लीड-------------------- रज्य सरकार चार हजार एकशे पन्नास कोटी रुपये खर्चून पंढरपुरात भव्य मंदिर कॉरिडॉर उभारणार आहे. प्रचंड गर्दी, अव्यवस्था आणि अनियोजन यामुळे श्रद्धेने येणाऱ्या वारकऱ्यांना जणू ‘बेदखल’ केल्यासारखी परिस्थिती अनेक दशकांपर्यंत होती. वारीनंतरची अस्वच्छता आणि इतर बाबतीत गेल्या १५ वर्षांत मोठे सकारात्मक बदल झाले. तरीही दर्शन ही केवळ धावपळ आणि रांगेतील प्रक्रिया बनल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर कॉरिडॉर ही संकल्पना एक आशा जागवते. पण, कॉरिडॉरच्या आराखड्याकडे पाहता हा केवळ ‘सिमेंटचा कॉरिडॉर’ वाटतो. संतांचे विचार रुजविण्याचा आराखडा आहे कुठे? यासाठी महाराष्ट्राच्या मातीत यशस्वी झालेला शेगाव कॉरिडॉर समजून घेणार का? कारण पंढरपूर हे केवळ मंदिर नाही; ती महाराष्ट्राच्या आत्म्याची भूमी आहे. येथे उभा राहणारा कॉरिडॉर फक्त सिमेंट, रस्ते आणि दिव्यांचा प्रकल्प ठरू नये. तो संतांच्या विचारांचा, समतेचा, सेवाभावाचा आणि अध्यात्माचा जिवंत अनुभव बनला, तरच या हजारो कोटींच्या विकासाला खरा अर्थ प्राप्त होईल.
----------------------------------------
पंढरपुरात व्हावा संतविचारांचाही कॉरिडॉर!
व्यापक सूचना, सहभाग आवश्यक
१) वारीचा अनुभव, संतवाङ्मय, अभंग, कीर्तन, ध्यान, पर्यावरण, सेवा आणि समता या मूल्यांना आधुनिक तंत्रज्ञान व नियोजनाची जोड देऊन पंढरपूर कॉरिडॉर उभा राहिला, तर तो जगासाठी आदर्श आध्यात्मिक मॉडेल बनू शकतो
२) केवळ प्रशासन नव्हे, तर वारकरी, मठसंस्था, अभ्यासक, स्थानिक नागरिक, वास्तुविशारद आणि सांस्कृतिक तज्ज्ञ अशा सर्व स्तरांतून व्यापक सूचना व सहभाग आवश्यक
३) पंढरपूर कॉरिडॉरमध्ये हजारो कोटींची पायाभूत कामे प्रस्तावित; पण संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, चोखामेळा यांच्या विचारांचे जतन आणि प्रसार यासाठी नेमकी कोणती योजना आहे, हा मूलभूत प्रश्न
४) वारी केवळ धार्मिक यात्रा नाही. समता, सेवा, संयम आणि अध्यात्म यांचे लोकशिक्षण आहे. आज अनेक राजकीय नेते संतांच्या नावाने भाषणे करतात; पण संतविचार समाजात रुजविण्यासाठी ठोस धोरण दिसत नाही
मूळ उद्दिष्टाकडेच दुर्लक्ष
- सध्याचा कॉरिडॉर आराखडा हा केवळ रस्ते, इमारती किंवा सुशोभीकरणापुरता मर्यादित
- पंढरपूरला त्याचे मूळ आध्यात्मिक उद्दिष्ट पुन्हा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न कॉरिडॉरमध्ये ठळक झालेला दिसत नाही
- काळाच्या ओघात अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये जीवनाला दिशा देणारे आध्यात्मिक ज्ञान, संत परंपरेचा स्पर्श आणि तीर्थयात्रेचा अंतर्मुख करणारा अनुभव मागे पडत चालला आहे
- मंदिरांमधील गर्दी वाढताना दिसत असली तरी त्याचा परिणाम माणसाचे जगणे उन्नत होण्यात होतो आहे का, हा गंभीर प्रश्न
- हजारो कोटी रुपये खर्चून होणाऱ्या कॉरिडॉर निर्मितीत भक्तांच्या वर्तमानातील समस्यांचा विचारच झालेला नाही
- कॉरिडॉर संकल्पनेत मंदिर परिसराकडे केवळ विकास प्रकल्प म्हणून नव्हे, तर आध्यात्मिक अनुभव क्षेत्र म्हणून पाहण्याची गरज
व्यापक संकल्पना
- उज्जैन येथील महाकाल लोक कॉरिडॉर पाहता तेथे भक्ताला केवळ दर्शन होत नाही, तर संपूर्ण परिसरातून भारतीय आध्यात्मिक परंपरेचे भव्य, दिव्य आणि सांस्कृतिक दर्शन घडते. तीर्थयात्रा अविस्मरणीय अनुभव बनते आणि भक्ताच्या मनावर सकारात्मक परिणाम घडवते.
- पंढरपूरच्या बाबतीत ही संकल्पना आणखी व्यापक होऊ शकते. कारण पंढरपूर हे फक्त मंदिर नाही; ती संतांची भूमी, वारीची परंपरा आणि समतेचा संदेश देणारे आध्यात्मिक विद्यापीठ आहे.
- संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, नामदेव, चोखामेळा, जनाबाई यांसारख्या संतांचा विचार जर कॉरिडॉरच्या प्रत्येक घटकात प्रतिबिंबित झाला, तर हा प्रकल्प केवळ दर्शन व्यवस्था सुधारणारा न राहता भक्ताच्या जीवनाला सकारात्मक परिवर्तन देणारा ठरू शकतो.
काही महत्त्वाचे प्रश्न
१) पंढरीत संत साहित्य अभ्यास केंद्र उभारणार का?
२) अभंग, कीर्तन, प्रवचनासाठी कायमस्वरूपी व्यवस्था असेल का?
३) वारकरी संस्कार केंद्र, डिजिटल संग्रहालय होणार का?
४) युवकांना संतविचारांशी जोडण्यासाठी कार्यक्रम असतील का?
शेगाव मॉडेल जवळचे
सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन हे पंढरपूर कॉरिडॉरमध्ये नावीन्य यावे यासाठी काशी कॉरिडॉरची पाहणी करणार आहेत. हा चांगला निर्णय आहे. पण, महाराष्ट्राच्या मातीशी आणि वारी परंपरेशी नाळ असलेले आणि देशासाठी यशस्वी आध्यात्मिक व्यवस्थापनाचा आदर्श ठरलेले शेगाव मॉडेलही आहे. सरकारी पैशांवर अवलंबून न राहता श्री गजानन महाराज संस्थानने स्वच्छता, शिस्त, यात्री निवास, अन्नछत्र, दर्शन व्यवस्था, शिक्षण आणि सेवा यांचे प्रभावी मॉडेल उभे केले आहे. त्यामुळे पंढरपूर कॉरिडॉर उभारण्यापूर्वी शेगाव मॉडेलचा अभ्यास करणार का? पंढरपूरला फक्त सुशोभीकरण नको; संस्कार मॉडेल हवे आहे. शेगावसारखी सेवा संस्कृती पंढरीत रुजविण्याचा आराखडा बनवणार का? हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.
कुठे-कसे?
शेगाव ........ पंढरपूर
- सेवा-केंद्रित व्यवस्थापन ........ मोठा सरकारी प्रकल्प
- स्वच्छता व शिस्त ........ गर्दी व अव्यवस्था
- आध्यात्मिक अनुभव ........ प्रामुख्याने दर्शन व्यवस्था
- स्वयंप्रेरित संस्कार ........ अजून स्पष्ट आराखडा नाही
याचा व्हावा विचार
- अभंग ऑडिओ गॅलरी
- डिजिटल संत संग्रहालय
- ध्यान केंद्र, कीर्तन चौक
- वारी अनुभव केंद्र
- युवकांसाठी संत साहित्य ग्रंथालय
- ‘सेवा संस्कार’ स्वयंसेवक मॉडेल
- प्लास्टिकमुक्त वारी अभियान
-----------------------------------------------
३९९३ कोटी
पंढरपूर कॉरिडॉर
५७९.२७ कोटी
मंदिर परिसर विकास
१३८७.९१ कोटी
शहर विकास
२०२६.७२ कोटी
भूसंपादन व पुनर्वसनास
५५ हजार ९३४ चौ.मी.
भूसंपादन
दोन ते तीन वर्षांत पूर्ण
भूसंपादन ते हस्तांतरण
२८८ कोटी
वारकऱ्यांसाठी सुविधेसाठी
१०० कोटी
पाच पालखीतळांसाठी
३६ कोटी
नऊ मंदिराच्या संवर्धनासाठी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.