सकाळ एक्सक्ल्युझिव्ह
---------
दुष्काळात खासगी टॅंकर मालकांना ‘अच्छे दिन’
अडीच हजार वाड्या, ६४१ गावांना टॅंकरने पाणी; १५ शासकीय अन् ७५९ टॅंकर खासगी
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १३ : सध्या राज्यातील १० जिल्ह्यांमधील ६४१ गावे आणि अडीच हजार वाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मागील आठ दिवसांतच ३०० वाड्या आणि ११८ गावांमध्ये तब्बल १६३ टॅंकर वाढले आहेत. राज्यात सध्या ७७४ टॅंकर सुरू असून यात अवघे १५ टॅंकर शासकीय आहेत. उन्हाळा अजून साडेचार महिने असतानाच ऑक्टोबरमध्ये टॅंकर वाढल्याने यंदाच्या दुष्काळात खासगी टॅंकर मालकांना ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे चित्र आहे.
राज्यातील ३७ तालुक्यांमध्ये यंदा सरासरीच्या २५ ते ४० टक्के, तर १६५ तालुक्यांमध्ये सरासरीच्या ५० ते ७० टक्केच पाऊस झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील २६५ तालुक्यात सध्या दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, उन्हाळा फेब्रुवारीअखेर सुरू होईल, तत्पूर्वीच पाण्याचे टॅंकर वाढत असल्याने यंदा उच्चांकी टॅंकर सुरू होतील, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शासनाकडे पाण्याचे टॅंकर १०० सुद्धा नाहीत. सोलापूर जिल्ह्यात अवघे १४ शासकीय टॅंकर आहेत, अशीच स्थिती इतर जिल्ह्यांमध्ये आहे. त्यामुळे खासगी टॅंकर चालकांसाठी यंदाच्या दुष्काळात किमान १०० ते १५० कोटी रुपये मोजावे लागतील, असे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
---------------
जिल्हानिहाय टॅंकर अन् गावे
जिल्हा गावे वाड्या खासगी टॅंकर
छ.संभाजी नगर ९५ २७ १६९
बीड १०६ १४४ १६९
अहिल्यानगर १६२ ९३० १५९
सोलापूर १३२ ६७९ १२४
सातारा ४५ २५४ ३७
सांगली ५१ ३६१ ४२
जालना १८ १० २६
नाशिक १८ ३७ १५
पुणे ०८ ०५ ०८
धाराशिव ०७ ०० १०
एकूण ६४१ ४९७ ७५९
------------------
चौकट
२४ तासांत टॅंकरला मंजुरी;
प्रांताधिकाऱ्यांना अधिकार
गावात पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू करण्याची आवश्यकता असल्यास त्रिस्तरीय समितीने त्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवायचा आहे. त्यानंतर २४ तासांत तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी गावातील पाण्याच्या स्थितीची पाहणी करायची आहे. टॅंकर सुरू करण्याची आवश्यकता असल्यास त्यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे तसा प्रस्ताव द्यायचा. त्यानंतर २४ तासांत प्रांताधिकाऱ्यांनी टॅंकर सुरू करण्यास परवानगी द्यायची आहे. त्यासाठी आताच जिल्हा प्रशासनाने निविदेद्वारे ठेकेदार नेमले आहेत.
------------
कोट:
सोलापूर जिल्ह्यात शासकीय टॅंकर १४ असून सध्या जिल्ह्यात १२४ टॅंकर सुरू आहेत. टॅंकरला परवानगी देण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले असून त्याचे दर, ठेकेदारही निविदा प्रक्रियेद्वारे निश्चित झाले आहेत.
- अभिजीत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.