रावेत, ता.१६ : पवना नदीचे प्रदूषण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. रावेत बंधारा, मामुर्डी आणि किवळे परिसरातील सुमारे ३५ सोसायट्यांमधील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) बंद असल्याने तेथील मैलापाणी, सांडपाणी विनाप्रक्रिया नाल्यांवाटे थेट नदीपात्रात सोडले जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. त्यामुळे तिची दखल घेऊन पाणी नमुने तपासणीसाठी पाठवले जातील. आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येतील, असे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने स्पष्ट केले आहे.
पवना नदी ही शहराच्या पाणी पुरवठ्याची जीवनवाहिनी मानली जाते. रावेत येथील प्रभाग क्र.१६ मध्ये महानगरपालिकेचा २० एमएलडी क्षमतेचा मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) असून तो सुरळीत सुरू आहे. तेथे मैलामिश्रित पाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध झालेले पाणी पवना नदीत सोडले जाते. मात्र, आजूबाजूच्या सोसायट्यांमधून थेट नाल्यांत सोडण्यात येणाऱ्या मैलापाणी, सांडपाण्यामुळे नदीतील पाण्याची गुणवत्ता घसरत असून पर्यावरणाबरोबरच नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. याच नदीतील पाणी शुद्ध करून पिंपरी चिंचवडकरांना पिण्यासाठी पुरवले जाते. त्यामुळे ही बाब अधिक गंभीर मानली जात आहे.
फक्त पावसाळ्यातच पाणी
नाल्यांमध्ये पाणी प्रत्यक्षात केवळ पावसाळ्यात नैसर्गिकरीत्या वाहते. मात्र, अनेक ठिकाणचे नाले बाराही महिने वाहताना दिसतात. मात्र इतर महिन्यांत नाल्यांत सांडपाणी, घरगुती मैला, व्यावसायिक वापरातील दूषित पाणी किंवा औद्योगिक सांडपाण्याचा समावेश असण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत त्यातून दुर्गंधी, अस्वच्छता व आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
नागरिकांच्या मागण्या
- नदी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने तपासणी मोहीम राबवावी
- बंद एसटीपी प्रकल्प त्वरीत सुरू करावेत, दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई करावी
- भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात
प्रक्रिया का आवश्यक ?
- जलप्रदूषणाची समस्या गंभीर बनू शकते
- दूषित पाण्यामुळे नदीतील जैवविविधतेवर परिणाम
- पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची गुणवत्ता खालावते
- जलजन्य आजारांचा धोका वाढतो
नालेसफाईची कामे सुरू आहे. काही ठिकाणी चेंबर खराब आहेत. काही ठिकाणी नागरिकांनी ते फोडलेले आहे. प्रभाग क्र.१६ मध्ये सर्व नाल्यांची सफाई जेसीबीच्या सहाय्याने केली जात आहे. लवकरच सर्व नाल्यांची सफाई पूर्ण होईल.
- सुधीर वाघमारे, आरोग्य निरीक्षक, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय
रावेत भागात महानगरपालिकेचा २० एमएलडी मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) आहे. त्यामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी नदीत सोडले जात आहे. संपूर्ण शहरात एकूण १४६ सोसायट्यांचे एसटीपी प्रकल्प बंद आहेत. त्यामध्ये रावेतमधील काही सोसायट्यांचाही समावेश आहे. त्यांना आपण नोटिसा दिल्या आहेत. पहिल्या १५ दिवसांमध्ये सोसायट्यांनी स्वतःचे ‘एसटीपी’ प्रकल्प व्यवस्थित सुरू केले नाहीत, तर पिण्याच्या पाण्याचे जोड तोडण्याचे आदेश काढले जातात. प्रदूषण नियंत्रणासाठी पर्यावरण विभाग आणि जलनिस्सारण विभागासोबत समन्वय साधून संयुक्त तपासणी मोहीमही राबविण्याचा विचार आहे.
- संजय कुलकर्णी, शहर अभियंता, पर्यावरण विभाग
पवना नदीमधून दुर्गंधी येत आहे. तिच्या पाण्याचा रंगही बदललेला दिसत आहे. हेच पाणी प्रक्रिया करून पिण्यासाठी दिले जाते. ही बाब भीतीदायक आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करावी.
- अमोल शिंदे, रहिवासी, रावेत
लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. दूषित पाण्यामुळे आजार वाढतील, अशी भीती वाटते. सांडपाणी थेट नदीत सोडणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे.
- वैशाली कदम, नागरिक, किवळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.