पुणे

.

CD

लोगो : राष्ट्रहिताच्या नजरेतून
................................

युद्धपातळीवर यश; पण दूरदृष्टीने अपयश

इंट्रो
पाकिस्तानने भारताविरुद्ध लढलेल्या प्रत्येक युद्धात पराभव पत्करला आहे, तरीही विजयाचा दावा करण्यापासून तो कधीच थांबलेला नाही. आता आपण पुराव्यानिशी आढावा घेऊन पुढे काय अपेक्षित आहे, याचा अंदाज बांधू शकतो.

शेखर गुप्ता

भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या ८७ तासांच्या संघर्षाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध युद्धे कशी लढली आहेत, त्याचा इतिहास आपण पाहू. ‘तांत्रिकदृष्ट्या चमकदार, धोरणात्मकदृष्ट्या विनाशकारी’ हे त्याचे योग्य शीर्षक ठरू शकते. कारण सुरुवातीला जोरदार, कधी कधी नेत्रदीपक कामगिरी करूनही पाकिस्तान प्रत्येक युद्ध हरला आहे. यामुळे त्याने विजयाचा दावा करणे मात्र सुरूच ठेवले. आता आपण या स्तंभात पुराव्यानिशी ते पाहू.
प्रत्येक युद्ध किंवा चकमकीचे पुनर्लेखन हे उपखंडातील एक लोकप्रिय वैशिष्ट्य आहे. फक्त पाकिस्तानमध्ये ते मोठ्या प्रमाणावर केले जाते. अगदी शालेय पाठ्यपुस्तकांमध्येही हा विषय मांडला जातो. वर्षभरापूर्वीच्या ८७ तासांच्या संघर्षाकडे पाहा. पाकिस्तानमध्ये ‘फील्ड मार्शल’पासून ते राजकारणातील कनिष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांनाच वाटते की या लढाईत पाकिस्तान जिंकला. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या ‘विश्वासू मित्रा’चे केलेले समर्थन हे पाकिस्तानच्या या स्वयंघोषित ‘विजया’ला मिळालेली मान्यता मानली गेली. प्रत्यक्षात, मुनीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी पूर्वनियोजित आखणी केली होती. स्टीव्ह विटकॉफ यांचा मुलगा झॅक याची भेट आणि ‘क्रिप्टो करार’ पहलगाम हल्ल्यानंतर अवघ्या चार दिवसांनी आणि ‘ऑपरेशन सिंदूर’च्या जवळपास दोन आठवडे आधी झाला होता.
पहलगामची घटना घडवून आणताना मुनीर यांना माहिती होते की, भारत याला प्रत्युत्तर देणारच. त्यामुळे ट्रम्प कुटुंबाचा फायदा घेण्याची ही विलक्षण खेळी त्यांनी आधीच आखली होती. जगातील बहुतेक महत्त्वाच्या लोकांआधी हे ओळखल्याबद्दल त्यांना पूर्ण गुण द्यायला हवेत किंवा कदाचित सौदी अरेबियाने त्याला याबाबत दक्ष केले असावे. लढाई सुरू होण्यापूर्वीच त्यांनी ट्रम्प यंत्रणेला आपल्या प्रभावाखाली आणले होते आणि पहलगामबाबत त्याने १६ एप्रिल २०२५ रोजी परदेशातील पाकिस्तानी नागरिकांना दिलेल्या भाषणातून याचे संकेतही दिले होते. ट्रम्प यांना आपल्या बाजूला ठेवून काश्मीरचा मुद्दा पुन्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर आणणे हे त्याचे व्यापक धोरणात्मक उद्दिष्ट होते. त्यातील पहिले उद्दिष्ट पूर्णपणे यशस्वी झाले. मात्र, दुसरे अपयशी ठरले.

प्रत्युत्तराबाबत कल्पना

आता लष्करी पैलूकडे वळू. पाकिस्तानने हा संघर्ष मुद्दाम उकरून काढला होता आणि भारताकडून लष्करी प्रत्युत्तर येणार याची त्यांना आधीपासूनच कल्पना होती. त्यामुळे भारत कोणत्या लक्ष्यांवर हल्ला करू शकतो, याचाही त्यांना अंदाज होता. भारत कोणती साधने आणि तंत्र वापरणार याचीही त्यांना कल्पना होती. ७ मे रोजी मध्यरात्री १.०७ वाजता भारतीय हवाई दलाची विमाने उड्डाण करताच पाकिस्तान सज्ज होता. भारतीय हल्ले त्यांच्या भूभागाच्या आत खोलवर झाले, ते रोखण्यात त्यांना यश आले नाही. मात्र, त्यांचे मुख्य उद्दिष्ट ते नव्हते. त्यांची योजना हा संघर्ष केवळ हवाई चकमकीपुरता मर्यादित ठेवण्याची होती. मागील बाजूस तैनात ‘एईडब्ल्यू’ विमाने, ‘पीएल-१५’ क्षेपणास्त्रांनी सज्ज ‘जे-१०सी’ आणि ‘जेएफ-१७’ लढाऊ विमानांचा समन्वय याची पूर्वतयारी आणि सराव करून ठेवण्यात आला होता. त्यांना काही प्रमाणात यशही मिळाले आणि याच मुद्द्याचा पाकिस्तानने मोठा प्रचार केला. भारतानेही सर्वोच्च पातळीवर त्या रात्री काही विमानांचे नुकसान झाल्याची कबुली दिली. निवृत्त होत असलेल्या सरसेनाध्यक्षांनी तर याला ‘कूटनीतीतील चूक’ असेही म्हटले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलाने प्रत्युत्तराची आखणी केली.
सुरुवातीला पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेला निष्प्रभ करण्यासाठी ‘अँटी रेडिएशन’ ड्रोन हल्ले करण्यात आले आणि त्यानंतर पाकिस्तान हवाई दलाच्या सर्वाधिक संरक्षित हवाई तळांवर हवाई हल्ल्यांची मालिका राबवण्यात आली. त्यानंतर त्यांच्या क्षेपणास्त्रांची क्षमता काहीही असो, पाकिस्तान हवाई दलाची कोणतीही विमाने प्रत्युत्तरासाठी किंवा संरक्षणासाठी आकाशात झेपावली नाहीत. पाकिस्तानने शस्त्रसंधीची मागणी केली, तेव्हा दुसऱ्या बाजूला झालेल्या नुकसानीचे ठोस पुरावे फक्त भारताकडे होते. उपग्रहातील छायाचित्रांमधून पाकिस्तान हवाई दलाच्या किमान १३ तळांवर आणि तीन रडार केंद्रांवर नुकसान झाल्याचे दिसून आले. तरीही पाकिस्तान काही भारतीय विमाने पाडल्याच्या दाव्यावर हा विजय असल्याचे जगाला सांगत राहिला.
भारतीय लष्करी अधिकाऱ्याने याचे वर्णन अधिक संतुलित आणि क्रीडाभावनेतून केले. ‘ही जणू हॉकीची मॅच होती आणि आम्ही ३-१ ने जिंकलो. फरक इतकाच की त्यांचा गोल हा सेंटर फॉरवर्डने केलेला फील्ड गोल होता, तर आमचे तिन्ही गोल हे अचूक नियोजनातून साधलेले पेनल्टी कॉर्नर होते,’ असे त्याने म्हटले होते. पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्यांचे दावे मात्र कोणत्याही ठोस पुराव्याविना आहेत. भारतीय हवाई तळांच्या आसपास शहरे असल्याने तेथील हालचाली लपून राहत नाहीत आणि अशा कोणत्याही नुकसानीची उपग्रह छायाचित्रेही समोर आलेली नाहीत. त्यामुळे पाकिस्तानचे दावे हे केवळ प्रचारकी विधानांपुरतेच मर्यादित असल्याचे म्हटले जात आहे.

पाकिस्तानच्या मर्यादा
मी अलीकडच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करीत नाही, तर माझ्या मूळ मुद्द्याला बळकटी देत आहे. हा मुद्दा म्हणजे, पाकिस्तानची लष्करी विचारसरणी चांगली असली तरी ती केवळ रणनीतीच्या पातळीवर मर्यादित राहते. भारत कसा प्रतिसाद देईल, याचा दूरगामी अंदाज ती बांधत नाही. हे कदाचित अंगभूत अकार्यक्षमता, भारतीय लष्कराला कमी लेखण्याचा दृष्टिकोन किंवा या दोन्हींचा परिणाम असू शकतो. पाकिस्तानी लेखक शुजा नवाझ यांच्या ‘क्रॉस्ड स्वॉर्ड्स’ या पुस्तकातून हा मुद्दा स्पष्ट होतो. कारगिल युद्धाबद्दल लिहिताना ते सांगतात की, तत्कालीन वाजपेयी सरकार नेमका कसा प्रतिसाद देईल, याचा अचूक अंदाज व्यक्त केला होता. त्या इशाऱ्याला गांभीर्याने घेतले असते, तर पाकिस्तानला पराभव, माघार आणि आंतरराष्ट्रीय अपमान टाळता आला असता. रणनीतीच्या दृष्टिकोनातून कारगिल मोहीम अत्यंत प्रभावी होती. फसवणूक, नियोजन, गुप्तता, भूभागाची निवड आणि स्थानाचे महत्त्व या सर्व बाबतीत तिचे महत्त्व होते. मात्र, ‘जर भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले तर?’ या शक्यतेचा विचारच करण्यात आला नाही. त्यासाठी जी व्यापक धोरणात्मक दृष्टी लागते, तिचाच पाकिस्तानकडे अभाव असल्याचे दिसते. म्हणूनच कारगिल मोहिमेला ‘रणनीतीच्या दृष्टिकोनातून चमकदार; पण धोरणात्मकदृष्ट्या विनाशकारी’ असे म्हटले जाते.
भारतीय सशस्त्र दलांमध्ये कोणीही पाकिस्तानला पूर्णपणे अकार्यक्षम मानत नाही. मात्र, त्यांच्या विचारसरणीत व्यापक चित्रापेक्षा तात्कालीक यशाला अधिक महत्त्व दिले जाते. कारगिल अखेरीस पाकिस्तानसाठी धोरणात्मक पराभव ठरला, कारण त्यातून नियंत्रण रेषेला जागतिक मान्यता मिळाली. अगदी इस्लामाबाद विमानतळावरील आपल्या अल्प थांब्यातही अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी कॅमेऱ्यासमोर पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, भारतीय उपखंडातील नकाशावरील सीमा आता रक्त सांडून बदलल्या जाऊ शकत नाहीत.
आता पुलवामानंतरच्या घडामोडींकडे पाहूया. दहशतवादी चिथावणी देण्यासाठी नेहमी पाकिस्तानकडूनच पुढाकार घेतला जातो. त्यामुळे मोठ्या हल्ल्यानंतर भारत प्रत्युत्तरादाखल हवाई दलाचा वापर करेल, याची त्यांना पूर्ण कल्पना होती. म्हणूनच ‘ऑपरेशन स्विफ्ट रिटॉर्ट’ची आखणी करण्यात आली होती. यात २६ हून अधिक पाकिस्तानी लढाऊ विमानांचा वापर करून भारतीय हवाई दलाला अशा हवाई स्वरूपाच्या संघर्षात ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारताकडे यासाठी ना पुरेशी संख्या होती, ना आवश्यक मारक क्षमता. यासाठी कदाचित अनेक वर्षे तयारी आणि सराव करण्यात आला होता. आजही पाकिस्तान भारतीय हवाई दलाचे ‘मिग-२१’ विमान पाडल्याचा दावा करतो. ते त्यांच्या दृष्टीने यश असू शकते; पण धोरणात्मक पातळीवर पाहता भारतीय प्रतिबंधक क्षमता पुढील सात वर्षे कायम राहिली. हीच कथा यापूर्वीच्या युद्धांमध्येही दिसून आली आहे. ‘ऑपरेशन जिब्राल्टर’अंतर्गत सुमारे १० हजार पाकिस्तानी सैनिकांना नागरी वेशात काश्मीर खोऱ्यात घुसवण्यात आले. त्यानंतर ‘ऑपरेशन ग्रँड स्लॅम’द्वारे छांब आणि त्यानंतर अखनूर ताब्यात घेऊन काश्मीरला भारतापासून तोडण्याचा आणि सहज हस्तगत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कागदावर ही योजना अत्यंत प्रभावी होती. मात्र, पाकिस्तानच्या लष्कराच्या मुख्यालयात कुणीतरी अतिशय चुकीचा अंदाज बांधला होता. भारत काश्मीर गमावून शांत बसेल आणि युद्ध पंजाबपर्यंत वाढवणार नाही, असे त्यांना वाटले. भारतीय प्रतिसादाची पुरेशी कल्पना आणि तयारी त्यांच्याकडे नव्हती. त्याच युद्धात खेमकरण येथे रणगाड्यांच्या मदतीने केलेला अचानक हल्ला आजही उपखंडातील सर्वांत धाडसी रणगाडा मोहीम मानली जाते. मात्र, इतिहासात तिची नोंद एका अपयशाप्रमाणेच राहिली. कारण पुन्हा एकदा भारतीय प्रतिसादाचा अचूक अंदाज बांधण्यात पाकिस्तान अपयशी ठरला. त्या युद्धातील सर्वांत मोठी आणि निर्णायक लढाई म्हणजे पाकिस्तानच्या उत्कृष्ट रणगाडा दलाचा झालेला पराभव. पाकिस्तान आजही त्या युद्धात विजयाचा दावा करतो. मात्र, विरोधाभास असा की, ते ६ सप्टेंबर हा दिवस ‘डिफेन्स ऑफ पाकिस्तान डे’ म्हणून पाळला जातो. ज्या युद्धात त्यांनी स्पष्ट उद्दिष्ट ठेवून आक्रमण केले, त्याच युद्धात बचावात्मक भूमिका घेतल्याचा अभिमान त्यांच्या इतिहासकारांनी निर्माण केला आहे. काश्मीर लष्करी मार्गाने मिळवण्याची त्यांच्यासाठी ती अखेरची मोठी संधी होती आणि ती त्यांनी स्वतःच गमावली.
‘ऑपरेशन सिंदूर’बाबत वास्तव काहीही असले, तरी पाकिस्तानने त्यातून चुकीचे धडे घेतले आहेत. वाढत्या राजनैतिक भ्रमामुळे ही मानसिकता अधिकच बळावेल. सहा महिन्यांपूर्वी आपण कल्पना केली होती त्यापेक्षा लवकरच एखादी नवी चिथावणी किंवा कारवाई होऊ शकते, याची तयारी भारताने ठेवली पाहिजे.
पाकिस्तानने ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या स्वतःच्या प्रचारावर सामूहिकपणे विश्वास ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यांना आता वाटू लागले आहे की, जग एकतर त्यांच्यावर अवलंबून आहे किंवा इतर प्रश्नांत ते इतके गुंतले आहे की त्यांच्याकडे लक्ष देणार नाही. इतिहास सांगतो की, अशा परिस्थितीत पाकिस्तानची सत्ताकेंद्रे रणनीतीच्या पातळीवर कितीही प्रभावी वाटली तरीही राजकीय आणि धोरणात्मक पातळीवर सर्वांत मोठ्या आणि शेवटी आत्मघातकी ठरणाऱ्या चुका करतात.

(अनुवाद : जयदीप पाठकजी )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT