मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा
पिंपरी : कामाच्या ठिकाणी झालेल्या वादातून माणमधील भोईरवाडी येथे एकाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी प्रशांत रोहिदास भोईर (रा. माण) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी कामाच्या ठिकाणी लॅपटॉपवर काम करत असताना आरोपी तिथे आले. त्यातील तीन दिवसांपासून कामाला लागलेल्या मुलाने फिर्यादीला शिवीगाळ करून मारले. तसेच इतरांनीही शिवीगाळ व मारहाण करत ‘तू जास्त शहाणा झाला आहे का?, आमच्या मुलांना काम करण्यास विरोध करणारा कोण तू’, असे फिर्यादीला धमकावले. एका आरोपीने प्लॅस्टिकची खुर्ची फेकून मारली. दरम्यान, फिर्यादीला मदत करण्यासाठी स्टोअरमधील अक्षय मोरे आले असता त्यांनाही आरोपीनी शिवीगाळ व मारहाण केली. तसेच एका आरोपीने फिर्यादीच्या कपाळावर दगड मारून त्यांना जखमी केले.
पिंपरीत तरुणावर कोयत्याने वार
पिंपरी : पिंपरी येथे एका तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. सुजल सुनिल कांबळे असे जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सुजल यांच्या आईने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तुषार देविदास साळवे, नीलेश टोपे आणि अन्य एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीचा मुलगा आणि त्याचे मित्र एका मेडिकलसमोर गप्पा मारत उभे असताना आरोपी तिथे आले. त्यांनी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. या दरम्यान नीलेशने त्याच्याजवळील कोयत्याने सुजल यांच्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूक
पिंपरी : लाइफ सर्टिफिकेट काढण्याच्या बहाण्याने एपीके फाईल डाऊनलोड करण्यास सांगून ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना बावधन येथे घडली. या प्रकरणी बावधन येथील ६९ वर्षीय व्यक्तीने बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीच्या फेसबुक अकाउंटवर एका पेजवरून लाइफ सर्टिफिकेट काढण्याची प्रक्रिया करण्यासाठी व्हॉट्सॲपवर संपर्क साधण्यात आला. अज्ञात व्यक्तीने एका नावाची एपीके फाईल डाऊनलोड करण्यास सांगितली. ती फाईल डाऊनलोड केल्यानंतर फिर्यादीच्या बँक खात्यातून १ लाख ९० हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यात आली.
पोलिस असल्याचे भासवून सोन्याची अंगठी लांबवली
पिंपरी : खून प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाची सोन्याची अंगठी हात चलाखीने काढून नेली. ही घटना देहूरोड येथे घडली. या प्रकरणी सुभाषचंद्र ब्रम्हदेव पांडे (रा. देहूरोड) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी फिर्यादीजवळ येऊन ‘आम्ही पोलिस ऑफिसर आहोत, मुंबईत खून झाला असून या प्रकरणातील चाकू शोधण्याचे काम सुरू आहे’ असे सांगून स्वतःची खोटी ओळख सांगितली. त्यानंतर फिर्यादीच्या हातामधील सोन्याची अंगठी कागदामध्ये ठेवण्यास सांगितली आणि हातचलाखीने सहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी घेऊन ते पसार झाले.
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
पिंपरी : ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना निगडी येथे घडली. बाळासाहेब पंढरीनाथ साळवे (वय ४५, रा. आकुर्डी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी धनंजय बाळासाहेब साळवे यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसानी पियुश प्रकाशचंद्र मेहता (रा. कात्रज) या चालकावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांचे वडील बाळासाहेब साळवे हे त्यांच्या दुचाकीवरून भक्ती शक्ती चौकाकडे जात असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रकने साळवे यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात साळवे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
घरातून लॅपटॉप, मोबाईल चोरीला
पिंपरी : चऱ्होली बुद्रूक येथील ऊर्जा हाईट्स येथे घरात शिरून मोबाईल आणि लॅपटॉप चोरून नेला.
या प्रकरणी देवीन नामदेव गेडाम (रा. चऱ्होली बुद्रूक) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांच्या खोलीत चोर शिरला. फिर्यादी व त्यांच्या मित्रांचे लॅपटॉप आणि मोबाईल असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.