत्र दिलेली - ११७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.