PDR26B09383
पंढरपूर : माघी एकादशीनिमित्त चंद्रभागा नदीत स्नानासाठी झालेली भाविकांची गर्दी. (छायाचित्र: राजकुमार घाडगे, पंढरपूर)
PDR26B09381
पंढरपूर : श्री विठ्ठलाची नित्यपूजेप्रसंगी उपस्थित श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य व व्यवस्थापक संदेश भोसले.
पंढरीत अडीच लाखांहून अधिक वैष्णवांचा मेळा
माघी एकादशीनिमित्त भक्तिमय वातावरण; पदस्पर्श दर्शनासाठी १२ ते १४ तासांचा अवधी
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. २९ : माघी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये सुमारे अडीच लाखांहून अधिक वैष्णवांचा मेळा जमला होता. एकादशीदिवशी चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी लाखो भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. चंद्रभागा नदीचे वाळवंट, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग श्री विठ्ठलाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग गुरुवारी दुपारी गोपाळपूर रस्त्यापर्यंत गेली होती. तर श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी जवळपास १२ ते १४ तासांचा अवधी लागत होता.
आषाढी, कार्तिकी यात्रेनंतर येणाऱ्या माघी यात्रेला वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. माघी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच शेजारील कर्नाटकामधून मोठ्या संख्येने भाविक पंढरीमध्ये दाखल झाले होते. एकादशीदिवशी चंद्रभागेच्या पवित्र स्नानाची पर्वणी लुटण्यासाठी वैष्णवांनी भल्या पहाटेपासूनच गर्दी केली होती. त्यामुळे चंद्रभागा नदीचा परिसर भाविकांनी फुलून गेला होता. स्नानानंतर विविध संतांच्या दिंड्या नगरप्रदक्षिणेसाठी प्रदक्षिणा मार्गावर दाखल होत होत्या. या वेळी टाळ-मृदंगाच्या गजरात वैष्णवांकडून केल्या जात असलेल्या ज्ञानेश्वर माऊली तुकाराम... बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठलच्या जयघोषाने प्रदक्षिणामार्ग दुमदुमून गेला होता. त्यामुळे अवघे वातावरण भक्तिमय झाले होते.
माघी शुध्द जया एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची नित्यपूजा संपन्न झाली. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. शिवाजीराव मोरे तर रुक्मिणीमातेची नित्यपूजा मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. यावेळी सदस्या शकुंतलाताई नडगिरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, लेखाधिकारी मुकेश अनेचा व विभाग प्रमुख संजय कोकीळ उपस्थित होते.
चौकट...
भाविकांना खिचडी अन् चहाचे वाटप
श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर रस्त्यापर्यंत गेली होती. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेतील भाविकांना साबुदाण्याची खिचडी व चहाचे वाटप करण्यात आले. श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन मंदिराबाहेर आलेले भाविक सदानंद नारायण गौड पाटील (रा.कडबगट्टी, ता. अळणावर, जि. धारवाड) सकाळशी बोलताना म्हणाले, आम्ही बुधवारी रात्री आठ वाजता दर्शन रांगेमध्ये उभे होतो. सुमारे १४ तासानंतर सकाळी दहा वाजता श्री विठ्ठलाचे दर्शन प्राप्त झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.