पोवई नाक्याची वाट बिकट
रस्त्यांवर खड्डेच खड्डे; वाहनचालकांचा जीव टांगणीला
शाहूनगर, ता. २८ : शहराची ओळख असणाऱ्या आणि बाजारपेठेचा मुख्य भाग असणाऱ्या पोवई नाका येथील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. आठ रस्त्यांनी जोडलेल्या या भागातील वायसी कॉलेज ते पोवई नाका या मार्गिकेची मोठ्या प्रमाणात खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना दररोज मोठा त्रास सहन करावा लागत असून, हा परिसर खड्डेमुक्त करण्यासाठीचा आराखडा पालिका तसेच बांधकाम विभागाने राबवणे आवश्यक आहे.
गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात खड्ड्यांमुळे होणारी गैरसोय दूर करण्यासाठी पालिकेने तसेच बांधकाम विभागाने शहरातून गेलेल्या रस्त्यांची डागडुजी, दुरुस्ती केली होती. यामुळे नागरिकांचा त्रास काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र, डागडुजी, दुरुस्ती केलेल्या रस्त्यांवर पुन्हा एकदा खड्डे तयार झाले आहेत. यामुळे या ठिकाणाहून जाताना नागरिकांना दररोज मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
आठ रस्ते एकमेकांना जोडले जात असल्याने पोवई नाक्यावर इतर भागांच्या तुलनेत वाहनांची संख्या दिवसभर जास्तीची असते. यापैकी वायसी कॉलेज ते पोवई नाका या मार्गिकेवर खड्ड्यांची संख्या जास्तीची आहे. नाका परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी याठिकाणी तैनात असतात. अनेकदा त्यांच्या कामकाजावर देखील विविध कारणांनी मर्यादा येत असतात. त्यातच खड्ड्यांमुळे वाहतूक खोळंबल्यास त्यांना दररोज जास्तीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यांच्यासह नागरिक, वाहनधारकांचा त्रास कमी करण्यासाठी पोवई नाक्यासह इतर भागातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पालिका तसेच बांधकाम विभागाने आराखडा करणे आवश्यक आहे.
.........
खड्डा चुकवायचा, की समोर बघायचे?
वायसी कॉलेजकडून पोवई नाक्याकडे येणाऱ्या वाहनांची संख्या दिवसभर जास्तीची असते. या मार्गिकेवर अनेक वाहनधारक दररोज घुसखोरी करत पेट्रोल पंपाकडे जात असतात. समोरून येणाऱ्या वाहनांमुळे नियमांचे पालन करत येणाऱ्या वाहनधारकांना मोठा धोका निर्माण होतो. त्यातच याठिकाणी खड्डे जास्त असल्याने खड्डे बघायचे का समोरून येणाऱ्यावर लक्ष द्यायचे? असा प्रश्न चालकांना पडतो.
.............
हे व्हावे...
एकेरीतील वाहनांची घुसखोरी थांबवावी.
कायमस्वरूपी वाहतूक कर्मचाऱ्याची नेमणूक
पेट्रोल पंपालगतचा रस्ता तात्पुरता करावा बंद
रस्त्याकडेला अस्ताव्यस्त वाहनांवर व्हावी कारवाई
.....................
रस्त्यावरील खड्डे
सातारा : पोवई नाक्याजवळील रस्त्याची खड्ड्यांमुळे झालेली चाळण. (प्रमोद इंगळे : सकाळ छायाचित्रसेवा).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.