रावेत, ता.१२ : मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असतानाच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आकुर्डी रेल्वे स्थानक परिसरातील नागरी आयुष्मान आरोग्य केंद्राचे उद्घाटन झाल्याने डॉक्टर, रुग्ण व कर्मचारी आता विविध समस्यांनी ग्रस्त झाले आहेत. केंद्राची वीजजोडणी अनधिकृत पद्धतीने खांबावरून घेतल्याचेही उघड झाले आहे.
नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने हे आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. त्याच्या पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण यंत्रणेचे काम अपूर्ण असतानाच जानेवारी महिन्यात त्याचे उद्घाटन करण्यात आले. केंद्रात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असूनही कर्मचाऱ्यांना स्वच्छतागृह वापरण्यासाठी इतर ठिकाणी जावे लागत आहे. विशेष म्हणजे येथे महिला कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्याने त्यांच्या गैरसोयी अधिक वाढल्या आहेत. इमारतीभोवती गवत वाढलेले असून कचरा व बांधकामाचा राडारोडा साचलेला आहे. इमारतीलगत पेव्हिंग ब्लॉक न बसवल्याने दगडांचा खच तयार झाला आहे. त्यामुळे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग व्यक्तींना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आरोग्य केंद्राशेजारील मोकळ्या जागेत संध्याकाळनंतर मद्यपी आणि गर्दुल्यांची वर्दळ वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिसरात मद्याच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या दिसून येतात. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आरोग्य केंद्रातील अडचणी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. येत्या काही दिवसांत आवश्यक सुविधा उपलब्ध होतील.
- डॉ. प्रतीक्षा फत्तेवार, आरोग्य अधिकारी
आरोग्य केंद्रातील काही सुविधांची कामे अपूर्ण आहेत. त्याबाबत संबंधित स्थापत्य विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.