पारनेरकरांच्या पाण्यासाठी
नागरिकांचे आंदोलन
पारनेर, ता. १९ : शहराला शुद्ध व नियमित पिण्याचे पाणी मिळावे यासाठी मुळा धरणाच्या बॅकवॉटरमधून प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेला तातडीने मंजुरी देऊन निधी द्यावा, या मागणीसाठी मार्तंड नाना पठारे विचार मंचाचे दीपक मार्तंड पठारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. बुधवारी (ता.१९) उपोषणाचा दुसरा दिवस आहे. शहरासाठी मुळा धरणातून कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्याची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेसाठी मुळा धरणातील पाण्याचा स्रोत निश्चित करण्यात आला असून, बॅकवॉटरमधून पाइपलाइनद्वारे पाणी पारनेर शहरापर्यंत आणण्याचे नियोजन आहे. नगरविकास विभागाकडून प्रकल्प अहवालाला तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला; मात्र निधीची तरतूद निश्चित न झाल्याने पुढील निविदा प्रक्रिया अद्याप झाली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. नगरपंचायतीने सहा लाख रुपये खर्च करून सर्वेक्षण केले आहे. मुळा धरणातून कायमस्वरूपी पाणी आणण्यासाठी ७३ कोटी ८४ लाख ४२ हजार १२३ रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. योजनेच्या तांत्रिक मंजुरीसाठी शासन नियमानुसार ७२ लाख ८७ हजार २७७ रुपये भरल्याचेही निवेदनात म्हटले आहे. मंजुरी प्रक्रियेला दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरवात झालेली नाही. योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्न, पाणीपुरवठा योजनेची वर्क ऑर्डर अद्याप निघालेली नाही.