धुळीचा मारा, जीवघेणे खड्डे अन् अर्धवट पूल
पुणे- बंगळूर महामार्गाच्या शेंद्रे ते मालखेड फाट्यादरम्यानची स्थिती; लोकप्रतिनिधींचे मौन
हेमंत पवार ः सकाळ वृत्तसेवा
कऱ्हाड, ता. ८ ः केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दिलेली आश्वासने हवेत विरली असून, अधिकाऱ्यांनी ती फाइलमध्ये गाडली आहेत. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत मौन धारण केले आहे. पुणे- बंगळूर महामार्गावरील शेंद्रे ते मालखेड फाट्यादरम्यानचे रखडलेले काम प्रशासनाच्या निष्क्रियतेचा, महामार्ग अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा, लोकप्रतिनिधींच्या ढोंगी विकासाच्या राजकारणाचा जिवंत नमुनाच आहे. वाहनधारकांकडून टोल वसूल करून त्या बदल्यात दिला जातोय तो धुळीचा मारा, जीवघेणे खड्डे, अर्धवट पूल आणि मृत्यूचा सापळा बनलेला रस्ता.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी महामार्गाच्या कामासाठी दिलेली आश्वासने ऐकून सोडून द्यायची असतात, त्याची अंमलबजावणी करायची नसते, हे महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दाखवून दिले आहे. तीन-तीन वेळा मुदतवाढ देऊन ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची हिंमत प्रशासन दाखवत नाही. या रखडलेल्या कामामागे कोणाचे हितसंबंध जपले जात आहेत, याचीच जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. सातत्याने अपघात होतात, निष्पापांचे जीव जातात. कुटुंबे उद्ध्वस्त होतात. मात्र, महामार्ग विभागाला त्याचे काहीच देणेघेणे नाही. प्रशासनाच्या संवेदना जणू मृत झाल्याचे दिसत आहेत. लोकप्रतिनिधींची अवस्था तर आणखी संतापजनक आहे. निवडणुकांवेळी रस्त्यावर उतरून विकासाच्या गप्पा मारणारे नेते आता जनतेच्या वेदनांकडे ढुंकूनही पाहत नाहीत. हा महामार्ग नसून वाहनधारकांसाठी उभारलेला मृत्यूचा कॉरिडॉरच असल्याची संतप्त भावना वाहनधारकांच्या आहेत. लोकांच्या जिवावर उठलेल्या या ढिसाळ कारभाराविरोधात आता रस्त्यावर उतरून जाब विचारण्याची वेळ आली आहे.
....................................
अशी आहे वस्तुस्थिती
* कऱ्हाड, नागठाणे, काशीळ परिसरातील उड्डाणपुलाच्या कामाने सतत कोंडी
* ठिकठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यांवरूनच प्रवास
* उड्डाणपुलाच्या कामासाठी रस्ते वळवण्यात येऊन वाहतूक कोंडीत भर
* महामार्गाकडेची गटारे उंच आणि रस्ते खाली
* उंब्रजनंतरच्या कऱ्हाडकडील पहिल्या उड्डाणपुलावर साचतेय पावसाचे पाणी
* गटाराच्या दोषामुळे महामार्गावरील पावसाच्या पाण्याचा निचऱ्याचा प्रश्न
* ढेबेवाडी फाट्यावर महिन्याहून अधिककाळ वळवलेली वाहतूक ‘जैसे थे’च
.....................................
गडकरी यांची आश्वासने/ कार्यवाही
--------------------
* २५ सप्टेंबर २०२१ - शेंद्रे ते कागल महामार्ग सहापदरीकरणाचे कऱ्हाडमध्ये भूमिपूजन
* जानेवारी २०२५ पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना
* ५ ऑक्टोबर २०२४ - मंत्री गडकरींकडून कामाची हेलिकॉप्टरद्वारे हवाई पाहणी
* हवाई पाहणीनंतर महामार्ग अधिकाऱ्यांना कामाच्या पूर्ततेसंदर्भात सूचना
* १२ ऑगस्ट २०२५ - वेळेत काम न पूर्ण झाल्यास ठेकेदाराला काळ्या यादीत टाका - मंत्री गडकरींचे मंत्री हसन मुश्रीफांना आश्वासन
* मे २०२६ मध्येही महामार्ग सहापदरीकरण काम सुरूच
............................................
चार मंत्री, दोन खासदार तरीही...
जिल्ह्यात चार मंत्री, चार आमदार, दोन खासदार आहेत. संबंधितांनी वेळोवेळी महामार्गाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठकाही घेतल्या. मात्र, तरीही महामार्गाचे काम वेळेत पूर्ण झालेले नाही. त्यामुळे गेल्या काही महिन्यात त्यांचे या कामाकडे दुर्लक्षच झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे दररोज वाहनधारकांना महामार्गावर ताटकळावे लागत आहे.
..........................
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या घोषणांची महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणीच केली जात नाही. त्यामुळे महामार्ग सहापदरीकरण कामादरम्यान अनेक अपघात निष्पापांचे जीव गेले. अत्यल्प सुरक्षेच्या उपाययोजना करून कामे सुरू आहेत. अजून किती बळी गेल्यावर काम पूर्ण होईल, हे मंत्री गडकरी यांनी जनतेला सांगावे.
PNE26W17518
दादा शिंगण, नगरसेवक, मलकापूर.
PNE26W17515
कऱ्हाड ः महामार्गाच्या कामाला तीनदा मुदतवाढ देऊनही उड्डाणपुलाचे काम सुरुच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.