कडधान्य बियाण्यांच्या
अनुदानात भरीव वाढ
तूर, उडीद, मसूरच्या प्रमाणित बियाण्यांसाठी १०० टक्क्यांपर्यंत अनुदान
ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई : राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘कडधान्य आत्मनिर्भरता अभियान’ अंतर्गत प्रमाणित बियाणे वितरणासाठी केंद्र सरकारने अनुदानाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने २८ ऑगस्ट रोजी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
या सुधारणा देशातील मिशनअंतर्गत सहभागी राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू करण्यात आल्या आहेत.
पूर्वी पाच वर्षांच्या आत प्रसारित झालेल्या तूर, उडीद, मसूर आणि हरभरा वगळता इतर कडधान्यांच्या प्रमाणित बियाण्यांसाठी बियाणे किमतीच्या ५० टक्के किंवा कमाल ६ हजार रुपये प्रति क्विंटल, यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान मिळत होते. हरभऱ्यासाठी ही मर्यादा ४ हजार रुपये प्रति क्विंटल होती. आता तूर, उडीद आणि मसूरसाठी बियाणे किमतीच्या १०० टक्के किंवा कमाल १२ हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्यात येणार आहे. तर हरभरा आणि इतर कडधान्यांसाठी ७५ टक्के किंवा कमाल ६ हजार रुपये प्रति क्विंटल अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.
पाच वर्षांपेक्षा जुन्या वाणांनाही अनुदान
पाच वर्षांपेक्षा जुन्या वाणांसाठीही अनुदानात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. सुधारित नियमानुसार पाच वर्षांपेक्षा जुने, मात्र दहा वर्षांपेक्षा कमी कालावधीतील तूर, उडीद आणि मसूरच्या वाणांसाठी ७५ टक्के किंवा कमाल ९ हजार रुपये प्रति क्विंटल, यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान मिळणार आहे. हरभरा आणि इतर कडधान्यांसाठी ५० टक्के किंवा कमाल ४ हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान मिळेल. पूर्वी या वाणांसाठी तूर, उडीद, मसूर आदींना कमाल ३ हजार रुपये, तर हरभऱ्याला कमाल २ हजार रुपये प्रति क्विंटल अनुदानाची मर्यादा होती. याशिवाय, मार्गदर्शक सूचनांमधील फ्लेक्सी घटकात गरजेनुसार मिळणाऱ्या अर्थसहाय्यासोबत ‘कृषी मॅपर’साठी प्रति हेक्टर ३० रुपये सहाय्य समाविष्ट करण्यात आले आहे.
कृषिमंत्री भरणे यांनी केली होती मागणी
कडधान्य उत्पादन वाढविण्यासाठी प्रमाणित बियाण्यांचा वापर वाढणे आवश्यक आहे. मात्र, पूर्वीचे अनुदान कमी असल्याने शेतकऱ्यांचा हिस्सा तुलनेने अधिक राहत होता. त्यामुळे प्रमाणित बियाणे घेण्यास शेतकऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. ही बाब लक्षात घेऊन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ८ जुलै २०२६ रोजी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पत्र देऊन प्रमाणित बियाणे वितरण घटकांतर्गत अनुदान ५० टक्क्यांवरून १०० टक्के करण्याची मागणी केली होती.
कोट
रब्बी हंगामात हरभरा पेरणाऱ्या शेतकऱ्यांनी या वाढीव अनुदानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि उपलब्ध होणाऱ्या प्रमाणित बियाण्यांचा वापर करावा. केंद्र सरकारने आमची मागणी मान्य केल्याने राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होईल.
-दत्तात्रय भरणे, कृषीमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.