पान ८ - तातडीने
०००००००००००००००००००००००००००००००
छंदाला दिले व्यवसायाचे रुप
--------------
छंदाला प्रक्रिया उद्योगामध्ये बदलले तर त्यातून कुटुंबाच्या आर्थिक सक्षमतेचा उद्देशही साधता येतो, हा विश्वास रुजविण्यात अमरावती येथील प्रतिभा गजानन तायडे यशस्वी ठरल्या आहेत. माहेरी लोणचे तयार करण्याच्या मिळालेल्या बाळकडूतून प्रोत्साहन घेत त्यांनी तब्बल २४ प्रकारची लोणची तयार करण्यावर भर दिला आहे. राज्य -परराज्यातही त्यांच्या लोणच्यांना चांगली मागणी आहे.
-------------------
विनोद इंगोले
-----------------------
प्रतिभा तायडे यांचे माहेर हे वाडेगाव (अकोला). वाडेगाव हे लिंबू उत्पादनासाठी राज्यात सर्वदूर प्रसिद्ध आहे. याच गावात बालपण गेलेल्या प्रतिभाताईंच्या कुटुंबीयांची आमराई होती. त्यावेळी आई मनकर्णाबाई तसेच आजी व्दारकाबाईंकडून त्यांना लोणचे तयार करण्याचे बाळकडू मिळाले. त्यांच्याच वारसा जपत प्रतिभाताईंनी या क्षेत्रात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. प्रतिभाताईंचा विवाह १९८६ मध्ये तेल्हारा (जि. अकोला) येथील गजानन गुलाबराव तायडे यांच्यासोबत झाल्यानंतर अमरावती येथे त्या स्थायिक झाल्या. त्यांचे पती गजानन तायडे हे खासगी शिक्षण संस्थेत प्राध्यापक होते. प्रतिभाताईंना विविध पदार्थ तयार करण्याची आवड असल्याने २००८ मध्ये एका स्पर्धेत त्यांनी सहज सहभाग नोंदविला आणि त्यांनी तयार केलेली लोणची आणि इतर खाद्य पदार्थांनी सर्वांनाच भुरळ घातली. परीक्षकांनी सर्वोत्कृष्ट खाद्यपदार्थ म्हणून त्यांनी तयार केलेल्या पदार्थांची निवड केली आणि त्यांचा पहिल्यांदा सन्मान झाला.
लोणचे निर्मितीला सुरवात ः
प्रतिभाताई अमरावती येथे एका अपार्टमेंट राहतात. त्यांच्यात एक सुगरण दडलेली असल्याचे अनेकांना माहिती होते. त्यामुळेच याच अपार्टमेंटमधील एका कुटुंबाने त्यांना पाच किलो लोणच्याची ऑर्डर दिली. कुटुंबातील सदस्यांना मात्र घरी सर्व मुबलकता असताना अशा प्रकारच्या व्यवसायाची गरज काय ? अशी सुरुवातीला भूमिका घेतली होती. परंतु कुटुंबातील कोणालाच न कळू देता पहिल्या लोणच्याच्या मागणीचा त्यांनी पुरवठा केला. लोणच्याच्या चवीने संबंधित कुटूंबाला भुरळ घातल्याने त्यांच्याकडून इतरांपर्यंत याची माहिती पोहोचली आणि व्यवसायाचा विस्तार झाला.
कुटूंबीयांच्या पाठबळानंतर प्रतिभा तायडे यांनी व्यावसायिकरित्या लोणचे निर्मितीला सुरवात केली. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन त्यांनी पाऊच आणि बॉटल पॅकींगवर भर दिला. यामध्ये त्यांना पती आणि मुलांकडून देखील मदत झाली. त्यामुळे अल्पावधीतच या लावलेल्या रोपाचे वटवृक्षात रूपांतर झाले. उत्पादीत लोणचे विक्रीसाठी त्यांना विविध शासकीय संस्थांकडून आयोजित प्रदर्शनांमध्ये स्टॉल लावण्यासाठीचा आग्रह होत होता. अमरावती येथे आयोजित एका प्रदर्शनात त्यांनी लोणचे विक्रीचा स्टॉल लावला होता. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूर (अमरावती) येथील गृहविज्ञान शाखेच्या प्रमुख डॉ.अर्चना काकडे यांनी प्रतिभाताईंशी संवाद साधला. त्यानंतर प्रतिभाताईंनी कृषी विज्ञान केंद्राने आयोजित विविध प्रशिक्षणात सहभाग नोंदविला. पुढील टप्यात ‘केव्हीके’च्या माध्यमातून अकोलासह विदर्भातील विविध जिल्ह्यामध्ये प्रशिक्षक म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली, यातूनच अनेक उद्योजिका तयार होत आहेत.
विविध चवीची लोणची ः
प्रतिभाताईंनी ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन २२ प्रकारची लोणचे तयार केली. त्यानंतर आता शेवगा शेंग आणि टोमॅटो अशा दोन प्रकारच्या नव्या लोणच्याच्या निर्मितीस सुरवात केली. सध्या कैरी, लिंबू, कैरी-तीळ, कैरीचे गोड लोणचे, बीन तेलाचे कैरी लोणचे, मधुमेहींसाठी स्पेशल लोणचे , लिंबाचे गोड, लिंबू क्रश, लिंबू मिरची, मिरची, करवंद, मिक्स, फणस, वऱ्हाडी ठेचा, आले-लसूण, हळद, कवठ, आवळा, कारले, भोकर, चणा, उपवासाचे लोणचे, साखर आंबा अशा विविध प्रकारच्या लोणचे उत्पादनावर त्यांचा भर आहे. प्रति किलो ४०० रुपये दराने लोणचे विक्री होते. दरवर्षी कैरीचे तीस टन, कवठाचे दहा टन लोणचे तयार केले जाते. बाकीची लोणची हंगामानुसार आणि मागणीनुसार तयार केली जातात. दर महिन्याला लोणचे विक्रीतून दीड लाखांची उलाढाल होते.
--------------------------
इन्फो ः
असे आहे मार्केटिंग
सुरुवातीला घरीच लोणचे महोत्सवाचे आयोजन करुन प्रतिभाताईंनी ग्राहकांच्यापर्यंत विविध प्रकारची लोणची पोहोचवली. या उपक्रमास मोठ्या प्रमाणावर ग्राहकांचा प्रतिसाद मिळाल्याने सहज विक्री होत होती. त्यानंतरच्या टप्प्यात राज्याच्या विविध भागात आयोजित कृषी प्रदर्शनांमध्ये सहभाग नोंदवत विक्रीवर भर देण्यात आला. अमरावती, बदलापूर, नागपूर, नाशिक, दिल्ली येथे सध्या विविध प्रकारची लोणची विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नाशिक येथील एका नामांकित हॉटेलमध्ये यांच्या लोणच्याचे खास दालन उभारण्यात आले आहे. विविध लोणच्यांची चव आवडलेल्या ग्राहकांकडून गेल्या काही वर्षात वाढती मागणी आहे.
सामाजिक कार्याचा वारसा ः
लोणचे व्यवसायातून नफा कमविणे हा एकमेव उद्देश प्रतिभा तायडे यांचा नाही. याउलट ग्राहकांना दर्जेदार शेतीमालापासून तयार उत्पादनांचा पुरवठा करण्यावर अधिक भर आहे. त्यासाठी तेलासह लोणचे तयार करण्यासाठी लागणारे घटक गुणवत्तापूर्ण असावेत, यावर लक्ष दिले जाते. सामाजिक कार्यातही तायडे कुटुंबीयांनी पुढाकार घेतला आहे. शेगाव (बुलडाणा) येथील गजानन महाराज संस्थानाला दरवर्षी एक क्विंटल लोणच्याची भेट देण्यात या कुटुंबाने सातत्य राखले आहे. तसेच गरजू लोकांना त्या जेवणाचा डबा देखील तयार करून देतात. प्रतिभाताई यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी विवाहीत असून ती डॉक्टर आहे आणि मुलगा आणि सून हे दोघेही बँकेत उच्चपदावर कार्यरत आहेत.
---------------
इन्फो ः
विविध पुरस्कारांनी सन्मान ः
प्रतिभा तायडे यांच्या उद्यमशीलतेची दखल घेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने जागतिक महिला दिनी गौरविण्यात आले. यासोबतच विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. अशाप्रकारे तब्बल २४ पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या आहेत.
-------------------------------------------
संपर्क ः प्रतिभा तायडे, ९०९६९ ९४१९६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.