लढत बरोबरीची
पुणे शिक्षक भाजपकडे, अमरावतीमध्ये शिवसेना
पुणे, मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी (शप)
लोगो - विधान परिषद निकाल
मुंबई, ता. २८ : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांपैकी पुणे आणि औरंगाबाद मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मुसंडी मारत महायुतीला धक्का दिला. तर, पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप आणि अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. नागपूर पदवीधर मतदारसंघामध्ये अखेरच्या क्षणापर्यंत चुरस होती.
‘पुणे पदवीधर’मध्ये देशमुख
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत झालेल्या सरळ लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी बाजी मारली. त्यांनी भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांचा पराभव केला. पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक कोटा गाठता आला नाही. त्यानंतर झालेल्या पसंती क्रमांकानुसार चाळीसहून अधिक फेऱ्यांनतरही डॉ. जाधव यांना हर्षदा जाधव यांचे मताधिक्य तोडता आले नाही.
मतमोजणीच्या २१व्या बाद फेरीनंतर हर्षदा देशमुख-जाधव यांना एक लाख ११ हजार २७९ मते मिळाली होती, तर डॉ. स्मिता जाधव यांची मतसंख्या एक लाख दोन हजार ४२७ होती. या टप्प्यावर देशमुख-जाधव यांनी आठ हजार ८५२ मतांची आघाडी घेतली होती. त्यानंतरच्या बाद फेऱ्यांमध्ये दोन्ही उमेदवारांच्या मतसंख्येत वाढ होत राहिली; ३९ बाद फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर देशमुख-जाधव यांना एक लाख ११ हजार ७१७ मते मिळाली होती, तर डॉ. स्मिता जाधव यांना एक लाख २ हजार ७९७ मते होती. विजयासाठी सुमारे एक लाख १३ हजार ९५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. ३९ व्या बाद फेरीनंतर देशमुख-जाधव यांना हा कोटा गाठण्यासाठी आणखी एक हजार ३७८ मतांची गरज होती. त्यानंतरच्या मतमोजणीत त्यांचा विजय झाला.
बंडखोरी भाजपच्या पथ्यावर
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात शिवसेनेची बंडखोरी भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या पथ्यावर पडली. मतदारसंघातील बहुरंगी लढतीत गावडे यांचा सरळ विजय झाला. मात्र मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी गावडे यांना २७ व्या फेरीपर्यंत वाट पाहवी लागली, तर शिवसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांना दुसऱ्या पसंतीची मते मिळाली. माजी आमदार दत्तात्रय सावंत यांना तिसऱ्या, तर विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना चौथ्या पसंती क्रमांकाच्या मतांवर समाधान मानावे लागले. गावडे यांच्या विजयाने तब्बल १८ वर्षांनंतर शिक्षक मतदारसंघावर भाजपला आपला झेंडा फडविण्यात यश आले. एकूण वैध मतांमधून २५ हजार ७५६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. त्यात गावडे यांना निर्धारित मते न मिळाल्याने २७ बाद फेऱ्यांनतर २३ हजार १७७ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी सानप यांना १६ हजार ३४७ मते मिळाली. या मतदारसंघातून आजवर निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये गावडे सर्वात तरुण उमेदवार ठरले आहेत.
डॉ. पाटील यांचा विजय निश्चित
औरंगाबाद मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे. विद्यमान आमदार सतीश चव्हाण पराभवाच्या उंबरठ्यावर असून, बुधवारी रात्रीपर्यंत कोणत्याही उमेदवाराने ८८,५५८ मतांचा कोटा पूर्ण केला नव्हता. त्यामुळे सर्वाधिक मते मिळाल्याने डॉ. पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होणे बाकी होते. तिसऱ्या फेरीनंतर डॉ. प्रतापसिंह पाटील यांना ७३,९३१ मते, तर चव्हाण यांना ६०,७३८, अपक्ष उमेदवार रविराज साबळे यांना १९,८३५ तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप घुगे यांना ८४३९ मते मिळाली. तिसऱ्या फेरीनंतर प्रतापसिंह पाटील हे १३,१६९ मतांनी आघाडीवर होते. तिसऱ्या फेरीनंतरही निश्चित केलेला ८८,५५८ मतांचा कोटा पूर्ण न झाल्यामुळे सकाळी ११ वाजता वगळण्याच्या (इल्यूमिनेशन) प्रक्रियेला सुरुवात झाली होती.
दुसऱ्या पसंतीमध्ये वंजारींची मुसंडी
अत्यंत चुरशीच्या झालेल्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीदरम्यान निकालाचे चित्र बदलत गेले. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी घेतलेली आघाडी कमी करत महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांनी जोरदार मुसंडी मारली. रात्री नऊ वाजेपर्यंत ही स्थिती कायम असल्याने मतमोजणी केंद्रावरील काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि धाकधूक वाढली आहे. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत कोहळे यांनी सुमारे सव्वाचार हजार मतांची आघाडी घेतली होती. मात्र, कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. सुरुवातीच्या टप्प्यात कोहळे यांची आघाडी कायम होती. मात्र, उमेदवार बाद होत गेले आणि त्यांच्या मतांचे हस्तांतरण सुरू झाल्यानंतर निवडणुकीतील चुरस वाढली. विशेषतः कराळे यांच्या मतांच्या हस्तांतरणामुळे वंजारी यांच्या मतांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. अधिकृत दुसऱ्या फेरीअखेर कोहळे यांना ६० हजार ९२४, तर वंजारी यांना ५६ हजार ६३० मते मिळाली. नीतेश कराळे यांना २४ हजार २४९ मते मिळाली.
‘अमरावती शिक्षक’ प्रथमच पक्षाकडे
गेली सव्वाचार दशके शिक्षक संघटनांचे वर्चस्व राहिलेल्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघावर अखेर राजकीय पक्षाने ताबा मिळवला आहे. महायुतीचे किरण सरनाईक यांनी सर्वाधिक मते मिळवत या मतदारसंघावर विजयाचा झेंडा फडकावला. हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी दोन राजकीय पक्षांमध्ये जोरदार लढाई झाली. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण २६ उमेदवारांमध्ये महायुतीकडून शिवसेनेचे किरण सरनाईक, महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या अदिती पोहरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दत्तात्रय लहाने हे राजकीय पक्षांचे उमेदवार होते. सरनाईक यांनी पहिल्या व दुसऱ्या पसंतीची सर्वाधिक मते मिळवून विजय मिळवत हा मतदारसंघ राजकीय पक्षाच्या खात्यात जमा केला. ३५ हजार ८१० मतदार असलेल्या या मतदारसंघात ३३ हजार ३४ शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विजयासाठी १६ हजार १३४ मतांचा कोटा निश्चित झाला. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये किरण सरनाईक यांना आठ हजार १६२ मते, तर अदिती पोहरे यांना चार हजार ६८८ मते मिळाली. पहिल्या व दुसऱ्या पसंतीची मिळून विजयासाठीचा कोटा पूर्ण करीत सर्वाधिक मते मिळवणारे किरण सरनाईक यांना विजयी घोषित करण्यात आले. शिक्षक मतदारसंघ राजकीय पक्षांच्या तावडीत जाऊ नये, यासाठी शिक्षक संघटनांच्या उमेदवारांनी बराच जोर लावला होता. गतवेळी किरण सरनाईक अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले होते. यावेळी ते शिवसेनेचे उमेदवार होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.