पंढरपुरातील कॉरिडॉरसाठी १० कोटींच्या तरतुदीला स्थगिती
नगरपालिका सर्वसाधारण सभेत अनेक विषयांवर सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खडाजंगी
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. २७ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या विठ्ठल मंदिर परिसर व वाणिज्य सुंकल विकास आराखड्यासाठी अंदाज पत्रकामधील १० कोटी रुपयांच्या तरतुदीला नगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांनी विरोध केल्याने ती रक्कम अंदाज पत्रकातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. नगराध्यक्षा प्रणिता भालके यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. २७) नगरपालिकेची पहिलीच वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. सभेतील अनेक विषयांवर सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.
दरम्यान, नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोडके यांनी २७३ कोटी ४७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मांडला. पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकाला नगरसेविकांनी मंंजुरी दिली. विशेष म्हणजे ३ लाख ५६ हजार रुपये शिलकी असलेल्या अंदाजपत्रकामध्ये कोणतीही करवाढ करण्यात आली नाही. त्यामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सभेच्या सुरवातीला मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी २०२६-२७ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प मांडला. यामध्ये २७३ कोटी ४७ लाख ५६ हजार रुपये जमा तर २७३ कोटी ४४ लाख रुपये खर्च झाले. निव्वळ ३ लाख ५६ हजार रुपयांची शिल्लक दाखविण्यात आली आहे. विठ्ठल मंदिर परिसरातील प्रस्तावित काॅरिडाॅरसाठी अंदाजपत्रकामध्ये १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावर नगरसेवक राहुल शिंदे, ओंकार जोशी व इतर सदस्यांनी आक्षेप घेत ही तरतूद रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर नगराध्यक्षांच्या सहमतीने ही तरतूद रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शासन तरतूद करून स्थानिक लोकांना व लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवत आहे. काॅरिडाॅरला आमचा विरोध असल्याचे यावेळी नगरसेवक राहुल शिंदे यांनी सभागृहात सांगितले.
नगरपालिकेच्या अनेक जागांचे करार संपले आहेत, अशा जागांचा आढावा घेऊन नगरपालिकेने त्या स्वतःच्या ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी नगरसेवक ओंकार जोशी केली. शहरातील अतिक्रमण आणि झोपडपट्टीच्या विषयावर नगरसेविका उज्ज्वला भालेराव व नगरसेवक संजय बंदपट्टे यांच्यामध्ये खडाजंगी झाली. अतिथिगृहाच्या १० लाख रुपयांच्या तरतुदीवरूनही नगरसेवक भागवत बडवे यांनी प्रश्न उपस्थित करत, नगरपालिकेच्या पैशाची उधळपट्टी थांबवावी तसेच मागील नऊ वर्षांतील कामांची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणीही बडवे यांनी केली. शासनाकडून मिळणाऱ्या यात्रा अनुदान खर्चाचा तपशील जाहीर करावा; तसेच जिजामाता उद्यानाच्या कामाचे परीक्षण करावे. या कामामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे नगरसेवक संजय बंदपट्टे यांनी सभागृहात सांगितले.
चर्चेमध्ये उपनगराध्यक्ष महादेव भालेराव, नगरसेवक नागेश भोसले, प्रसाद कळसे, सौरभ थिटे, सुजित सर्वगोड, अमोल डोके, उज्ज्वला भालेराव यांनी सहभाग घेतला.
---
चाैकट
उपनगराध्यक्ष अन् विषय समिती सभापतींना नवे दालन द्या; अन्यथा...
नगराध्यक्षांनी दोन दालने घेतली आहेत. दालनाला कुलूप लावले जाते. यापूर्वी असे कधी कुलूप लावले नाही. उपनगराध्यक्ष व विषय समितीच्या सभापतींना तातडीने नवीन दालने उपलब्ध करून द्यावीत; अन्यथा पालिकेच्या पोर्चमध्ये बसून कामकाज करू, असा इशारा नगरसेवक लक्ष्मण शिरसट यांनी दिला. त्यावर वेळेत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.