लोगो : विशेष मुलाखत
---
UPR26B07557
प्रणिता भालके
---
पंढरपूरला राष्ट्रीय धार्मिक पर्यटन केंद्र बनविण्याचा संकल्प
नगराध्यक्षा प्रणिता भालके : पुढील ५० वर्षांचा विकास आराखडा तयार करण्याची तयारी
भारत नागणे : सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. २७ : देशात आणि राज्यात भाजपचे सरकार असतानाही पंढरपुरात मात्र तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून प्रणिता भालके यांनी ऐतिहासिक असा विजय मिळवला. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम देखील नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी केला आहे. उच्चशिक्षित असलेल्या भालके यांनी पंढरपूर शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा ठाम निर्धार केला आहे. येत्या पाच वर्षांत पंढरपूर शहर धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. शहराच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून निधी खेचून आणण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे नगराध्यक्षा भालके यांनी सांगितले. पंढरपूर शहराच्या विकासासंदर्भात त्यांनी ‘सकाळ’शी विशेष संवाद साधला.
---
प्रश्न : पंढरपूर शहराच्या विकासासाठी येत्या पाच वर्षातील आपले व्हीजन काय असणार आहे?
- पंढरपूर हे आध्यात्मिक शहर आहे. येथे श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी हजारो भाविक येतात. शहरातील व बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना पंढरपूर शहर हे स्वच्छ व सुंदर दिसले पाहिजे. यासाठी शहर धूळ आणि खड्डेमुक्त करण्यासाठी पहिले प्राधान्य दिले आहे. त्या दृष्टीने कामाचे नियोजन केले आहे. शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शहर व परिसरात स्वच्छता ठेवण्याला नेहमीच प्राधान्य असणार आहे. शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पुढील पन्नास वर्षांचा विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. पंढरपूर हे देश पातळीवर धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकासित करण्याचे माझे स्वप्न आहे आणि मी ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आहे.
---
प्रश्न : पंढरपूर शहरातील ड्रेनेजचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही, त्याबाबत काय नियोजन आहे?
- पंढरपूर शहराबरोबरच उपनगरांची संख्या वाढत आहे. सर्व भागात ड्रेनेजची सोय करण्यासाठी नगरविकास खात्याकडे नवीन प्रस्ताव पाठवणार आहे. पूर्वीच्या ड्रेनेजच्या पाइप्स लहान आहेत, त्यामुळे ड्रेनेज तुंबण्यामुळे तेच घाण पाणी रस्त्यावर येते. या समस्येतून कायमची सुटका करण्यासाठी मोठ्या पाइप्स टाकण्याची गरज आहे. नवीन उपनगरे निर्माण झाली आहेत. अशा भागातही ड्रेनेजची सोय केली जाणार आहे. यासाठी नगरविकास खात्याकडे नवीन प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. लवकरच नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे.
---
प्रश्न : शहरातील पार्किंगसाठी काय उपाययोजना केल्या आहेत?
- पंढरपूर शहरातील व बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरात वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. शहरात सुसज्ज असे पार्किंग तयार करण्यात येणार आहे. सध्याच्या पार्किंगची जागा कमी पडत आहे. शहरात आणखी काही मोकळ्या जागांचा शोध घेऊन योग्य ठिकाणी मुंबई- पुण्याच्या धर्तीवर कायमस्वरूपी सुसज्ज असे पार्किंग उभारले जाणार आहे. पार्किंगसाठी मोकळ्या जागेचा शोध घेण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत.
---
प्रश्न : क्रीडा संकुलासाठी काय प्रयत्न सुरू आहेत?
- पंढरपूर शहरात भव्य असे क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रस्ताव तयार आहे. तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.
मागील अनेक वर्षांपासून शहरातील नागरिकांची क्रीडा संकुलाची मागणी आहे. नवोदित खेळाडूंसाठी क्रीडा संकुलाची गरज देखील आहे. त्या दृष्टीने भव्य असे सर्व सोयींनी युक्त क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. लवकरच क्रीडा संकुलाचा प्रश्न सुटेल अशी खात्री आहे.
---
प्रश्न : महिला भाविकांसाठी स्वच्छतागृहे पुरेशी आहेत का? त्यासाठी काय उपाययोजना सुरू आहेत?
- श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या महिलांना मुख्य रस्त्यांच्या बाजूला किंवा इतर ठिकाणी पुरेशा प्रमाणात शहरात स्वच्छतागृहे नाहीत. विशेषतः चंद्रभागा नदी व मंदिर परिसरात स्वच्छतागृहांची अधिक गरज आहे. पूर्वीची स्वच्छतागृहे आहेत पण ती मंदिरापासून दूर अंतरावर आहेत किंवा मुख्य रस्त्यापासून बाजूला आहेत. त्यामुळे महिला भाविकांची गैरसोय होते. त्यांची गैरसोय दूर करण्यासाठी स्टेशन रोड, नवी पेठ रोड, भक्ती मार्ग, प्रदक्षिणा मार्ग आदी ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. महिला भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी, धूळ व खड्डेमुक्त रस्ते या समस्या आमच्या अजेंड्यावर आहेत. पंढरपूरकरांनी शहराच्या विकासासाठी साथ द्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.