पुणे - महापालिकेचा कारभार पारदर्शक व्हावा, या उद्देशाने सव्वाआठ कोटी रुपयांची नव्या संगणक प्रणालीचे (सॉफ्टवेअर) जाळे विस्तारून कामकाज वेगवान केल्याचा दावा महापालिकेच्या माहिती-तंत्रज्ञान (आयटी) विभागाने केला खरा. मात्र, ही प्रणाली कार्यान्वित होऊन जेमतेम सातच महिने झाली असताना तब्बल साडेपाच हजार कोटींच्या हिशेबाचा ‘डेटा’ गायब झाल्याचे उघडकीस आले आहे. संगणक प्रणालीवर एवढा मोठा खर्च होऊन ती ‘करप्ट’ झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रणालीच्या देखभालीसाठी महिन्याकाठी महापालिकेने तब्बल पाच लाख रुपये मोजले असल्याने या योजनेची निविदाही ‘करप्ट’ असावी, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार आणि ‘आयटी’ विभागातील काही अधिकाऱ्यांच्या पुढाकारातून संगणक प्रणाली खरेदी करण्यासोबतच तिच्या देखभालीच्या खर्चाच्या रकमेने निविदा फुगविल्या. त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सतत आक्षेप नोंदवूनही तत्कालीन आयुक्तांनी ती मंजूर केल्याचे उघड झाले आहे. ही निविदा मंजूर करताना जादा खर्च होऊ शकतो, हेही नमूद करून घेण्यात आले होते. त्यामुळे कामांची गरज दाखवत अजूनही महिन्याकाठी लाखो रुपयांची उधळपट्टी होत असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, उच्च तंत्रज्ञानाची संगणक प्रणाली आहे, असा दावा करण्यात येत होता. तरीही ‘डेटा’ करप्ट कसा झाला, असा प्रश्न आहे.
जुनी संगणक प्रणाली अपुरी ठरत असल्याने त्याजागी नवी प्रणाली आणण्याचे कारण महापालिकेच्या ‘आयटी’ विभागाने पुढे केले. या कामात फारसे कोणी लक्ष देत नसल्याने कागदोपत्रे रंगवून खासगी कंपनीला तब्बल आठ कोटी २३ लाख ७५ हजार रुपयांचे काम दिले. त्यानुसार महापालिकेच्या मुख्य इमारतीसह क्षेत्रीय कार्यालये आणि अन्य खात्यांशी ही प्रणाली जोडण्याचे नियोजन झाले. दैनंदिन कामकाज वेगावान करण्यासाठी ‘लॅन’ आणि ‘वॅन’ या नेटवर्किंगची सुविधा घेतली. या प्रणालीच्या उभारणीसाठी दर्जेदार साहित्य खरेदी करण्यात आले. त्याचेही आकडे हव्या तेवढ्या पद्धतीने फुगविल्याचे काही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले; तेव्हा काम न देण्याचा निर्णय झाला. मात्र, आयुक्तांनी ते मंजूरही केले.
‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’ने सरत्या आर्थिक वर्षातील ताळेबंद मागविल्यानंतर माहिती ‘करप्ट’ झाल्याचा खुलासा महापालिकेने केला. नवी प्रणाली वापरात येऊन सातच महिने झाले असताना हा खुलासा म्हणजे एक बनवाबनवीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेने संगणकापासून कामकाजाची प्रणालीही महागड्या दराने घेतली आहे. त्यावर ‘एस्टिमेट कमिटी’ने आक्षेप घेतले होते.
सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांचा खुलासा
संगणकातील माहिती ‘बॅकअप’मधून एकत्रित करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व खात्यांच्या योजना, त्यावरील खर्च आणि नियोजन यांची माहिती उपलब्ध होईल; परंतु वेळ लागेल. त्यासाठी तज्ज्ञांची मदत घेऊन सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत, असे महापालिकेच्या आयटी विभागातील अधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभेत सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.