पालच्या ‘रणांगणात’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
बाळासाहेब पाटील यांच्या वर्चस्वाला मनोज घोरपडे यांनी निर्माण केले आव्हान
उंब्रज, ता. २८ : कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील अत्यंत प्रतिष्ठेचा आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या पाल जिल्हा परिषद गटात निवडणुकीचा ज्वर शिगेला पोहोचला आहे. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषात पालीच्या खंडोबाचा आशीर्वाद घेऊन उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला असून, या गटात आता चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे वर्चस्व आणि आमदार मनोज घोरपडे यांनी निर्माण केलेले भाजपचे आव्हान, यात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पाल जिल्हा परिषद गटावर माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे खंदे समर्थक आणि पाल देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवराज पाटील यांची मजबूत पकड आहे. जिल्हा परिषद शिक्षण सभापती आणि पंचायत समिती सभापती अशी महत्त्वाची पदे भूषविलेल्या देवराज पाटील यांनी या गटात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीत या वेळी त्यांच्या विरोधात भाजप आणि शिवसेनेने तगडे आव्हान उभे केले आहे. असे असले तरी गटातील दांडगा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. गटात माधवराव काळभोर (भाजप), नयनेश निकम (शिवसेना), देवराज पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), शंकर सुखदेव वायदंडे (बसप), सविता भागवत कणसे (अपक्ष), देवराज धोंडिराम पाटील (अपक्ष) अशी लढत होणार आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने या गटावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आमदार मनोज घोरपडे यांच्या माध्यमातून गावात कोट्यवधींचा निधी खेचून आणण्यात भाजप यशस्वी ठरली आहे. भाजपचे सुरेश पाटील यांनी पाल ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवून या गटात ‘कमळ’ फुलवण्यासाठी भक्कम पाया रचला आहे. कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि आमदारांची रसद यामुळे भाजपने राष्ट्रवादीसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) कडून नयनेश बाबूराव निकम यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे मतांचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. याशिवाय बहुजन समाज पार्टीकडून शंकर सुखदेव वायदंडे आणि राष्ट्रीय समाज पक्षाकडून सविता भागवत कणसे यांनीही शड्डू ठोकल्याने ही लढत चौरंगी आणि अटीतटीची होणार आहे. गटातील दोन गणांमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यात थेट संघर्ष पाहायला मिळत आहे.
पाल गणात भाजपचे प्रमोद तानाजीराव कदम, राष्ट्रवादीचे (शपग) प्रताप रामचंद्र चव्हाण आणि शिवसेनेचे (शिंदे गट) प्रमोद आबासो ढाणे यांच्यात त्रिकोणी मुकाबला होत आहे. चरेगाव गणात भाजपने आपली पकड मजबूत केली आहे. येथे भाजपच्या धैर्यजा स्वप्नील माने, राष्ट्रवादीच्या (शपग) गांधारी सुरेश पुजारी आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) मुक्ता राहुल जाधव यांच्यात लढत होत आहे. चरेगाव भागात बाळासाहेब पाटलांच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपचे पारडे जड दिसत आहे. सध्याच्या स्थितीत पाल जिल्हा परिषद गटात शिवसेना (शिंदे गट) रिंगणात असल्याने राष्ट्रवादीच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, ही फूट देवराज पाटील यांच्यासाठी निवडणूक सुकर करू शकते. मात्र, भाजपची वाढती ताकद आणि आक्रमक प्रचार पाहता हा विजय मिळवणे कोणासाठीही सोपे नाही.
चौकट
शिवसेनेचा फायदा कोणाला?
पाल जिल्हा परिषद गटात शिवसेना (शिंदे गट) कडून उमेदवारी देण्यात आल्याने मतांच्या विभाजनाचा फायदा देवराज पाटील यांना होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या मतांमध्ये फूट पडल्यास देवराज पाटील पुन्हा एकदा बाजी मारतील, असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. खंडोबाच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू झालेली ही राजकीय लढाई आता विकासाच्या मुद्द्यांवरून वैयक्तिक प्रतिष्ठेपर्यंत पोहोचली आहे. पालच्या जनतेचा कौल ‘घड्याळाला’ (किंवा अपक्ष देवराज पाटील) मिळणार की कमळाला, हे येत्या
काही दिवसांत स्पष्ट होईल.
----------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.