सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २४ : पवना धरणातून पाणी सोडले जात आहे; पण रावेत बंधाऱ्यात आवश्यक पाणी पोहोचत नाही. बंधाऱ्याची पातळी घसरल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. महापालिकेचे अधिकारी पाणीचोरीकडे बोट दाखवत आहेत, तर जलसंपदा अधिकारी दहा टक्के कपात करून पाणी सोडत असल्याचे सांगत आहेत. मग धरणातून सोडलेले पाणी जाते कुठे? कपात दहा टक्क्यांची असताना पुरवठ्याचे नियोजन का कोलमडले? दोन्ही विभागांच्या स्पष्टीकरणांत नागरिकांच्या नळाला पाणी कधी मिळणार, हा मूळ प्रश्न मात्र कायम आहे.
पवना धरणातून नदीपात्रात सोडलेले पाणी रावेत बंधाऱ्यातून उचलून महापालिका शहराला पुरवते. बंधाऱ्यातील पाणीपातळी कमी झाल्याने या व्यवस्थेलाच फटका बसला आहे. शहरातील काही भागांचा पुरवठा विस्कळित झाला असून, काही ठिकाणी पाण्याच्या वेळा अचानक बदलल्या आहेत. आधीच दिवसाआड पाण्याची वाट पाहणाऱ्या नागरिकांना आता बदललेल्या वेळापत्रकाचाही सामना करावा लागत आहे.
पाणी किती पोहोचते याचे गणित नाही
कपातीपूर्वी महापालिका पवनेतून दररोज ५४० दशलक्ष लिटर पाणी उचलत होती. या प्रमाणावर दहा टक्के कपात म्हणजे ५४ दशलक्ष लिटरची घट होते. त्यानुसार पवनेतून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे गणिती प्रमाण ४८६ दशलक्ष लिटर ठरते. मात्र, रावेतमध्ये प्रत्यक्ष किती पाणी पोहोचले आणि महापालिकेने किती उचलले, याच आकड्यांत सध्याच्या विस्कळित पुरवठ्याचे उत्तर दडले आहे.
चोरी होत असेल, तर कारवाई कुठे ?
पवना धरण ते रावेत पंपिंग स्टेशनदरम्यान पाणीचोरी होत असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हा दावा गंभीर आहे. शहरासाठी सोडलेल्या पाण्याचा अनधिकृत उपसा नेमका कुठे होतो? तो कोण करतो? किती पाणी चोरले जाते आणि किती जणांवर कारवाई झाली? पाणीचोरीचे कारण सांगून प्रशासनाची जबाबदारी संपत नाही. चोरी रोखून शहराचे पाणी रावेतपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, असाही सवाल उपस्थित होत आहे.
कपातीची माहिती होती; नियोजन कुठे कमी पडले?
जलसंपदा विभागाच्या म्हणण्यानुसार धरणातून दहा टक्के कपात करून पाणी सोडले जात आहे. कपातीचे प्रमाण ठरलेले असताना त्यानुसार पाणीउपसा आणि वितरणाचे नियोजन झाले का? रावेतची पातळी घसरत असताना दोन्ही विभागांनी कोणती पावले उचलली? पाणी कमी पडल्यावर कारणे सांगणारी यंत्रणा, पुरवठा विस्कळित होण्यापूर्वी काय करत होती, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
--------
पवना धरणातून दररोज पाणी सोडण्यात येत आहे. ५४० एमएलडी पाणी सोडण्यात येत होते. १० टक्के कपातीनंतर ४८६ एमएलडी पाणी सोडण्यात येत आहे. त्याची दैनंदिन नोंदही ठेवण्यात येते.
- रजनीश बारिया, शाखा अभियंता, पवना धरण
----------
पवना नदीवरील महापालिकेच्या रावेत येथील जलउपसा केंद्रावरील पाणीपातळी शुक्रवारी अचानक कमी झाली आहे. धरणातून येणारे पाणी कमी आल्याचा अंदाज आहे. त्यासाठी पवना नदीतूनच पाणीचोरी होत असल्याची शंका आहे. त्यासाठी शोधपथके तैनात करण्यात येणार असून पाणीचोरीचा शोध घेण्यात येणार आहे.
- अजय सूर्यवंशी, सहशहर अभियंता, महापालिका
---
दृष्टिक्षेपात
पवना नदीतून उचलण्यात येणारे दररोजचे प्रमाण
- कपातीपूर्वी पवनेतून पाणी उपसा - ५४० एमएलडी
- दहा टक्के कपात - ५४ एमएलडी
- कपातीनंतरचे गणिती प्रमाण - ४८६ एमएलडी
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.