पुणे

स्मारक की मध्यवर्ती ग्रंथालय?

दीपेश सुराणा

पिंपरी - येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यामागे उभारलेली इमारत सावित्रीबाई फुले स्मारकासाठी प्रस्तावित असल्याची भूमिका सावित्रीबाई फुले स्मारक समितीची आहे. तर, या इमारतीत फक्त सावित्रीबाई फुले मध्यवर्ती ग्रंथालय प्रस्तावित होते, असा महापालिका प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळे या इमारतीत ग्रंथालयासाठी जागा ठेवून महापालिकेचे काही विभाग स्थलांतरित करण्याचे नियोजन आहे.

इमारतीची रचना व नियोजन
सुमारे १० ते ११ हजार चौरस फूट बांधकाम क्षेत्र
पहिला भाग : पार्किंग आणि दोन मजले, दुसरा भाग : पार्किंग आणि चार मजले 
पूर्वीचे नियोजन
मध्यवर्ती ग्रंथालय
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित संग्रहालय
सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह

सध्याचे नियोजन
एक मजला मध्यवर्ती ग्रंथालयासाठी राखीव
उर्वरित जागेत शिक्षण मंडळ, माध्यमिक शिक्षण विभाग, पर्यावरण, एलबीटी, आकाशचिन्ह व परवाना विभाग, नागरवस्ती विभाग, क्रीडा विभाग आणि क्रीडा ग्रंथालय तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करणार

महापालिका प्रशासनाची भूमिका
कार्यालय स्थलांतर करण्याचे कारण : महापालिका इमारतीत कार्यालयांना अपुरी पडत असलेली जागा
कार्यालये स्थलांतरित झाल्याने होणारा फायदा : महापालिका मुख्य इमारतीत चौथ्या मजल्यावर स्मार्ट सिटी अभियानासाठी स्वतंत्र कार्यालय करणे शक्‍य. बांधकाम परवानगी आणि नगररचना विभागासाठी प्रशस्त कार्यालये होतील. त्यामुळे नागरिकांची सोय होऊ शकेल.
तात्पुरत्या स्वरूपात कार्यालयांचे करणार स्थलांतर. महापालिकेसाठी दुसरी इमारत उभारल्यानंतर तिथे कार्यालये हलविण्यात येतील.

पिंपरी येथील महात्मा फुले पुतळ्यामागे उभारलेली इमारत ही सावित्रीबाई फुले स्मारकासाठी असल्याचा ठराव झालेला नाही. त्याबाबत चर्चा झालेली आहे. ‘महापालिका वापर’ असा इमारतीचा उद्देश आहे. तथापि, संबंधित इमारतीत सावित्रीबाई फुले यांचे स्मारक करण्याची सावित्रीबाई फुले स्मारक समितीची मागणी आहे. स्मारकासाठी ठराविक जागा ठेवून उर्वरित जागेत महापालिकेची काही कार्यालये स्थलांतर करण्याचा तोडगा काढला जाईल. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या समवेत याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.  
- नितीन काळजे, महापौर

 पिंपरी येथील संबंधित इमारतीचा तीन वर्षांपासून वापर झालेला नाही. महापालिकेची काही कार्यालये तात्पुरत्या स्वरूपात तेथे स्थलांतर करण्याचे नियोजन आहे. ‘महापालिका वापर’ या उद्देशाने ही इमारत उभारलेली आहे. इमारतीत सावित्रीबाई फुले मध्यवर्ती ग्रंथालय करण्याचे प्रस्तावित होते. तसा आराखडा आहे. सावित्रीबाई फुले स्मारकासाठी ही जागा असल्याचे कागदोपत्री दिसत नाही. महापौरांशी चर्चा करून याबाबत उचित निर्णय घेतला जाईल.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त

पिंपरी येथील महात्मा फुले पुतळ्यामागे उभारलेली इमारत ही सावित्रीबाई फुले स्मारकासाठी नियोजित आहे. तसा ठराव महापालिका सर्वसाधारण सभेत झालेला आहे. त्यामुळे या इमारतीत महापालिकेची प्रशासकीय कार्यालये नसावी, अशी आमची भूमिका आहे. महापौर नितीन काळजे व सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी याबाबत मार्ग काढण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यासाठी येत्या दोन-तीन दिवसांमध्ये सावित्रीबाई फुले स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांना ते चर्चेसाठी बोलाविणार आहेत.
- संतोष लोंढे, नगरसेवक

महापौर, आयुक्तांकडून इमारतीची पाहणी
पिंपरी येथील महात्मा फुले पुतळ्यामागे महापालिकेने उभारलेल्या इमारतीत मध्यवर्ती ग्रंथालय सुरू करण्याबरोबरच महापालिकेची काही कार्यालये स्थलांतरित करता येतील का, याविषयी महापालिका प्रशासनातर्फे बैठक घेऊन चाचपणी करण्यात आली. मात्र, याबाबत ठोस निर्णय झाला नाही. महापौर नितीन काळजे व सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी इमारतीची पाहणी केली. 

आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर काळजे, सत्तारूढ पक्षनेते पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे आदी बैठकीस उपस्थित होते. इमारतीत शिक्षण मंडळ, माध्यमिक शिक्षण विभाग, पर्यावरण, एलबीटी, आकाशचिन्ह व परवाना विभाग, नागरवस्ती विभाग, क्रीडा विभाग व क्रीडा ग्रंथालय स्थलांतरित करण्याचे प्रस्तावित आहे. त्याशिवाय या इमारतीत पूर्वी प्रस्तावित असलेले ग्रंथालय, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह यांच्यासाठी देखील येथे जागा ठेवण्याचे नियोजन आहे. महापालिकेची काही कार्यालये स्थलांतरित करणे, ग्रंथालय व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह आदींबाबत काय नियोजन करता येईल, याविषयी बैठकीत चर्चा झाली.

याबाबत महापौर नितीन काळजे म्हणाले, ‘‘पिंपरीतील महात्मा फुले पुतळ्यामागे असलेल्या इमारतीत ग्रंथालय, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह आदी बाबींची प्रथम पूर्तता केली जाईल. त्यानंतर महापालिकेची काही कार्यालये स्थलांतरित करण्याविषयी निर्णय घेतला जाईल. संबंधित इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली.’’

पिंपरीतील संबंधित इमारतीत वाचनालय, सांस्कृतिक केंद्र सुरू करण्याबरोबरच महापालिकेची काही कार्यालये स्थलांतरित करण्याबाबत काय करता येईल, याविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली. दोन्ही बाबी साध्य करण्यावर आमचा भर राहणार आहे.
- एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का! जैस्वालला ४ धावांवरच झाला आऊट

SCROLL FOR NEXT