वाईत पालकांना लेखक तांबेंकडून धडे
मंगल आनंद विद्यालयातर्फे व्याख्यान; मुलांना मराठी माध्यमातून शिकवावे
वाई, ता. १७ : शब्दाचे अर्थ सृष्टीत लपलेले असतात, ते शोधावे लागतात. मुले अनुभवातून आणि अनुभूतीतून शिकतात. त्यांची चूक म्हणजे वेगळा विचार असतो. मुलांनी काढलेले चित्र आपण समजून घेतले पाहिजे, असे सांगून लेखक राजीव तांबे यांनी पालकांशी संवाद साधला.
निषाद एज्युकेशन फाउंडेशनच्या मंगल आनंद विद्यालयाने लोकमान्य टिळक ग्रंथालयाच्या रमेश गरवारे सभागृहात आयोजिलेल्या व्याख्यानात ‘मुलांचा अभ्यास आणि पालक’ या विषयावर ते बोलत होते. श्री. तांबे म्हणाले, ‘‘गृहपाठ म्हणजे घरातून करायचा अभ्यास. मुले आपणहून शिकतात, त्यांना शिकवावे लागत नाही. हवेमध्ये अक्षर गिरवणे, ही लिहिण्याची पहिली पायरी असायला हवी. मुलांना मराठी माध्यमातून का शिकवायचे, याची त्यांनी दोन महत्त्वाची कारणे सांगितली. भाषा ही संस्कृतीसोबत शिकावी लागते. आपण घरात मराठी भाषेत बोलतो आणि ऐकतो. आपल्या भाषेतून मुलांना विचार स्पष्टपणे मांडता येतात. त्यांना मातृभाषेतून शिकणे आणि समजणे सुकर होते. इंग्रजीमधून व्यक्त होताना मुलांना शब्द संपत्ती कमी पडते.’’
मुले हट्टी का होतात, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘मुलांना एखादी गोष्ट नाही म्हणून सांगितले, तर त्यावर ठाम राहा. त्याने कितीही आदळआपट केली तरी नाही म्हणजे नाही मिळणार, हे त्याला कळले पाहिजे. अन्यथा त्यांना हट्ट करण्याची सवय लागते.’’ मुलांचे कौतुक करण्यापेक्षा त्यांच्या कृतीचे कौतुक करा, असाही मंत्र त्यांनी दिला. वाईतील मंगल आनंद विद्यालयामध्ये मराठी माध्यमाचे शिक्षण दिले जाते, याचे त्यांनी कौतुक केले.
विद्यालयाच्या संस्थापक व संचालिका निशा किर्लोस्कर यांनी प्रास्ताविकात शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शाळेत खेळातून आनंददायी शिक्षण दिले जाते. तीन ते सहा वर्षांच्या मुलांना दर महिन्याला होणाऱ्या प्रकल्पातून मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, जीवन व्यवहार हे विषय शिकवले जातात, याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमास डॉ. शरद अभ्यंकर, नागेश मोने, डॉ. राजेंद्र प्रभुणे, सुलभा प्रभुणे तसेच शहर व परिसरातील पालक, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
----
26B07466, 26B07467
वाई : पालकांशी संवाद साधताना लेखक राजीव तांबे.