पिंपरी : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीत चांगला परतावा देण्याच्या नावाखाली साडेपाच लाखांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी विशाल मुकुंद नारखेडे (रा. रावेत) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादी यांच्याशी संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. विविध शेअर्सच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यावर पाच लाख ३८ हजार भरण्यास भाग पाडले. नंतर या रकमेचा अपहार करून फसवणूक केली.
कुलूप तोडून घरात शिरल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पिंपरी : दरवाजाचे कुलूप तोडून विनापरवानगी घरात शिरल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टी येथे घडला. या प्रकरणी पिंपरी येथील ८१ वर्षीय महिलेने संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजेश एकनाथ भाले (रा. जुना खडकी बाजार, खडकी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी या त्यांच्या मुलीकडे कासारवाडी येथे रहायला गेल्या असताना आरोपी हा फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून घरात शिरला. तीस हजार रुपये किमतीच्या घरगुती साहित्याची विल्हेवाट लावली.
मोबाईल हॅक करून तीन लाखांची फसवणूक
पिंपरी : एमएनजीएल गॅस एजन्सीमधून बोलत असल्याचे भासवून ॲप डाऊनलोड करण्यास सांगत मोबाईल हॅक करून ऑनलाइनद्वारे तीन लाखांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी चिंचवडगावातील ६० वर्षीय महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने फिर्यादी यांना व्हॅट्सॲपद्वारे कॉल करून आपण एमएनजीएल गॅस एजन्सीमधून बोलत असल्याचे भासवून पीडीएफ फाईलद्वारे एमएनजीएल ॲप डाऊनलोड करण्यास सांगून मोबाईल व बँक खाते हॅक केले. त्यानंतर फिर्यादीच्या बँक खात्यातून तीन लाख एक हजार रुपये काढून घेत आर्थिक फसवणूक केली.
गांजा विक्रीप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : विक्रीसाठी गांजा जवळ बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून गांजा जप्त केला. ही कारवाई वाल्हेकरवाडी येथे करण्यात आली. संजय हरिभाऊ कांबळे (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर शरण कांबळे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. संजय याच्याकडे गांजा असल्याची माहिती पथकाला मिळाली असता सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३४६ ग्राम गांजा व मोबाईल असा एकूण १८ हजार ३०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. हा गांजा त्याला शरण कांबळे याने विक्रीसाठी आणून दिल्याचे सांगितले.
एमडी पावडर बाळगणाऱ्याला अटक
पिंपरी : विक्रीसाठी एमडी पावडर हा अमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या एकाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई चिंचवडमधील मोहननगर येथे करण्यात आली. अशोक गणपत गायकवाड (रा. कामशेत, मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने त्याच्या ताब्यात १५४ ग्राम वजनाचा एमडी हा अमली पदार्थ जवळ बाळगला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन हा माल जप्त केला.
बनावट पार्टप्रकरणी एकावर गुन्हा
पिंपरी : एका कंपनीचे बनावट पार्ट तयार करून विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार हिंजवडीतील वेताळनगर येथे घडला. या प्रकरणी रेवणनाथ विष्णू केकाण (रा. काळेपडळ, हडपसर) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नीरज सुभाषचंद्र भाटिया (रा. प्रतापनगर, जयपूर, राजस्थान) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने फिर्यादी यांच्या कंपनीच्या स्वामित्व हक्काचे उल्लंघन करून तीन लाख २८ हजार ७२० रुपये किमतीच्या ऑटो मोबाइलचे बनावट पार्ट तयार करून विक्रीसाठी जवळ बाळगले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.