पान १० - ११ साठी
०००००००००००००००००००
कृषिक्षेत्रातील दुर्गा
--------
सेंद्रिय शेतीचे धडे देणारी आजी
पप्पम्मल यांचा जन्म १९१४ मध्ये ब्रिटिश भारतातील तत्कालीन मद्रास प्रांतातील कोईमतूर जिल्ह्यातील देवलापुरम या गावात झाला. लहान वयातच आई-वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर त्यांचे आणि त्यांच्या दोन बहिणींचे पालनपोषण ठेकमपट्टी येथे त्यांच्या आजीने केले. ‘रंगम्मल’ हे त्यांचे दुसरे नाव होते आणि स्थानिक परिसरात त्या या नावानेही ओळखल्या जात. आजीकडून मिळालेल्या संस्कारांमुळे लहानपणापासूनच त्यांचे जीवन कष्ट, स्वावलंबन आणि शेतीशी जोडले गेले. पुढे ठेकमपट्टी हेच त्यांचे कायमचे कार्यक्षेत्र बनले. भवानी नदीच्या परिसरातील या गावात त्यांनी आयुष्याचा मोठा काळ शेती करत घालवला.
पप्पम्मल यांचे औपचारिक शिक्षण इयत्ता दुसरीपर्यंत झाले. त्या काळात गावात नियमित शाळाही नव्हत्या. त्यामुळे त्यांचे प्राथमिक ज्ञान पल्लांगुळी (बियांच्या खेळाची पारंपरिक पद्धत) यांसारख्या खेळांतून आणि रोजच्या व्यवहारातून घडले. मात्र पुढे तमिळनाडू कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या प्रशिक्षण वर्गांना त्या आवर्जून हजर राहत आणि तिथे नेहमी प्रश्न विचारणाऱ्या हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखल्या जात. विद्यापीठाचे कुलगुरूही त्यांना अभिमानाने आपली ‘विद्यार्थिनी’ आणि ‘अग्रणी शेतकरी’ म्हणत असत.
आजीकडून वारशाने मिळालेल्या एका छोट्या किराणा दुकानातून पप्पम्मल यांच्या स्वावलंबी आयुष्याची सुरुवात झाली. त्यांनी हे दुकान चालवले, सोबतच एक छोटे उपाहारगृहही सुरू केले. यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी हळूहळू दहा एकर शेतजमीन विकत घेतली आणि तिथे कडधान्ये, मका यांची लागवड सुरू केली. पुढे वयोमानानुसार काही जमीन त्यांनी विकली, तरी अखेरपर्यंत त्यांच्याकडे अडीच एकर जमीन शिल्लक होती, जिथे त्या स्वतः रोज राबत असत.
उल्लेखनीय कार्य ः
पप्पम्मल यांनी संपूर्ण आयुष्यभर एकही रासायनिक खत किंवा कीटकनाशकाचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने शेती केली. त्यांच्या अडीच एकर शेतात त्या बाजरीसारखी भरडधान्ये, कडधान्ये, भाजीपाला, मका आणि केळी पिकवत असत. त्यांचे शेत तमिळनाडू कृषी विद्यापीठाच्या गृहविज्ञान आणि कृषी विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श प्रात्यक्षिक शेत बनले होते.
२००७ साली स्थानिक कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ठेकमपट्टी गावातील महिला शेतकऱ्यांचा पहिला स्वयंसहायता गट स्थापन केला. त्यामुळे महिलांना संसाधने, ज्ञान आणि सेंद्रिय निविष्ठांसाठी एकत्रित सौदाशक्ती मिळाली. १९५९ साली तमिळनाडू पंचायत कायद्यांतर्गत झालेल्या पहिल्याच पंचायत निवडणुकीत त्या ठेकमपट्टी पंचायतीच्या सदस्य म्हणूनही निवडून आल्या होत्या. करोना महामारीच्या काळातही कृषी विज्ञान केंद्राच्या उपक्रमांतील त्यांचा सक्रिय सहभाग कायम राहिला. आजची तरुण पिढी झटपट निकालाच्या मागे धावते आणि सेंद्रिय शेतीसाठी लागणारा संयम तिच्याकडे नाही, अशी खंतही त्या अनेकदा व्यक्त करत.
पुरस्कार आणि सन्मान ः
सेंद्रिय शेतीतील योगदान, महिला शेतकऱ्यांना कृषीविषयक उपक्रमांशी जोडणे आणि शेतीतील नव्या पद्धतींचा स्वीकार व प्रसार यासाठी पप्पम्मल यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. २०२१ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले. पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्या १०५ वर्षांच्या होत्या आणि तरीही शेतीच्या कामात सक्रिय होत्या. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यामागे केवळ त्यांचे दीर्घायुष्य नव्हते, तर दीर्घकाळ सेंद्रिय शेतीशी जोडलेले राहणे, महिला शेतकऱ्यांना संघटित करणे आणि कृषीविषयक ज्ञानाचा प्रसार करणे हे त्यांच्या कार्याचे महत्त्वाचे पैलू होते.
२७ सप्टेंबर २०२४ रोजी ठेकमपट्टी येथे पप्पम्मल यांचे निधन झाले. त्यांच्या वयाबाबत विविध वृत्तांत १०८ आणि १०९ अशी नोंद आढळते; मात्र त्या शंभरी ओलांडूनही शेतीशी जोडलेल्या राहिल्या, याबाबत सर्व स्रोत सहमत आहेत. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पप्पम्मल यांच्या कृषी, विशेषतः सेंद्रिय शेतीतील योगदानाची दखल घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
पप्पम्मल यांचा जीवनप्रवास सांगतो की, शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नाही; ती माणसाला मातीशी, निसर्गाशी आणि समाजाशी जोडणारी जीवनपद्धती आहे. शंभरी पार करूनही शेतीशी असलेले नाते त्यांनी जपले. महिलांना शेतीच्या मुख्य प्रवाहात आणले आणि सेंद्रिय शेतीचा आग्रह आयुष्यभर कायम ठेवला. वयाची मर्यादा शरीराला असू शकते; पण मातीवरचे प्रेम, कष्ट करण्याची तयारी आणि नव्याने शिकण्याची जिद्द यांना मर्यादा नसते, हे पप्पम्मल यांनी आपल्या जीवनातून दाखवून दिले. म्हणूनच त्यांचा प्रवास आजच्या तरुण शेतकऱ्यांसाठी आणि विशेषतः महिला शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो. मातीशी आयुष्यभर नाते जपत, सेंद्रिय शेतीची वाट दाखवणाऱ्या पप्पम्मल आजी म्हणूनच कृषिक्षेत्रातील प्रेरणादायी ‘दुर्गा’ म्हणून सदैव स्मरणात राहतील.
---------------------
डॉ. रिता शेटीया, ९२७१२१३५४१ (वेळ : दुपारी १२ ते ४)
(लेखिका अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.