पिंपरी, ता. ६ ः घरोघरचा कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट महापालिकेकडून लावली जात आहे. यासाठी ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. घंटागाडी कंत्राटदारांकडील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचा आणि दिलासादायक निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. २०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठी त्यांना दिवाळीनिमित्त विशेष बाब म्हणून प्रत्येकी ३० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे, असे स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी सांगितले.
घंटागाडी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान किंवा बक्षीस देण्यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी प्रशासनाने ठेवला होता. त्यास मंजुरी देण्यात आली. महापालिकेत १९९७ पासून घंटागाडी कर्मचारी आरोग्य विभागांतर्गत कचरा संकलनाची सेवा पुरवीत आहेत. त्यांना २००६ पासून दिवाळीनिमित्त विशेष बक्षीस दिले जात आहे. त्यानुसार महापालिका कर्मचारी महासंघ आणि घंटागाडी कंत्राटदारांनी २०२५-२०२६ साठी दिवाळीनिमित्त विशेष बाब म्हणून बक्षीस देण्याची विनंती केली होती. त्यामुळे प्रत्येकी ३० हजार रुपये देण्यास आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दोन नोव्हेंबरला मान्यता दिली होती. त्या प्रस्तावास स्थायी समितीनेही मंजुरी दिली आहे.
कचरा गोळा करून शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी घंटागाडी कर्मचारी अहोरात्र पार पाडत आहेत. त्यांच्या मेहनतीची दखल घेऊन सणासुदीला आर्थिक आधार देणे आवश्यक होते. त्यामुळे ३० हजार रुपयांचे दिवाळी बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे.
- अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती, महापालिका
वकिलांचे मानधन रोखले
नियमित मानधन घेऊनही महापालिकेच्या विरोधात खटले लढवणाऱ्या वकिलांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यांना आतापर्यंत दिलेले मानधन परत घेतले जाणार आहे, अशी माहिती महापालिका स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी दिली. महापालिकेच्या पॅनेलवर नियुक्त वकिलांनी आतापर्यंत महापालिकेच्या बाजूने किती खटले लढवले? किती खटले जिंकले? याचा सविस्तर लेखाजोखा (परफॉर्मन्स रिपोर्ट) प्रशासनाकडून मागवला आहे. वकिलांच्या कामगिरीची आणि खटला लढवण्याच्या भूमिकेची संपूर्ण माहिती मिळेपर्यंत त्यांच्या मानधनाचा विषय प्रलंबित ठेवला असल्याचे बारणे यांनी सांगितले.
आशा स्वयंसेविकांना सात ते १५ हजार
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेत झोपडपट्टी व झोपडपट्टीसदृश भागासाठी गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांना कामावर आधारित मोबदला दिला जातो. महापालिकेत कार्यरत स्वयंसेविकांना दिवाळीनिमित्त प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय स्थायी समिती सभेने घेतला आहे. त्यासाठी सप्टेंबर २०२५ ते ऑगस्ट २०२६ हा कालावधी गृहीत धरला आहे. या कालावधीत किमान सहा महिने अर्थात १८० दिवस कामकाज केलेल्या स्वयंसेविकांना भत्त्याचा लाभ मिळणार आहे. याअंतर्गत किमान सात हजार आणि कमाल १५ हजार रुपये मिळणार आहेत. हा खर्च वैद्यकीय विभागाकडील कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत ‘बोनस तथा सानुग्रह अनुदान’ लेखाशिर्षातून केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.