उत्सव मंडळांना वीज ‘रिचार्ज’
प्रीपेड स्मार्ट मीटरमुळे अनधिकृत वीज वापराला आळा
अहिल्यानगर, ता. १३ ः गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, अन्य सार्वजनिक धार्मिक उत्सवांच्या काळात मंडप, रोषणाई, सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात विजेचा वापर केला जातो. मात्र, वीजवाहिनीवर थेट आकडा टाकून अथवा अनधिकृत वायरिंग करून वीज वापरणाऱ्या उत्सव मंडळांना यंदा चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. महावितरणने सार्वजनिक धार्मिक उत्सवांसाठी दिल्या जाणाऱ्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी यंदापासून प्रीपेड स्मार्ट मीटर बंधनकारक केले आहे.
आता उत्सव मंडळांना मोबाइल रिचार्जच्या धर्तीवर आधी रक्कम भरावी लागणार आहे. उपलब्ध शिल्लकीनुसारच वीज वापरता येणार आहे. शिल्लक रक्कम संपत आल्यास पुन्हा रिचार्ज करून वीजपुरवठा सुरू ठेवता येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांसाठी मंडळांना तात्पुरती वीजजोडणी उपलब्ध करून दिली जाते. या जोडणीसाठी घरगुती वीजदरानुसार आकारणीची सवलत उपलब्ध असल्याने मंडळांनी अनधिकृत वीज वापरण्यापेक्षा अधिकृत जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. अधिकृत वीजजोडणीमुळे केवळ वीजचोरीला आळा बसणार नाही, तर मंडपातील विद्युत दुर्घटनांचा धोकाही कमी होणार आहे. मंडळांनी वीजभाराची योग्य माहिती देऊन आवश्यक क्षमतेची जोडणी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तात्पुरत्या जोडणीसाठी बसविण्यात येणाऱ्या प्रीपेड स्मार्ट मीटरमध्ये मंडळाला अपेक्षित वीजवापरानुसार आधी रक्कम जमा करावी लागेल. त्यानंतर वापरलेल्या विजेचे शुल्क मीटरमधील उपलब्ध शिल्लकीतून वजा होत जाईल. शिल्लक कमी झाल्यानंतर आवश्यकतेनुसार पुन्हा रिचार्ज करता येईल.
दरम्यान, वीजवाहिनीवर आकडा टाकणे किंवा परवानगीशिवाय वीज घेणे हा केवळ नियमभंग नसून कायद्याने गुन्हा आहे. वीज कायदा २००३ मधील कलम १३५ अंतर्गत अनधिकृत वीज वापराच्या प्रकरणात आर्थिक दंडासोबत कारावासाचीही तरतूद आहे. त्यामुळे काही दिवसांच्या उत्सवासाठी अनधिकृत वीज घेण्याचा धोका पत्करण्याऐवजी अधिकृत तात्पुरती जोडणी घेणे मंडळांसाठी सुरक्षित आणि कायदेशीर पर्याय ठरणार आहे.
-----------
सुरक्षेकडे दुर्लक्ष नको
मंडपातील विद्युत व्यवस्था उभारताना अर्थिग, एमसीबी, वायर, प्लग, इतर विद्युत उपकरणांची तपासणी अधिकृत विद्युत कंत्राटदाराकडून करून घेणे आवश्यक आहे. क्षमतेपेक्षा जास्त विद्युत भार घेणे, निकृष्ट दर्जाच्या वायरचा वापर करणे किंवा उघडे विद्युत जोड ठेवणे टाळावे, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.